|| डॉ. नंदा हरम

बालमित्रांनो, पक्षीनिरीक्षणाला तुम्ही कधी ना कधी गेलाच असाल नाही? गेला नसलात तर नक्की जा. हे पक्षीनिरीक्षण साधारण कधी असतं, सांगू शकता? बरोब्बर ओळखलंत. डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये. म्हणजे एरवीही तुम्ही करू शकता; पण या महिन्यांत दुसऱ्या देशांतून इकडे स्थलांतर करून आलेले पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात.

हे पक्षी स्थलांतर का करतात? कारण त्यांच्या प्रदेशात- उत्तरेकडे भरपूर थंडी असते. बर्फवृष्टीमुळे पक्ष्यांना पुरेसं अन्न मिळत नाही आणि ते शोधायला वेळही मिळत नाही. म्हणून ते हजारो मल अंतर कापून आपल्याकडे येतात. तिकडच्या मानाने आपल्याकडे थंडीही कमी असते आणि अन्नही भरपूर असतं.

आपल्याकडे साधारण ३७० प्रजातींचे पक्षी स्थलांतरित होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे पक्षी ऑस्ट्रेलिया, युरोप व पूर्व, उत्तर आणि मध्य आशियातून येतात. रोहित, सायबेरिअन क्रौंच, पेलिकन, धोबी, शेकाटय़ा, थापटय़ा, चिखल्या असे अनेक पक्षी, तसेच वेगवेगळ्या प्रकारची बदके, कदंब, पट्टाकदंब, हंस यांसारखे पाणथळ पक्षी हिवाळ्यात स्थलांतरित होतात; तर उन्हाळ्यात विविध जातींच्या कोकिळा, हळद्या, इ. पक्षी प्रवासाच्या तयारीकरिता मुद्दाम आपलं वजन दुपटीने वाढवितात. त्यामुळे त्यांना या मेदाचा उपयोग ऊर्जा मिळविण्याकरिता होतो.

हे सारं खरं! पण तुम्हाला राहून राहून वाटत असेल, या साऱ्याचा वर दिलेल्या म्हणीशी काय संबंध? तेच बघू आता. गुंजन पक्षी (हिमग बर्ड) हा सर्वात छोटा स्थलांतरित पक्षी आहे. त्याचे वजन सरासरी ३-४ ग्रॅम असते. तो स्थलांतर करताना ताशी ४८ किमी या वेगाने उडतो. तो मेक्सिको आखाताचं जवळ जवळ ९६० किमी अंतर न थांबता पार करतो. म्हणजे २० ते २४ तास निव्वळ हवेत! दुसऱ्या प्रकारचा गुंजन पक्षी मेक्सिको ते अलास्का हे ४८०० किमी अंतर एका फेरीत कापतो. होतेय ना वरील म्हण लागू?

स्थलांतराचा कालावधी एकूण अंतर, पक्ष्यांचा उडण्याचा वेग, मार्ग व ‘थांबा’ या सर्व घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे काही दिवस, आठवडे ते ४ महिने एवढा वेळ त्यांना लागतो. हंस, गिधाडं यांसारखे पक्षी २९००० ते ३७००० फूट उंचीवर उडतात. तोंडात बोट घालायची वेळ आली ना? यापुढे ही म्हण आणि पक्ष्यांचं स्थलांतर ही जोडी कायम लक्षात राहील ना!

nandaharam2012@gmail.com