एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या िपपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (Siphon) विविध प्रकारे वापरता येते (आकृती १ पाहा). एका लांब, पोकळ नळीचे एक टोक उंचावरील टाकीतील पाण्यात बुडलेले असताना दुसऱ्या टोकाने तोंडाने पाणी खेचून पाण्याचा प्रवाह चालू करता येतो. नळीचे टाकीमधील टोक जोपर्यंत पाण्यात बुडलेले असेल तोपर्यंत पाणी वक्रनलिकेतून खाली पडत राहते. लवचिक नळी असेल तर प्रथम नळी टाकीत बुडवून नळीमध्ये पूर्ण पाणी भरून नळीचे वरील टोक बोटाने बंद करून नळी बाहेर काढावी व खाली आणून बोट काढल्यास पाण्याचा प्रवाह चालू होतो. ही पद्धत रॉकेल, डिझेल, सौम्य आम्ल इ. द्रवांसाठी फार उपयुक्त ठरते.
नळीतून पाणी किती प्रमाणात बाहेर पडेल (घ.सें.मी./सेकंद म्हणजेच मिलिलिटर /सेकंद) हे आकृतीत दाखविल्या h या उंचीवर अवलंबून आहे. यामध्ये h ची किंमत १०, २०, ३० सेंमी घेऊन भांडय़ात ५० किंवा १०० सेकंदांत किती पाणी जमा होते ते मोजून पाहा. (नळीचा अंतर्गत व्यास फार मोठा नसावा.) प्रयोगासाठी सलाइनच्या नळीचा वापर करा. नळीचे टाकीमधील टोक किती खोलवर बुडालेले आहे व नळी वर किती उंचीपर्यंत आहे (h’) यावर पाण्याचा प्रवाहाचा दर अवलंबून नसतो, हेसुद्धा साध्या प्रयोगांनी पडताळून पाहता येते. वक्रनलिकेच्या कार्यात हवेचा दाब ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. टाकीवर हवाबंद झाकण असेल तर सायफनचे कार्य बंद पडेल.
सायफनचा उपयोग करून फिश टँकमधील पाणी हळूहळू काढून नवीन पाणी घालता येते. तसेच, फिश टँकमधील तळाशी जमलेली घाण बाहेर काढून टाकता येते. सायफनच्या तत्त्वावरच शौचालयातील फ्लशचे कार्य चालते. सायफनचे अनेकविध प्रकार कारखान्यांमध्ये वापरले जातात.
एक मजेदार प्रयोग : वसुदेव पात्र किंवा वसुदेव पेला (आकृती २ पाहा) हे उपकरण सायफनच्या तत्त्वावर कार्य करते या पेल्यामध्ये हळूहळू पाणी भरत निरीक्षण केल्यास असे दिसते की पाणी एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचले की आपोआप पेल्याच्या तळाशी असलेल्या भोकातील नळीतून पाणी खाली गळू लागते व जवळजवळ सर्व पाणी नळीतून खाली गळून जाते. या पेल्याला वसुदेव पेला असे नाव पडण्यामागे मजेदार कथा आहे. कंसाच्या कैदेतून वसुदेव नवजात अर्भक (श्रीकृष्ण) घेऊन यमुना नदी पार करून जाताना यमुनेला महापूर आलेला असतो. वसुदेव पाण्यातून चालत नदी पार करण्याचा प्रयत्न करताना श्रीकृष्णाचा पाय यमुनेच्या पाण्याला लागताच झरझर पाणी ओसरते!
असे उपकरण स्वत: घरी बनवायचे असेल तर प्लास्टिकचा उभट पेला, सलाइनची नळी इ. साहित्य वापरून प्रयत्न करा. पेल्याच्या तळाशी मध्यभागी एक बारीक भोक पाडून त्यातून नळी सरकवून नळीचे पेल्यातील टोक वळवून परत तळाकडे तिरके टेकवा. यासाठी सेलोटेपचा वापर करून नळी पेल्याच्या आतमध्ये हलणार नाही अशी बसवा. नळी भोकात नीट घट्ट बसावी म्हणून अॅरेल्डाइट किंवा ग्लू वापरा. पेला पारदर्शक नसेल तर हा एक छानसा जादूचा प्रयोग वाटेल!
वसुदेव पेल्याच्या खाली एक तळाशी मोठेसे भोक पाडलेले प्लास्टिकचे भांडे उपडे घालून ठेवा व त्याच्या आत एक वाटी ठेवा म्हणजे पाणी सांडलेले दिसणार नाही.
महत्त्वाची सूचना : नळीमध्ये हवेचे बुडबुडे (Air Bubbles) व पाण्याचे थेंब असता कामा नयेत. कारण त्याच्यामुळे सायफनचे कार्य बंद पडते. रोग्याला इंजेक्शन देताना किंवा सलाइन लावताना डॉक्टर सिरिंजमध्ये हवेचा बुडबुडा कधीच येऊ देत नाहीत. कारण अशा हवेच्या बुडबुडय़ामुळे रक्तप्रवाहात अडथळे येऊन भयानक घटना घडू शकते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2013 रोजी प्रकाशित
दिमाग की बत्ती.. : वक्रनलिका
एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या िपपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (र्रस्र्ँल्ल) विविध प्रकारे वापरता येते (आकृती १ पाहा).

First published on: 16-06-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science practical