scorecardresearch

कार्यरत चिमुकले.. : सुंदर जगासाठी..

पृथ्वीला- नदी, हवा, माती, पर्वत- आपल्या नंतर येणाऱ्या पिढय़ांना चांगल्या अवस्थेत दिलं पाहिजे ना! ते कसं?.. लहानग्यांना कृतीतून समजावून सांगणारी लेखमाला..

कार्यरत चिमुकले.. : सुंदर जगासाठी..
प्रतिनिधिक छायाचित्र image loksatta

अदिती देवधर

पृथ्वीला- नदी, हवा, माती, पर्वत- आपल्या नंतर येणाऱ्या पिढय़ांना चांगल्या अवस्थेत दिलं पाहिजे ना! ते कसं?.. लहानग्यांना कृतीतून समजावून सांगणारी लेखमाला..

खरं तर आज सुट्टीचा दिवस, पण आज यशला शाळेत जास्तीचा तास आहे. सुट्टीचा दिवस असल्यानं त्याचे नेहमीचे रिक्षाकाका येणार नाहीत, त्यामुळे तो सायकलनं शाळेत जाणार होता. पण तो शाळेत जायला म्हणून निघाला आणि बघतो तर काय, त्याच्या सायकलच्या मागच्या टायरमध्ये अजिबातच हवा नव्हती. एवढय़ा सकाळी सायकलमध्ये हवा भरायला कुठलं दुकानही उघडं नसतं. मग काय करायचं या विचार असतानाच शाळेला उशीर होईल म्हणून त्यानं त्याच्या मित्राची- यतीनची सायकल घेतली (अर्थात यतीनला विचारून) आणि तो शाळेत पोहोचला.

शाळेत जात असतानाच त्याच्या लक्षात आलं, यतीनच्या सायकलच्या मागच्या चाकात हवा कमी आहे. शाळेतून घरी येताना तो राजूकाकांच्या दुकानाशी थांबला, दोन्ही चाकांत हवा भरून घेतली. डावा ब्रेकसुद्धा जरा सैल वाटत होता, तो राजूकाकांना त्याने घट्ट करायला सांगितला. घरी पोहोचल्यावर त्यानं फडक्यानं सायकलवरची धूळ पुसली आणि मगच यतीनला सायकल परत दिली. सायकल परत देताना यतीनला तो ‘धन्यवाद’ म्हणाला.

यशनं कधीही एखाद्याची उसनी वस्तू घेतली असेल तर तो ती काळजीपूर्वक वापरतोच, पण परत देताना ती आपल्याला मिळाली त्यापेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहे ना, याची खात्री करून घेतो.

यशसारखंच आपणही आपल्या पृथ्वीला- नदी, हवा, माती, पर्वत- आपल्या नंतर येणाऱ्या पिढय़ांना चांगल्या अवस्थेत दिलं पाहिजे ना! ‘पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून वारसाहक्काने मिळालेली नाही, तर ती आपण पुढच्या पिढय़ांकडून उसनी घेत असतो.’ या वाक्याचा अर्थ काय? तर आपण वर जी यशची गोष्ट बघितली तो!

तुम्हाला वाटत असेल ना, आम्ही तर लहान मुलं आहोत. आम्ही काय करणार? तर याचं उत्तर आहे- तुम्ही खूप काही करू शकता.

म्हणजे नक्की काय?

तेच सांगायला यश, यतीन, संपदा आणि नेहा दर आठवडय़ाला आपल्या भेटीला येणार आहेत.

हे जग सुंदर आहेच, आपण सगळे मिळून ते आणखी सुंदर करू या. मग बच्चे लोक, तयार आहात ना आपल्या चौकडीला भेटण्यासाठी? aditideodhar2017@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 01:02 IST

संबंधित बातम्या