आज सकाळपासून छोटय़ा जुईची अगदी धांदल उडाली होती. कधी एकदा शाळेची वेळ होते आणि आपण शाळेत जातोय असं झालं होतं जुईला. कारण आजचा दिवस जुईसाठी खास होता. आजच्या दिवसाची ती गेली कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होती. आज तिच्या शाळेत फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती. गेले कित्येक दिवस ती या स्पर्धेची तयारी करत होती. तिने आधीपासूनच ठरवलं होतं की, आपण सोनपरी व्हायचं. आईनं जुईकरिता छानपैकी फ्रिल्सचा फ्रॉकही शिवून घेतला होता आणि त्या फ्रॉकला छानपैकी सोनेरी, चंदेरी चमचमत्या टिकल्या लावल्या होत्या. एक नाजूकसा चमचमणारा मुकुटही बनवला होता. इतकेच नव्हे, तर एका टिपरीला थर्माकोलची चांदणी चिकटवली होती, त्या टिपरीला छानपैकी सोनेरी कागद चिकटवला होता आणि चांदणीला सोनेरी रंग देऊन सोनपरीची छडी तयार केली होती. जुईने किती तरी वेळा तो सगळा सोनपरीचा ड्रेस घालून बघितला होता आणि हातात जादूची छडी घेऊन खूप खूप मिरवूनही झालं होतं. शेवटी काल आई रागावून म्हणालीच, ‘‘अगं बबडे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या आधीच पार वाट लावून टाकशील त्या परीच्या ड्रेसची.’’
‘‘नाही गं आई, मी ना प्रॅक्टिस करतेय,’’ असं म्हणून जुईनं आरशासमोर उभं राहून आईनं लिहून दिलेलं गाणं अगदी खणखणीत आवाजात जादूची छडी फिरवत म्हटलं-
‘‘सोनपरी मी सोनपरी
लाडकी आहे घरोघरी
हाती धरूनी ही जादूची छडी
सुंदर सुंदर जादू करी’’
आणि मग सगळं काही नीट जपून घडी करून ठेवत म्हणाली, ‘‘आई, झाली माझी प्रॅक्टिस. बघच तू, मलाच मिळणार पहिलं बक्षीस.’’ जुईला अगदी खात्रीच होती की, या स्पर्धेत तीच बक्षीस मिळवणार..
शेवटी आज तो फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा दिवस उजाडला. आईने जुईला छानपैकी तयार केलं आणि शाळेत सोडलं. जुई शाळेतून येताना शाळेच्या बसमधूनच येणार होती.
जुई शाळेतून आली तीच मुळी रडत. सगळा सोनपरीचा थाट तिने पटापट काढून टाकला आणि इकडेतिकडे भिरकावून दिला. आईच्या लक्षात आलंच की, काय झालं असणार. आई तिला समजावून सांगू लागली, ‘‘बबडे, तुझी सोनपरीसुद्धा खूप छान झाली असणार, पण इतक्या सगळ्या मुलांमध्ये तीनच जण निवडता येतात ना बक्षिसासाठी.’’
‘‘मुळीच नाही. खूप घाण झालेली सोनपरी. पहिलं बक्षीस त्या डॉक्टर झालेल्या मुलाला, दुसरं त्या जोकर बनलेल्या मुलीला आणि तिसरं भाजीवाली झालेल्या मुलीला मिळालं. माझी सोनपरी घाणेरडी झाली होती. आता मी कध्धी कध्धीच भाग घेणार नाही स्पर्धेत.’’ असं म्हणून जुई आणखीन जोरजोराने रडू लागली.
आई तिला जवळ घेऊन म्हणाली, ‘‘वेडी आहेस का तू? बक्षीस नाही मिळालं म्हणून काय कुणी स्पर्धेत भाग घेणं सोडतं? मग तर स्पर्धाच होणार नाहीत, कारण तुमच्या वर्गातल्या चाळीस जणांपैकी फक्त तिघांनाच बक्षीस मिळालंय, मग उरलेल्या मुलांनी बक्षीस मिळालं नाही म्हणून पुढच्या वर्षी स्पर्धेत भागच घेतला नाही तर?’’
‘‘नाही, मी आता स्पर्धेत भाग घेणार नाही.’’ जुई हट्टाने म्हणाली.
‘‘बरं, मग मी आणि बाबा देऊ का तुला बक्षीस?’’ आईने विचारलं.
‘‘नाही, मला नकोय असं खोटं खोटं बक्षीस.’’ जुई आणखी चिडून म्हणाली.
‘‘खोटं नाही काही, मी तर म्हणेन खरं बक्षीस तुलाच मिळालंय.’’ आईनं असं म्हटल्यावर जुईनं आश्चर्यानं विचारलं, ‘‘ते कसं काय?’’
आई सांगू लागली, ‘‘हे बघ, आता तू फक्त इयत्ता तिसरीत आहेस, बरोबर? अजून तुला खूप खूप शिकायचंय, त्यात खूप स्पर्धा असतील. कधी तू जिंकशील तर कधी हरशील आणि हरणं म्हणजे काही खूऽऽऽप वाईट नाहीये बबडे.’’
‘‘ते कसं काय?’’ जुई स्वत:चं रडणं थांबवत म्हणाली.
आई तिला शांत करत म्हणाली, ‘‘कारण त्यातूनही आपण कित्येक नवीन गोष्टी शिकतो. बक्षीस नाही मिळालं की, आपण कुठे कमी पडलो याचा विचार करतो आणि स्वत:मध्ये सुधारणा करतो. दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेव- ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ आणि ‘प्रयत्नांती परमेश्वर’. आपण प्रयत्न करत राहायचं. अपयश मिळालं तरी खचून न जाता पुढच्या वेळेस मी आणखीन प्रयत्न करेन, अशी जिद्द निर्माण करायची. कळतंय का काही बबडे?’’ आईच्या या बोलण्यावर जुई एकदम काही तरी आठवून म्हणाली, ‘‘बाबांनी सांगितलंय ‘ट्राय ट्राय बट नेव्हर क्राय.’’
‘‘बरोब्बर! आता पटलं ना? मी स्पर्धेत भागच घेणार नाही, असं म्हणून मागे हटायचं नाही. पुढच्या वेळेस आणखीन प्रयत्न करेन, अशी निर्माण होणारी जिद्द हेच तुझं बक्षीस आहे जुई.’’
आईने जुईकडे पाहिलं. तिचं रडणं आता पूर्णपणे थांबलं होतं. तिला नक्की किती कळलंय याचा अंदाज घेत आईनं विचारलं, ‘‘घेणार ना पुन्हा स्पर्धेत भाग?’’
‘‘होऽऽ घेणार ना!’’ जुईनं अगदी सहजपणे म्हटलं आणि आईला कळलं की, तिला आयुष्यात या एका अनुभवाचं खरंखुरं बक्षीस मिळालंय.
राजश्री राजवाडे-काळे  – shriyakale@rediffmail.com

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Big blow for Lucknow Supergiants
IPL 2024 : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून झाला बाहेर
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद