|| राजश्री राजवाडे-काळे

उन्हाळ्याच्या सुट्टय़ा सुरू झाल्या आणि अनय, तन्वी, निहार, श्रेयस सगळी गँग सकाळ- दुपार- संध्याकाळ खेळात रमली. तहान लागली की सगळे पहिल्या मजल्यावर कुणाकडे तरी पाणी प्यायला जायचे. आज सगळी गँग एरिकाच्या घरी गेली, कारण आज सकाळपासून ती खेळायला आली नव्हती. मग सगळ्यांनी ठरवलं, एरिकाला बोलवू आणि पाणी पिऊ. एरिकाच्या घराची बेल वाजवली तर दरवाजा उघडला जॉन अंकलनी- एरिकाच्या वडिलांनी. ते म्हणाले, ‘‘एरिका सकाळपासून तिच्या मावशीकडे गेली आहे. आता ती रात्री जेवूनच येईल.’’ जॉन अंकल हे बोलत असताना सगळ्यांचं लक्ष मात्र त्यांच्या घरात दिसणाऱ्या रंगीबेरंगी अंडय़ांकडे आणि चॉकलेट्सकडे होतं. जॉन अंकल आत पाणी आणायला गेले तशी सगळे कुजबुजू लागले, ‘‘किती छान दिसतायत ती रंगीत अंडी.’’

‘‘ती चॉकलेट्स तर बघ.’’ ‘‘एरिकासाठी आणल्येत.’’ मुलांची ही कुजबूज ऐकून जॉन अंकल गालातल्या गालात हसत होते. पाणी पिऊन झालं आणि ‘थँक्यू अंकल’ असं म्हणून गँग एरिकाच्या घरातून बाहेर पडली. जॉन अंकलनी दरवाजासुद्धा बंद केला. सगळे एकमेकांकडे बघत होते. सगळ्यांच्या मनात हाच विचार  की ती रंगीत अंडी, चॉकलेट्स किती छान होतं सगळं!

श्रेयस म्हणाला, ‘‘ती चॉकलेट्स एरिकासाठी आणलीत का जॉन अंकलनी?’’

तन्वी त्याला वेडावत म्हणाली, ‘‘नाही, आपल्याचसाठी आणलीत, अरे वेडय़ा उद्या ईस्टर आहे ना!’’

‘‘ए, आपणपण साजरा करायचा का ईस्टर?’’ निहारच्या या कल्पनेने अनयचे डोळे चमकले.

तो लगेच म्हणाला, ‘‘हो, आपण ख्रिसमस ट्री सजवतो, जॉन अंकल आपल्याला ख्रिसमस पार्टीपण देतात. मग ईस्टरपण करूया ना!’’

‘‘अरे पण कसा साजरा करतात ईस्टर? नक्की का आणि काय असतं ईस्टर म्हणजे? माहित्ये का काही? म्हणे ईस्टर साजरा करू.’’ तन्वीने पुन्हा चिडवलं. इतक्यात जॉन अंकलनी दरवाजा उघडला आणि विचारलं, ‘‘हे काय? तुम्ही अजून इथेच? कसला प्लॅन चाललाय?’’

शेवटी निहारने विचारलंच, ‘‘अंकल तुम्ही ईस्टरची तयारी करताय?’’

‘‘हो, एरिका मावशीकडून यायच्या आधी मला सगळी तयारी करायचीय.’’ जॉन अंकलचं उत्तर ऐकून मुलं अजूनच गोंधळली.

‘‘कसली तयारी?’’ सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न.

‘‘अंकल, आम्ही ईस्टर साजरा करू शकतो का? पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही.’’ तन्वीने एका दमात सांगून टाकलं. अंकल हसू लागले, त्यांनी मुलांना घरात बोलावलं आणि म्हणाले, ‘‘ऐकायचंय ईस्टर का आणि कसा साजरा करतात?’’

सगळे ‘‘होऽऽऽ’’ म्हणून ओरडले. आता नवीन काहीतरी ऐकायला मिळणार म्हणून सरसावले. जॉन अंकल सांगू लागले, ‘‘शुक्रवारी गुड फ्रायडे असतो, कारण या दिवशी प्रभू येशू यांना क्रुसावर लटकवण्यात आलं होतं आणि मृत्यूनंतर तीन दिवसांनी महाप्रभू येशूंनी पुन्हा जन्म घेतला, हा दिवस आनंद दिवस म्हणून वसंत ऋ तूत साजरा करतात.’’

‘‘पण या रंगीत अंडय़ांचा काय संबंध?’’ अनयला प्रश्न पडला.

‘‘सांगतो, तेही सांगतो.’’ जॉन अंकल सांगू लागले, ‘‘अंडय़ातून नवीन जीव जन्माला येतो ना, म्हणून अंड हे नवीन आयुष्याचं प्रतीक मानलं जातं, कारण प्रभू येशूंना नवीन आयुष्य मिळालं. ईस्टर बनी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी ईस्टरची अंडी घराच्या कानाकोपऱ्यात, झाडाझुडपांत लपवून जातो आणि मुलं रविवारी हा खाऊ शोधतात अशी धमाल असते ईस्टरच्या दिवशी.

‘‘ओह. म्हणजे जसा सांताक्लॉज भेटवस्तू देतो तसा ईस्टर बनी खाऊ देतो.’’ श्रेयस.

पण ईस्टर बनीच का? डिअर, कॅट वगैरे का नाही?’’ तेजसला प्रश्न पडला.

जॉन अंकल मोठय़ाने हसत म्हणाले, ‘‘तुम्ही मुलं म्हणजे ना! आता तुम्हाला अजून एक मजेशीर गोष्ट सांगावीच लागेल. तुम्हाला माहित्ये का, ईस्टर, बनी, अंडी या सगळ्याच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक छान गोष्ट सांगतो. वसंत ऋ तूची देवी ओस्टरा! देवीला एकदा थंडीत गारठलेला पक्षी दिसला. त्याचे पंख थंडीमुळे गोठले होते. तो उडूही शकत नव्हता. देवीला पक्ष्याची दया आली. देवीने त्याला सशाचं रूप दिलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्याला आपलं वाहन बनवलं. तो ससा दिसत असला तरी मुळात होता पक्षी. देवीने तर त्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची अंडी घालता येण्याचा वरही दिला, पण एक दिवस देवी ओस्टरा रागावली आणि त्याला शाप दिला की तू ‘ओरिअन’ नक्षत्राच्या पायाखाली ‘लेपूस’ नावाचा नक्षत्र बनून राहशील. देवीचा राग शांत झाल्यावर सशाला उ:शाप मिळाला की वर्षांतून एक दिवस पृथ्वीवर जाऊन त्याला अंडी देता येतील, पण ती अंडी मात्र मुलांना वाटून टाकण्यासाठी असतील. अशा तऱ्हेने ईस्टर बनी छान छान अंडी मुलांमध्ये वाटू लागला. आता रंगीत अंडय़ांसारखी चॉकलेट्स, भेटवस्तू सगळीकडे लपवून ठेवतात.’’ मुलांना गोष्ट खूप आवडली.

‘‘म्हणजे एरिका उद्या एक हंट खेळणार? कित्ती मज्जा येईल तिला.’’

निहारनी जरा खट्ट  होतच विचारलं. ‘‘हो, ती येण्याआधी हे सगळं लपवायचंय मला. आणि फक्त तिलाच नाही, तुम्हालाही मज्जा येणारे, उद्या तुम्ही सगळ्यांनी यायचंय एग हंटला.’’ जॉन अंकल म्हणाले. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला.

‘‘हो अंकल, नक्की!’’ सगळे एका सुरात म्हणाले.

‘‘ठरलं तर मग उद्या ‘एग हंट!’ आता सगळे पळा, मला उद्याची तयारी करायचीय.’’

जॉन अंकलचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचे चेहरे खुलले. दरवेळी नुसतंच ‘ईस्टर संडे’ असं ऐकत असलेली मुलं या वेळी ईस्टर साजरा करणार होती, ‘ईस्टर एग हंट’ खेळून!

shriyakale@rediffmail.com