समुद्र, महासागर हे शब्द मनात जरी आले तरी आपण पाणी, मासे, शंख, शिंपले यांचाच विचार करतो. पक्ष्यांचा विचार आपल्याला शिवतही नाही. मात्र माझ्या बालदोस्तांनो, समुद्री जीवनालाही आपलंसं केलेले अनेक पक्षी आहेत बरं का! आज आपण अशाच समुद्री पक्ष्यांची माहिती करून घेऊ.

बहुतांश पक्षी प्रजाती समुद्र आणि महासागरांच्या सान्निध्यात जगू शकत नाहीत. मात्र समुद्री पक्षी मात्र या खास आणि कठीण अशा वातावरणाशी जुळवून घेतातच, त्यावर यशस्वीपणे मातदेखील करतात. हे पक्षी समुद्राचं खारं पाणीच पितात, मात्र ते आजारी पडत नाहीत, कारण त्यांच्या शरीरामध्ये या पाण्यातले क्षार किंवा मीठ वेगळं करण्याकरता खास ग्रंथी असतात. गंमत म्हणजे या ग्रंथी पाण्यातील क्षार वेगळे करतात आणि पक्षी हे अतिरिक्त क्षार नाकपुडय़ांमार्गे शरीराबाहेर फेकतात.

अनेक सागरी पक्षी पाण्यामध्ये खोल बुडय़ा मारू शकतात, एम्परर पेंग्विन्स तब्बल ८०० फूट खोलीपर्यंत किंवा एखाद्या ७०-८० मजली उंच इमारतीएवढी खोल बुडी पाण्यामध्ये मारू शकतात. गॅनेट्ससारखे सागरी पक्षी पाण्यातील मासा पकडण्याकरता इतक्या वेगाने आणि खोलवर बुडी मारतात, ती बुडी मारताना त्यांचं शरीर तब्बल ताशी ८५ किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने पाण्याला चिरत जातं. या प्रचंड वेगामध्ये बुडी मारताना स्वत:ला इजा टाळण्यासाठी आणि नाकामध्ये पाण्याचा शिरकाव होऊ  नये याकरता या पक्ष्यांच्या शरीरामध्ये खास हवेच्या पिशव्या असतात आणि नाकपुडय़ांवर आवरण असतं.

समुद्री पक्ष्यांच्या डोळ्यांमध्येच गॉगल्ससारखी व्यवस्था असते. या पक्ष्यांच्या डोळ्यातील पडद्यावर एका तांबूस तेलाचा थर असतो, जो डोळ्यांवर आपण घालतो. त्या गॉगल्ससारखं संरक्षक आवरण तयार करतो. साऱ्या प्राणिजगतामध्ये समुद्री पक्ष्यांची दृष्टी सर्वाधिक रंग पाहू आणि ओळखू शकते.

या समुद्री पक्ष्यांना, इतर पक्ष्यांविपरीत खूप मोठय़ा काळापर्यंत हवेमध्ये आणि विश्रांती घेण्याकरता पाण्यावर उतरलेच तर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगता येता यायला हवं, या खास गरजेमुळे समुद्री पक्ष्यांची शरीररचना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिकच हलकी तरी मजबूत असते. स्थलांतरादरम्यान अनेक सागरी पक्षी आवाढव्य अंतरं पार करतात. आक्र्टिक टर्न्‍स साधारणपणे ६५ हजार किलोमीटर प्रवास पार पाडतात. या स्थलांतरादरम्यात ते विषुववृत्त पार करतात, अर्थातच पृथ्वीच्या तब्बल अर्ध्या अंतराला ते सहज पार करतात.

अनेक स्थलांतरित पक्ष्यांसोबतच खास आपल्याकडचे समुद्री पक्षी सध्या मुंबईसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसताहेत. तेव्हा जेव्हा तुम्ही समुद्र किनारी भेट द्याल किंवा समुद्र सफरींवर जाल तेव्हा या सागरी पक्ष्यांना शोधायला मात्र विसरू नका.

ऋषिकेश चव्हाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rushikesh@wctindia.org