एका नगरामध्ये एक राजा होता. राजा स्वत: कलांचा भोक्ता आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारा होता. राजाचे प्रजेवरही अतिशय प्रेम होते. दरबारात येणाऱ्या अनेक कलावंतांना राजा नेहमीच बक्षिसे देत असे, मदतही करीत असे. अनेक गायक, नर्तक, अभिनेते, कवी, चित्रकार असे अनेक कलाकार राजाच्या दरबारात येत असत आणि राजा त्यांचा योग्य तो सन्मान करीत असे. राजाचा द्वारपाल हे सर्व नेहमी पाहात असे. काही दिवसांनंतर द्वारपालाने येणाऱ्या कलावंतांना अडवायला सुरुवात केली. एका गायकाने त्याला काही पैसे देण्याचे मान्य केले आणि आत प्रवेश मिळविला. गाण्याचा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. राजाला गायकाचे फारच कौतुक वाटले. त्याने खूश होऊन गायकाला बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला. महाराजांना नमस्कार करून गायक दरबारातून बाहेर गेला. प्रवेशद्वाराशी द्वारपाल उभा होताच. त्याने गायकाकडे आपली रक्कम मागितली. गायकानेही नाइलाजाने काही रक्कम दिली आणि तो आपल्या घराकडे निघून गेला.
असेच अनेक दिवस गेले. आता द्वारपाल येणाऱ्या कलावंतांकडून कधी गोड बोलून, कधी विनंती करून तर कधी दमदाटी करून आपलं ‘कमिशन’ मागू लागला. आणि काही न बोलता कलाकारही नाइलाजाने त्या द्वारपालाला तो मागेल तेवढे पैसे देऊ लागले.
एक दिवस एक चित्रकार आपले चित्रकलेचे कौशल्य दाखविण्यासाठी आपली चित्रं घेऊन राजाकडे आला. राजदरबारात प्रवेश देण्यास द्वाररक्षकाने साफ नकार दिला. त्यांच्यात वादावादी झाली. द्वाररक्षकाने सरळ सरळ बक्षिसाच्या रकमेचा अर्धा भागच मागितला. ‘ठीक आहे. अर्धा भाग तुम्हाला देईन.’ असं कबूल करून चित्रकाराने दरबारात जाण्यासाठी आत प्रवेश मिळविला. पण या द्वाररक्षकाचा आज आपण पर्दाफाशच करायचा असा निश्चय करूनच चित्रकाराने राजदरबारात प्रवेश केला.
दरबारात येताच राजानेही चित्रकाराचे हसून स्वागत केले आणि चित्रकारानेही राजाला नमस्कार केला. राजाने त्याची सर्व चित्रे पाहिली आणि ‘अहो कलावंत! मग आज कोणत्या चित्राने आमचे डोळे संतुष्ट करणार?’ असे चित्रकाराला विचारताच चित्रकाराने राजाला आवडेल असे चित्र काढले. ते रंगांच्या साहाय्याने पूर्ण केले. दरबारातल्या प्रेक्षकांनीही चित्र पूर्ण होताच टाळ्या वाजवून चित्रकाराचे कौतुक केले. राजा तर चित्र पाहून खूपच खूश झाला. म्हणाला, ‘चित्रकार महाशय, बोला काय बक्षीस हवं? तुम्ही मागाल ते बक्षीस मी देईन.’
चित्रकार म्हणाला, ‘महाराज मला चाबकाचे दहा फटके बक्षीस म्हणून द्यावेत.’
महाराज म्हणाले, ‘चित्रकार, आपण शुद्धीवर आहात ना? हे काय मागता?’
तरीही चित्रकार म्हणाला, ‘महाराज, मी पूर्ण सावध राहूनच दहा फटके मागतो आहे. आपण माझी काळजी करू नये.’
‘ठीक आहे.’ राजा म्हणाला. आणि राजाने सेवकांना चाबूक आणण्यास सांगितले. सेवक चाबूक घेऊन आले. ‘चित्रकार, आपला निर्णय पक्का आहे ना?’ राजाने विचारले. ‘होय महाराज, पण माझी एक विनंती आहे. आपल्या द्वाररक्षकालाही जरा आत बोलवावे.’
सेवकांनी द्वाररक्षकालाही दरबारात बोलाविले. द्वाररक्षक घाबरला. पण महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्याला दरबारात यावे लागले.
द्वाररक्षक दरबारात येताच चित्रकार जोरात ओरडला, ‘माझ्या बक्षिसाची अर्धी रक्कम या द्वाररक्षकाला देण्याचे कबूल केल्यावरच याने मला दरबारात प्रवेश करण्यास परवानगी दिली. म्हणून बक्षिसाची अर्धी रक्कम म्हणजेच पहिले पाच फटके द्वाररक्षकाला द्यावेत आणि उरलेले पाच मला द्यावेत.’
दरबारातील सर्वाना आणि महाराजांनाही सर्व उलगडा झाला. महाराजांनी स्वत:च द्वाररक्षकाला सर्वाच्यासमोर पाचच काय त्याहीपेक्षा जास्त चाबकाचे फटके मारले. द्वाररक्षकाने गुन्ह्य़ाची कबुली दिली. सेवकांनी द्वाररक्षकाने घेतलेली रक्कम आणि इतर बक्षिसाच्या वस्तू त्याच्याकडून परत मिळविल्या. ज्यांच्या होत्या त्यांना त्या परत दिल्या. द्वाररक्षकाला कैदेत पाठविले. द्वाररक्षकाचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल चित्रकाराला बक्षीस दिले आणि उत्कृष्ट चित्राबद्दल चित्रकाराचे कौतुक केले आणि योग्य ते बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला.