21 January 2019

News Flash

प्लास्टिक आणि विज्ञान

वापरायला सुटसुटीत असं प्लास्टिक ही विज्ञानाचीच देणगी.

|| मेघश्री दळवी

meghashri@gmail.com

 

वापरायला सुटसुटीत असं प्लास्टिक ही विज्ञानाचीच देणगी. पण प्लास्टिकचा अतिरेक झाला आणि त्याचे तोटे डोळ्यासमोर लख्खं दिसायला लागले. तेव्हा आता हळूहळू सगळीकडे प्लास्टिकच्या वापराला आळा घालणं सुरू झालं आहे. सोबत प्लास्टिकला काही पर्याय मिळवण्याचे वैज्ञानिक प्रयत्न गेले अनेक वर्षे सुरू आहेत.

स्टार्च किंवा ग्लुकोजपासून बनवलेलं बायोप्लास्टिक दिसायला आणि हाताळायला प्लास्टिकसारखंच असतं. पण त्याचं ओल्या कचऱ्यासारखं सहज विघटन होऊ  शकतं. बटाटय़ापासून बनलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात उपलब्ध आहेत आणि शैवालापासून प्लास्टिकसारखा पदार्थ मिळवण्यात आला आहे. वापरून टाकून देण्याजोग्या ताट-वाटय़ांना पत्रावळीचा पर्याय आहे. तर प्लास्टिक  काटे-चमचे हे चक्क स्टार्चपासून बनवून शेवटी खाण्याची नामी शक्कल निघाली आहे.

काही प्लास्टिक रिसायकल होतं, पण प्रश्न उरतो तो प्लास्टिक कचऱ्याचा. यासाठी परत मदतीला येतं विज्ञान-तंत्रज्ञान. प्लास्टिकचं नैसर्गिक विघटन व्हायला शंभराहून अधिक र्वष लागू शकतात. त्यामुळे ते वेगाने करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेतला जातो. काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू आणि बुरशी प्लास्टिकचं जैविक विघटन करू शकतात. प्लास्टिक कचरा ठराविक ठिकाणी गोळा करून त्यावर अशी प्रक्रिया करता येते.

कधीकधी अडचणींवर अनपेक्षितपणे उपाय चालून येतात. असाच एक किस्सा अलीकडे घडला आहे. फेडेरिका बटरेचिनी ही स्पॅनिश जीवशास्त्रज्ञ मधमाशांच्या पोळ्यांमधलं मेण खाणाऱ्या अळ्यांवर प्रयोग करत होती. तिने या मेणअळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, त्या अळ्यांनी अवघ्या चाळीस मिनिटांत ती पिशवी पूर्ण कुरतडून टाकली! आपल्या टीमबरोबर आणखी संशोधन करून फेडेरिकाने दाखवून दिलं, की या अळ्या प्लास्टिक  खाऊन त्याचं इथायलिन ग्लायकॉलमध्ये रूपांतर करतात.

गेल्या एप्रिलमध्ये हे निष्कर्ष जाहीर झाल्यापासून यावर आणखी प्रयोग करायला बऱ्याच संस्था पुढे सरसावल्या. त्यातून मेणअळ्या कोणतं एन्झाइम प्लास्टिकच्या विघटनासाठी वापरतात यावर संशोधन सुरू झालं आहे. कदाचित हाच उपाय आपल्याला यापुढे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावायला उपयोगी ठरेल!

First Published on April 29, 2018 12:04 am

Web Title: science and plastics