‘काय गं मुलींनो, दमलात की काय? काय झालं काय एवढं दमायला? घामाघूम झालेल्या दिसताय’ रती आणि गौरांगीला हुश्श करत कधी नव्हे ते झोपाळ्यावर बसून दम खाताना बघितल्यावर आजीला राहवलं नाही.
‘होऽ ग आजी, आम्ही आता डान्स क्लासला जाऊन आलो. नेहमीप्रमाणे क्लासमधला डान्सचा रियाज झाल्यानंतर आम्ही आमच्या बाईंना आम्ही बसवलेला डान्स करून दाखवला. बाईंना खूप आवडला. क्लासला जायच्या आधी डान्सची अशी मस्त तयारी केली होती म्हणून जरा दमलो!’ रतीने खुलासा केला.
‘असं होय, पण आता कशाबद्दल डान्स? २६ जानेवारीचा कार्यक्रम तर झाला. डान्सच्या परीक्षेलाही वेळ आहे. उलट वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अभ्यास महत्त्वाचा आहे.’
‘आजी, आम्ही अभ्यास पूर्ण करूनच डान्स करतो हं, नाही तर आईपण रागावली असती. रिकाम्या वेळेत असं काहीतरी करायचं असं आमचं आता ठरलंय.’ गौरांगीने हळूच सांगून टाकले.
‘होऽका, पण अशी उपरती झाली कशी एकदम,’ आजीला कारण जाऊन घ्यायची उत्सुकता वाटत होती.
‘आजी, त्या दिवशी आपण कल्पना सोसायटीतल्या तुझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो ना! तुझं त्यांच्याकडे काहीतरी काम होतं.’ रतीच्या डोळ्यात तो दिवस लख्ख दिसत होता.
‘आणि रती एकटी यायला तयार नव्हती. तिला कोणाकडे जायचा कंटाळा आला होता. मग तू मला पण चल म्हणाली,’ गौरांगीने स्वत:च्या येण्याचा संदर्भ पुरवला.
‘पण त्याचा डान्सशी काम संबंध’, आजी मूळ मुद्दय़ावर आली.
‘तू त्या आजींशी बोलत होतीस. आम्ही चुळबूळ करत गप्प बसलो होतो. इतक्यात शेजारच्या खोलीतून छोटय़ा मुलाने पडदा बाजूला करत फक्त तोंड बाहेर काढले आणि मानेनेच ‘या’ अशी खूण केली. आम्ही दोघी पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच गेलो.’ इति रती.
‘ओळख नव्हती ना, मग कशा गेलात खेळायला’, आजीने कुठेही जाऊ या म्हटलं की ‘तिथे माझ्या ओळखीचे कोणी नाही’ हे पालुपद नातीने लावायचं आणि ‘अगं गेल्यावर ओळख होते’ ही आजीची भूमिका, याची आवर्तनं होत असल्यामुळे आजीच्या प्रश्नाचा रोख दोघींना नेमका कळला.
‘छोटय़ाने बोलावलं ना म्हणून गेलो. पण गंमत ऐक ना आजी, अगं खोलीभर मस्त पसारा होता. भिंतीजवळ गादी घातलेली होती. ते स्टेज होतं. खिडकीचे ग्रील आणि कपाटाचं हँडल याला दोरी बांधली होती. त्यावर पडदा म्हणून चादर घातलेली होती. छोटय़ाचा दादा माईक म्हणून रवी हातात घेऊन उभा होता आणि काय होतं गं गौरांगी?’ रतीने विचारले.
‘तिथे ना भिंतीला फळा अडकवलेला होता आणि त्यावर त्या दोघांची नावे लिहिलेली होती. नाटय़संगीताची मेजवानी, तारीख, वार, वेळ आणि स्थळ, ‘गेस्ट रूम’ असं अगदी जाहिरातीत असतं ना तसं लिहिलं होतं. मी त्या दादाला विचारलं, ‘हे काय खेळताय?’ तर तो म्हणाला, ‘आम्ही कार्यक्रम कार्यक्रम खेळतोय,’ गौरांगीला वाटलेली मजा बोलण्यातून जाणवत होती.
‘आजी ते दोघेही त्याच्या आजीकडे गाणं शिकतात. त्यांना नाटय़गीतं म्हणता येतात. कट्टय़ारची गाणी दादाने मोबाइलवर ऐकून ऐकून तोंडपाठ केली. छोटूलाही गाणं म्हणता येतं. मग दादा भूमिका ठरवतो. स्वत:ची गाणी तयार करतोच. शिवाय दारं बंद करून छोटूकडून लुटुपुटीची रंगीत तालीम करून घेतो. आई, आजी हे त्यांचे दोन हक्काचे प्रेक्षक असतात. बाकीचे प्रेक्षक म्हणून उतरलेल्या जागेत रुमाल ठेवतात. घरातल्यांना कार्यक्रमाचं सरप्राईज देतात,’ रतीला ही कल्पना फारच आवडली.
‘माईकवर कोण बोलतं मग?’ आजीच्या डोळ्यासमोर ‘बाल नाटय़’ तरळू लागलं.
‘दादाच बोलतो म्हणे. त्याने मग आम्हाला प्रात्यक्षिकही दाखवलं. पडदा म्हणून टाकलेली चादर बाजूला केली. दादा आधी निवेदकाच्या जागेवर बसला. कोण काय सादर करणार ते सांगितलं. मग छोटूने गाणं म्हटलं. त्याचं झाल्यावर दादाने गाणं म्हटलं. मांडीवर शाल घेतली होती. मधे मधे गरम पाणी, चहा पिण्याचं मस्त नाटक केलं. आम्हाला खूप आवडलं. छोटूने पडदा खाली सोडला आणि मग कार्यक्रम संपला..’ गौरांगीला सगळं साग्रसंगीत सांगण्याची घाई झाली होती.
दादा आमच्याच बरोबरचा होता. मग त्याने विचारलं, ‘तू काय शिकतेस. मी कथ्थक शिकते म्हटल्यावर तो म्हणाला की आपण पुढच्या वेळेला मोठा कार्यक्रम करू. तेव्हा तू नाच कर.’ मग मी आणि गौरांगीने ठरवलं की संध्याकाळी नुसता ळ.ढ. करण्यापेक्षा नवीन डान्स बसवायचा. मग आम्ही यू टय़ूबवर शोधाशोध करून ‘मनमंदिरा तेजाने उजळूनी घे साधका’ हे गाणं निवडलं. आईच्या मोबाइलवर घेतलं. आईने त्या गीताचा थोडा भावार्थ सांगितला. आणि मग आम्ही दोघींनी डान्सची कोरिओग्राफी केली. आज आमच्या डान्स क्लासमध्ये तो बाईंना करून दाखवला. त्यांना खूप आवडला.’ रतीचे डोळे आनंदाने लकाकत होते.
‘एरवी आम्ही दोघी संध्याकाळी इकडेतिकडे करत बडबड करत बसायचो ना तरीसुद्धा मरगळल्यासारख्याच असायचो. पण गेले आठ-पंधरा दिवस आम्हाला केव्हा एकदा अभ्यास पूर्ण करतोय आणि डान्सचा रियाज करतोय असं होत होतं. शिवाय पुन्हा अभ्यास करायलाही आम्ही फ्रेश. खूश असायचो. Change of work is relief चा अर्थ आता जाणवला. आता सुट्टीत आम्हीही असा घरी डान्सचा कार्यक्रम करणार बरं का? आजी तुला, डान्स बघायला बसावंच लागेल,’ गौरांगीने निर्णय जाहीर केला.
‘त्या दिवशी तू सक्तीने तुझ्याबरोबर आम्हाला तुझ्या मैत्रिणीकडे घेऊन गेलीस, त्याचा आम्हाला हा फायदा झाला. सॉरी हं, तेव्हा आम्ही कुरकुरत आलो. पण आता तू नेशील तेथे हे शेपूट येणार,’ रतीने हसतहसत आजीचा पदर धरला.
‘आता पटलं ना, कुठेही गेलं तरी काहीतरी शिकायला मिळतं. म्हणून आधी सक्तीने, मग..’
‘उत्साहाने सगळीकडे जायचं!’ दोघींनी आजीचं वाक्य घाईघाईने पूर्ण केलं.