थंडीचे दिवस संपत आले आहेत. मात्र तरीही ‘रोज खाओ अंडे’ म्हणणाऱ्या पिढीचे आपण सगळे असल्याने मी आज मला आवडणाऱ्या अंडय़ाच्या ऑम्लेटची पाककृती देणार आहे. मी किती वयाचा असल्यापासून ऑम्लेट करायला लागलो ते कदाचित मलादेखील सांगता येणार नाही. मात्र, खूप लहान असल्यापासून मी स्वत: बाजारातून अंडी आणण्यापासून त्यांचं ऑम्लेट करण्यापर्यंतची सगळी मजा अतिशय आनंदाने करत असे, हे मला आठवतंय. गंमत म्हणजे त्यावेळेपासून आमच्याकडे असणारा तवा आजही माझ्या या बालबल्लव-लीलांची ग्वाही द्यायला आमच्याकडे मौजूद आहे. साधारणपणे फक्त अंडय़ाच्या या ऑम्लेटमध्ये मी काही धम्माल बदल केले आहेत. त्यामुळे वरवर सनी साइड अप दिसणाऱ्या या ऑम्लेटमध्ये खूप मजा आणि चविष्ट सामग्री दडलेली आहे, हे नक्की.

चारजणांकरता साहित्य : प्रत्येकी एक किंवा दोन मोठी कोंबडीची अंडी. एक मध्यम आकाराचा पिकलेला टॉमेटो आणि कांदा, छोटी मूठ प्रत्येकी मक्याचे, मटारचे दाणे, बारीक चिरलेला, मोठा चमचाभर पुदिना किंवा कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिरेपूड. तव्याला लावण्याकरता लोणी, बटर किंवा तेल.

उपकरणं : जाड बुडाचा किंवा बिडाचा तवा, त्यावर बसणारं झाकण, उलथणं, भाज्या कापण्याकरता सुरी आणि ऑम्लेट करण्याकरता गॅसची शेगडी, चूल किंवा इंडक्शन कूकटॉप.

बच्चेकंपनी, या पाककृतीकरता घरच्या मोठय़ा माणसाला मदतीला आणि देखरेखीला सोबत घ्यायला विसरू नका, बरं का. विस्तवाशी काम करणार आहात, तेव्हा भाजलं, चटका बसला तर सोबत ही हवीच. सर्वप्रथम टॉमेटो धुऊन त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून घ्या. मग एका मोठय़ा ताटामध्ये टॉमेटोच्या फोडी, मटारचे आणि मक्याचे दाणे, चिरलेला पुदिना किंवा कोथिंबीर असं छोटय़ा छोटय़ा राशींमध्ये जमवा. सरतेशेवटी कांद्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. आता शेगडीवर किंवा इंडक्शन कूकटॉपवर तवा मोठय़ा आचेवर तापवून घ्या. तवा चांगला तापल्यानंतर त्यावर थोडय़ा थोडय़ा भाज्या, चार-आठ फोडी कांदा आणि टॉमेटो, थोडे मक्याचे आणि मटारचे दाणे असं मध्यभागी गोलाकार पसरा. तापल्या तव्याला हात लावू नका बरं का चुकूनही! आता चमच्याने लोणी किंवा बटर किंवा तेलाचे काही थेंब या भाज्यांवर सगळीकडे सोडा. आच कमी करा आणि तव्यावर झाकण ठेवून भाज्या मिनिट- दोन मिनिटं छान खरपूस शिजू द्या. आता तव्यावरचं झाकण काढून भाज्यांवर एक अंडं फोडून घाला. आधी वाटी किंवा भांडय़ामध्ये मिसळून किंवा फेटून घेऊ  नका. थेट तव्यावरच्या भाज्यांवरच फोडा. पिवळाधम्मक बलक तस्साच राहिला पाहिजे. अगदी पहिल्या फटक्यात नाही जमलं तरी एक-दोनदा सराव केल्यावर सहज जमेल. आता हे ऑम्लेट शिजत असतानाच चिमटीने मीठ मिरपूड त्यावर पेरा. आच मध्यम ठेवा आणि झाकण न ठेवता अंडं शिजू द्या. ऑम्लेटच्या कडा हळूहळू खरपूस होऊन सुटल्या म्हणजे उलथण्याने अगदी सावकाश संपूर्ण ऑम्लेट तव्यावरून काढून ताटात घ्या. किंवा सुरुवातीला हॉटेलामध्ये मसाला डोसा जसा तव्यावरच गुंडाळी करतात तशी ऑम्लेटची गुंडाळी केलीत तरी चालेल.. म्हणजे तव्यावरून ताटात काढणं सोपं होईल.

पारंपरिक सनी साइड अपच्या पाककृतीमध्ये अंडं, मीठ आणि मिरेपूडशिवाय काही नसतं. अगदी सरळ, साधी, सोप्पी रेसिपी आहे. अंडय़ाचं बलक शिजायला तर हवं, मात्र ते पूर्ण घट्ट होता कामा नये, हे खरं कसब. माझ्या रेसिपीमध्ये ही धम्माल तर आहेच; शिवाय भाज्यांचं सरप्राइज आहे. अंडय़ाच्या स्वादासोबत खरपूस भाजलेल्या भाज्यांचा स्वाद अप्रतिम लागतो. शिवाय या रेसिपीमध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील अशा चटकन् शिजणाऱ्या कितीतरी भाज्यांच्या फोडी करून वापरू शकता. कांदा-टोमॅटो-वांग्याच्या फोडीसुद्धा मस्त लागतात. लाल भोपळा आणि गाजराच्या बारीक फोडी छान गोड चव देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही फोडी कैरीच्या गराच्या, साल नसलेल्या घातल्या म्हणजे छान चटकदार चव मिळते. आहे की नाही मज्जा! एक पदार्थ, पण त्याची अनेक रूपं. तुमच्या मूडप्रमाणे ऑम्लेट सॅण्डविच करा, पोळीमध्ये गुंडाळून फ्रँकी करा, किंवा नुसतं ऑम्लेट फस्त करा. दरवेळी नव्या चवीचं आणि तरीही चटकन् चाखायला मिळेल हे नक्की! मग कधी करून पाहताय हे धम्माल सनी साइड अप?

श्रीपाद contact@ascharya.co.in