मित्र आणि मैत्रिणींनो,

करोनाच्या साथीमुळे आपण सर्वजण गेले जवळजवळ दीड महिनाभर घरात अडकून पडलो आहोत. घराबाहेर जाता येत नाही. मित्र-मैत्रिणींना भेटता येत नाही. त्यांच्याशी नेहमीप्रमाणे खेळता येत नाही. टीव्ही तरी किती पाहणार? आणि मोबाइलवर तरी किती खेळणार? घरातली मोठी माणसं त्यावरून ओरडणार. बाबा घरात बसून ऑफिसचं काम करणार. आई स्वयंपाकघरात असणार. मग आम्ही दोघांनी ठरवलं, आपल्याकडे लहान मुलांनी वाचण्यासारखी पुस्तकं आजोबांनी आणली आहेत, ती आपण वाचू या. घरातल्या घरात बैठे खेळ खेळू या. पण त्याचबरोबर मोठय़ा माणसांना विचारून घरातली काही कामं करता येईल का, तेही पाहू या. आम्ही आजोबांना आणि आईला, आजीला विचारून आमचा ‘करोना दिनक्रम’ ठरवला आहे. आम्हाला वाटलं, तुम्हालाही आता घरात बसून बसून कंटाळा आला असेल, तर आमच्यासारखा ‘करोना दिनक्रम’ तुम्हालाही ठरवता येतो का, पाहा. आम्हाला खात्री आहे- तुम्हालाही तो आवडेल.

सध्या शाळा बंद आहेत. गृहपाठ अर्थातच नाही. तेव्हा आम्ही दोघं मस्त उशिरा उठतो. आईपण मुद्दामच आम्हाला लवकर उठवत नाही. कारण तिला आमची लुडबुड नसताना घराची साफसफाई करणं जास्त सोयीचं होतं.

आम्ही दोघं उठल्या उठल्या कोणीही न सांगता पटकन् दात घासतो, प्रातर्विधी उरकतो आणि तशीच आंघोळही उरकून मगच बाहेर येतो. आर्या आजीपुढे केस विंचरायला जाऊन बसते. देवाला नमस्कार करून, घरातील मोठय़ा माणसांना नमस्कार करतो आणि घरातील कोणाचा तरी फोन घेऊन आम्ही दोघं जण रोज वेगवेगळ्या दोन-तीन मित्रांना फोन करून त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारतो. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना फोन करून शुभेच्छा देतो. आणि ‘करोनापासून मुक्ती मिळाली की मात्र पार्टी हवी..’ हे सांगायला विसरत नाही. त्यांनाही मित्रांशी बोलल्यावर बरं वाटतं.

आई किंवा आजी ब्रेकफास्ट बनवत असते. सर्वाच्या तोपर्यंत अंघोळी झालेल्या असतातच. आम्ही दोघांनी ठरवून एक दिवसाआड एकाने धुण्याचे कपडे मशीनमध्ये टाकून मशीन चालू करायची आणि एकाने स्वयंपाकघरात आईला किं वा आजीला ब्रेकफास्ट बनवायला मदत करायची अशी कामांची वाटणी करून टाकली आहे. कपडे भिजवताना कधीतरी चुकून कोणाच्या तरी खिशात राहिलेले पैसे मिळतातच.. ते त्यांना दाखवून आमच्या प्रत्येकाच्या वेगळ्या पिग्गी बँकमध्ये जमा करून टाकतो. आम्ही दोघं आता बटाटा भाजी- उकडलेल्या आणि काचऱ्याची दोन्ही- करायला शिकलो आहोत. अजूनही काही बनवायला शिकून घेणार आहोत. केळ्याचं शिकरण आम्हाला बनवायला खूप आवडलं. फार झंझट नाही. पिकलेली केळी, दूध, साखर असलं की झालं. पण आजी-आजोबांना मात्र वाढायचं नाही. त्यांना डायबेटीस आहे ना!

मग आम्ही तासभर टीव्हीवर कार्टून फिल्म किंवा आई, आजी किंवा आजोबांचा मोबाइल घेऊन त्यावर गेम खेळतो. आम्ही अगदी ठरवून थोडाच वेळ मोबाइलवर गेम खेळतो. त्यामुळे मोठी माणसं आम्हाला मोबाइल देतात, नाहीतर काही खरं नव्हतं. म्हणजे ओरडा बसलाच असता आणि मोबाइल पण कधी मिळाला नसता. मधेच कधीतरी इतर साफसफाई करायची. यूटय़ूबवर पाहून कागदाच्या वस्तू बनवायच्या.

तोपर्यंत आजी-आजोबा दुपारची झोप काढून उठलेले असतात. त्यांच्याबरोबर लिडो, पाच-तीन-दोन वगैरे पत्त्यांचा डाव, सापशिडी, नाहीतर मग बुद्धिबळ खेळत बसतो. खेळायचा कोणाला कंटाळा आला असेल तर मग आईला संध्याकाळचा चहा, खाणं करायला आिंण ते सगळ्यांना द्यायच्या कामात मदत करतो. आम्हाला आजोबांनी काही पुस्तकं  आणून दिली आहेत. त्यात विज्ञान आणि  वैज्ञानिकांच्या कथा, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, कर्तृत्ववान व्यक्तींचं अनुभवकथन अशी काही पुस्तकं आहेत. त्यातले काही धडे वाचतो आणि शंका आली तर आजोबांना विचारावंसं वाटतं. ते मग अजून काहीतरी वाचायला सांगतात. त्यामुळे दरवेळी त्यांना विचारतोच असं नाही.

संध्याकाळी सात-साडेसात वाजता आजी-आजोबा रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे म्हणायला बसतात. त्यांच्याबरोबर रोज म्हणून म्हणून आमचंही आता ते पाठ झालं आहे. पहिल्या पहिल्याने आम्हाला वाटायचं, हे कशाला म्हणायचं रोज रोज? पण आता आम्हाला कळून आलंय.. ते बोलताना आमचं बोलणं स्वच्छ आणि उच्चार अगदी स्पष्ट, छान येतात. शिवाय पाढे म्हणजेच टेबल पाठ करतो.

रात्रीच्या जेवणाची टेबलवर तयारी करायची, जेवणं झाली की सर्व भांडी उचलून बेसिनच्या बाजूला नेऊन नीट ठेवून द्यायची- ही कामं आम्ही दोघंजण करतो.

नवीन मराठी मालिका आता नाहीत. शिवाय बातम्या बघून माहिती कमी, त्रासच जास्त होतोय, म्हणून आजी-आजोबांसाठी टीव्ही बिनकामाचा आहे. पेपर हल्ली येत नाही. दोघांची संध्याकाळची बाहेरची फेरीही करोनामुळे बंद आहे. त्यामुळे आजी-आजोबा आता पूर्वीसारखा टीव्ही बघत नाहीत. त्यामुळे त्यांनासुद्धा आमच्याशी गप्पा मारायला आवडतं.

दिवसभरात कधीतरी बाबा आणि आजोबा त्यांना वेळ असेल तेव्हा आम्हाला करोना म्हणजे काय, तो पसरू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची भीती बाळगायची नसून तो आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे, ती कशी आणि का, याची माहिती आणि त्यामागील वैद्यकीय आणि वैज्ञानिक सत्य काय आहे, ते नीट समजावून देत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी घेतली तर करोनाला अजिबात घाबरायचं कारण नाही, हे आम्हाला सर्वानाच कळून आलं आहे. कुठल्याही अवैज्ञानिक सल्ल्याकडे दुर्लक्ष करायचं.

मधे मधे रिझल्टची आठवण येईल, पण घाबरू नका, आपण सर्वच पास होणार आहोत.

रात्री झोपण्यापूर्वी आजोबा आम्हाला यापूर्वी वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत विषाणू किंवा जिवाणूंचे शोध कोणी, कसे लावले, आणि त्याच्या कथाही मोठय़ा रंजक आहेत, त्या सांगतात.

एक खरं आहे, तुम्हाला कदाचित भावंड नसेल तरी काही हरकत नाही. त्यानुसार दिवसभराचं टाइमटेबल करायचं. आणि आम्ही करतो तेच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही काही वेगळ्या कल्पना लढवू शकता.

थोडक्यात, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, करोनाला घाबरायचं काम नाही. त्याची माहिती करून घ्या. टीव्हीवरील घाबरवणाऱ्या त्याच त्या बातम्या बघणं टाळा. थोडा वेळ टीव्हीवरील कार्टून फिल्म अवश्य पाहा. मोबाइलवर थोडा वेळ खेळायलाही हरकत नाही. पण आमच्यासारखे दिवसभराचे कार्यक्रम आखून घेतलेत तर आपण घरात अडकून पडलो आहोत असं तुम्हाला वाटणार नाही. आणि कंटाळा कुठल्या कुठं निघून जाईल. त्याला वेळच राहणार नाही ना! कंटाळा तुमच्यापर्यंत येईल, पण तुम्हालाच वेळ नसेल. मग तोच कंटाळून निघून जाईल.

तुमचे मित्र,

चिन्मय आणि आर्या गद्रे