scorecardresearch

कडकनाथ बदक

‘पोर्किज् डक हंट’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा डफी नावाचा काळा बदक चित्रपटसृष्टीत दाखल झाला.

श्रीनिवास बाळकृष्णन

‘पोर्किज् डक हंट’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा डफी नावाचा काळा बदक चित्रपटसृष्टीत दाखल झाला. वर्ष होतं दहा नऊ  तीस सात (१९३७)! आतापासून ८२ वषेर्ं मागे!

लुनी टून्सच्या अनेक पात्रांपैकी एक!

मागच्या लेखातील बग्स बनीचा भांडखोर जोडीदार! मिकी आणि डोनाल्डचे जसे नाते तसेच थोडेफार यांचेही! परंतु बग्स नेहमीच उजवा राहिला आहे.

वू-हू-वू-हू असे बिनधास्त ओरडणारा, जन्माने व राष्ट्रीयत्वाने अमेरिकन (काळ्या रंगाच्या) पुरुष असलेल्या बदकाचा हा  प्रवास वाचायलाच हवा! या काळात त्याला इतर अनेक कंपन्यांतील पात्रांना लढत द्यायची होती. शिवाय त्याच्याच कंपनीतल्या बग्स बनीशीही स्पर्धा होती. आणि हा या स्पर्धेत अजूनही टिकला आहे. याला दोन बायका. एक खरी मेलीसा बदकीण आणि ‘लुनी टून शो’मध्ये पडद्यावरची टिना!

आधी खऱ्या बदकासारखा आडवा असणारा डफी आता खऱ्या बदकापेक्षा उंच व लांबलचक आहे. साधरण ३ फूट उंच. याला अमरत्वाचा पट्टा मिळालेला आहे. बंदुकीच्या गोळ्यांनीही मरत नाही. गळ्यावर पांढरी पट्टी, बरेचदा डोक्यावर हॅट आणि अंगात ओव्हरकोट असला तरी सतत खऱ्या प्राण्यांसारखा कुठलेही कपडे न घातलेला. त्यांची पिसे म्हणजेच त्यांचे कपडे हा विचार वेगळा आहे. हा माणसाच्या आवाजात आपल्याशी संवाद साधतो. प्राण्यांशीही त्याच भाषेत संवाद साधतो. अमेरिकेत बहुधा झाडांना, ढगांना, डोंगरांना ही इंग्रजी भाषा येत असावी. या सिनेमाची निर्मिती टेक्स अव्हेरी यांची तर डफी हे पात्र बॉब क्लामपेट यांचे! त्याच्या स्वभावात व देहबोलीत काळानुसार अनेक बदल होत गेले. यासाठी बॉबसह अजून चार आर्टिस्टने मदत केली. सुरुवातीचा आवाज मेल ब्लँक यांचा. त्यानंतर २०१८ पर्यंत ९ व्होकल आर्टिस्टने ही आवाजाची परंपरा पुढे वाहिली.

पात्रनिर्मिती व अ‍ॅनिमेटेड पात्र म्हणून डफी डकवर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदला आहे. अमेरिकन टपाल खात्याने त्याच्या निराशाजनक स्वभावाला हेरून २ टपाल तिकिटे तयार केली. आपल्याकडे कार्टूनला एवढा मान कुठे! शिवाय डफी डकवर १९८९ पासून ते २०१५ पर्यंत एकूण २४ व्हिडीओ गेम आधारलेले होते.

बऱ्याचशा अमेरिकन कार्टूनप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान डफीने अनेक युद्ध विषय असणाऱ्या कार्टून फिल्ममध्ये काम केलं. अमेरिकेच्या लष्कराच्या ६०० बोंबार्डमेंट स्क्वाड्रनसाठी डफी मॅस्कॉट म्हणून वापरण्यात आला. तुम्हाला लक्षात असेल, डोनाल्डदेखील अशाच एका तुकडीचे नेतृत्व करत होता.

डिस्ने कंपनीच्या डोनाल्ड डकला टक्कर देण्यासाठी साधरण तशाच आवेशाचे, स्वभावाचे डफी डक हे पात्र वॉर्नर ब्रॉस यांनी बनवले. डफी डकने सिनेमांसह दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्येही काम केले. अगदी २०१८ पर्यंत!

काळाचा महिमा कार्टून्सलादेखील चुकला नाही.

लुनी टून्सच्या बग्सला साथीला असणारे हे पात्र पुढे स्वत:च्या नावावर सिनेमा बनवू व चालवू लागले- जिथं बग्स बनी डफी डकला साहाय्यक म्हणून काम करू लागला. डफी डकला अनेक प्रकारे वापरलं गेलं. एका ठिकाणी त्याचा स्वभाव वेगळा तर दुसऱ्या सिनेमात त्याहून वेगळा दाखवला गेला. कार्टून समीक्षकांच्या मते, डफी हा असा बदक आहे जो कुठलीही भीड न बाळगता व्यक्त होतो. वाटेल ते करून-बोलून मोकळा होता आणि आपण प्रेक्षक मात्र चारचौघात असे करायला घाबरतो. त्यामुळे हा त्या काळातील कार्टून विश्वातला उत्कृष्ट नमुना (मास्टरपीस) आहे. त्यामुळेच याला अमेरिकेच्या राष्ट्रीय फिल्म रेजिस्ट्रीमध्ये संग्रहित केले गेले. अनेक लहान मुलं याच्या उटपटांग आवाहन खरे मानून अनुकरण करू लागली. हे पहिलं असं कार्टून आहे की काही केबल चालकांनी काही भाग संपादित (एडिट) केला. जगातील ५० महत्त्वाच्या कार्टून पात्रातील यादीत हा कडकनाथ बदक ऊर्फ डफी डक चौदाव्या स्थानावर आहे.

chitrapatang@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Moral story for kids in marathi

ताज्या बातम्या