डॉ. स्वरूपा निखिल भागवत
गिरगावातल्या चिकूवाडीमध्ये त्या दिवशी एक फलक लागला होता. त्यावर लिहिले होते- ‘मंगळवार, दिनांक १४ जून २०२२ रोजी आपल्या वाडीत रक्तदान शिबीर होणार आहे. करू या रक्तदान, वाचवू या प्राण.’ मुलांचा एक घोळका तो फलक वाचत उभा होता. ‘हे रक्तदान शिबीर म्हणजे काय असतं रे प्रणवदादा?’ फलक वाचून दहा वर्षांच्या पार्थने विचारलं. बारा वर्षांचा प्रणव म्हणाला, ‘‘मी ऐकला आहे हा शब्द. माझे बाबा आजारी होते तेव्हा माझ्या मामानं रक्तदान केलं असं आई म्हणाली होती.’’ तोपर्यंत वाडीतली बाकीची बच्चेकंपनीही तिथे जमा झाली. ‘‘मला रक्तदानाबद्दल थोडंसं माहीत आहे. अरे, पण आपण सायलीताईकडे जाऊन तिलाच विचारू या ना! डॉक्टर आहे ना ती.. छान माहिती सांगेल आपल्याला.’’ मुलांमध्ये सर्वात मोठी असलेली रिया म्हणाली.

‘‘हो, हो, चला..’’ असं म्हणत सगळी मुलं मोठय़ा उत्साहानं त्यांच्या लाडक्या सायलीताईकडे पळाली.आपल्या छोटय़ा दोस्तांना असं अचानक आलेलं पाहून सायलीताईला आश्चर्य वाटलं.‘‘सायलीताई, रक्तदान शिबीर म्हणजे काय असतं, सांग ना तू आम्हाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एका शिबिराला गेले होते. ते शिबीर माहीत आहे. पण आता हे कुठलं शिबीर?’’ सानवीनं एका दमात विचारून टाकलं.‘‘अच्छा! म्हणजे खालचा फलक वाचून आला आहात तर तुम्ही! मला खूप बरं वाटलं तुमचा उत्साह बघून. मी सगळं सांगते तुम्हाला,’’ असं म्हणत सायलीताईने सुरुवात केली.‘दान’ या शब्दाचा अर्थ ‘देणं’! बरोबर? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीरातलं थोडंसं रक्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी देते, म्हणजेच दान करते, तेव्हा त्याला म्हणायचं ‘रक्तदान’ किंवा ब्लड डोनेशन. तर मग आता रक्त देणारी व्यक्ती कोण आणि रक्त घेणारी व्यक्ती कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?’’
त्यावर प्रणव म्हणाला, ‘‘एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला दुसऱ्या व्यक्तीकडून रक्त घेण्याची गरज पडते ना?’’

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

‘‘हो प्रणव. अगदी बरोबर. सगळे नाहीत, पण काही आजार असे आहेत की ज्यामध्ये रक्तातील घटक योग्य प्रकारे काम करत नाहीत, किंवा शरीरात रक्ताचीच कमतरता असते. त्यामुळे मग त्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. त्यांना त्या आजारातून बरे करण्याचा किंवा त्यांचा जीव वाचवण्याचा उपाय कोणता? तर एखाद्या निरोगी व्यक्तीनं आपलं स्वत:चं निरोगी रक्त या आजारी व्यक्तीला द्यायचं, हेच त्याच्यावरचं औषध.’’पार्थने विचारलं, ‘‘पण हे औषध दुसऱ्या माणसाकडून का घ्यायचं? दुकानात नाही का हे रक्त मिळत?’’‘‘नाही ना. तुम्हाला सर्दी-खोकला झाल्यावर किंवा ताप आल्यावर डॉक्टरकाका जी औषधे देतात ती प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात बनवता येतात. पण रक्त तसं बनवता येत नाही. ते फक्त शरीरातच तयार होतं. म्हणूनच एका निरोगी माणसानं आपलं रक्त देऊन दुसऱ्या आजारी माणसाचे प्राण वाचवले तर ती खूप मोठी गोष्ट आहे ना? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी, आपल्या माणसांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे ना! आपल्या चिकूवाडीनंसुद्धा हे छान काम करायचं ठरवलं आहे बरं का! ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी येऊन रक्तदान करावं असं सांगितलं आहे सगळ्यांना. इथे एका ठिकाणी अनेक जण आपल्या इच्छेने रक्तदान करू शकतात. म्हणून याला म्हणायचं रक्तदान शिबीर.’’

रिया म्हणाली, ‘‘कित्ती छान! म्हणजे रक्तदान ही एक प्रकारची समाजसेवाच आहे. पण माझा एक प्रश्न आहे.. जर एका माणसानं त्याचं रक्त दुसऱ्याला दिलं तर त्याच्या स्वत:च्या शरीरातलं रक्त कमी होऊन त्याला त्रास नाही का होणार?’’‘‘छान प्रश्न विचारलास, रिया. मोठय़ा माणसांच्या शरीरात साधारणपणे साडेचार ते पाच लिटर एवढं रक्त असतं. त्यातलं फक्त साडेतीनशे किंवा साडेचारशे मिलिलीटर इतकंच रक्त एका वेळेस काढलं जातं. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हे रक्त काही दिवसांत पुन्हा नव्याने तयार होते. त्यामुळे त्याला त्याचा तसा काही त्रास होत नाही. रक्तदानाच्या वेळेस डॉक्टरांची टीमसुद्धा तेथे असते. ज्याला रक्तदान करायचं आहे त्याचं वजन, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर वगैरे डॉक्टर तपासतात आणि ती व्यक्ती एकंदर निरोगी आहे की नाही, हेही पाहतात. निरोगी नसेल तर मात्र त्याचा त्रास रक्त देणारा आणि रक्त घेणारा अशा दोघांनाही होऊ शकतो. त्या परिस्थितीत रक्तदान करायचं नसतं. हे सगळं कसं करतात ते बघायला तुम्ही यायचं आहे हं शिबिरामध्ये.’’

‘‘फक्त बघायला यायचं म्हणजे? आम्ही नाही करायचं रक्तदान?’’ सानवीने विचारले. तिच्या डोक्यावरून कौतुकाने हात फिरवीत सायलीताई म्हणाली, ‘‘नाही बाळांनो, मी तुम्हाला हेच सांगणार होते. तुम्ही अठरा वर्षांचे झालात ना, की मग रक्तदान करू शकता. अगदी नियमितपणे. म्हणजे पुरुष दर तीन महिन्यांनी आणि स्त्रिया दर चार महिन्यांनी रक्तदान करू शकतात. अगदी पासष्ट वर्षांचे होईपर्यंत. पण आता तुम्ही तुमच्या आई-बाबांना सांगायचं रक्तदानाबद्दल आणि रक्तदान शिबिराबद्दल.’’मुले एका सुरात ‘‘होऽऽऽ’’ म्हणाली. मग वेदांतने विचारले, ‘‘ताई, तू मघाशी म्हणालीस की काही आजारांमध्ये रक्त घेण्याची गरज पडते. त्याबद्दल सांगशील जरा?’’

‘‘तुम्ही शाळेत जीवशास्त्रामध्ये शिकला असालच की रक्तामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि ते आपापले काम करत असतात. लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि ते संपूर्ण शरीराला प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करत असतं. जर लाल पेशी व्यवस्थित काम करत नसतील तर ऑक्सिजन मिळेल का? तुम्ही ‘थॅलॅसेमिया मेजर’ या आजाराबद्दल ऐकलं आहे का? हिमोग्लोबिनमध्ये जन्मत:च बिघाड असल्यामुळे या छोटय़ा मुलांना वारंवार रक्त घ्यावं लागतं. दुसऱ्यांनी दिलेल्या रक्तावरच या लहान मुलांचा जीव अवलंबून असतो. शिकायचं, खेळायचं वय असताना त्यांना रक्त घ्यायला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. इतरांनी रक्तदान केलं तरच त्यांना रक्त मिळणार ना?’’ मुले ऐकता ऐकता एकदम गंभीर झाली. ताई पुढे म्हणाली, ‘‘डेंग्यू, मलेरिया या आजारांची नावं तुम्ही ऐकली आहेत. यामध्ये काही वेळा रक्तातील एका घटकाची- म्हणजे प्लेटलेटची संख्या कमी होऊन रक्त बाहेर वाहायला लागतं. कधी कधी अपघातामुळे मोठी जखम होऊन रक्त वाहून गेलं तर.. किंवा काही आजार तर असे आहेत, ज्यांमध्ये रक्त गोठत नाही आणि छोटी जखम झाली तर तीसुद्धा भळाभळा वाहायला लागते. मग अशावेळी रक्त देऊनच त्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो. आणि तुम्हाला हे माहीत आहे का, की एका रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचवता येतात..’’ मुलांना खूप आश्चर्य वाटलं. ताईने आता कागद व पेन्सिल घेतली आणि चित्रे काढून ती मुलांना समजवायला लागली.

‘‘रक्तदानाच्या वेळेस रक्त एका पिशवीत गोळा केलं जातं आणि ते रक्तपेढीमध्ये साठवलं जातं. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जशी बँक असते तसं दान केलेलं रक्तसुद्धा एका ठिकाणी सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवलं जातं. त्या जागेला म्हणायचं रक्तपेढी किंवा ब्लड बॅंक. रक्तपेढीमध्ये रक्तातले तीन घटक वेगवेगळे केले जातात. मग ज्यांना लाल पेशींची गरज आहे त्यांना लाल पेशी, प्लेटलेट्सची गरज आहे त्यांना प्लेटलेट्स आणि ज्यांना रक्त गोठू न शकण्याचे आजार आहेत त्यांना प्लाझ्मा.. असे हे तीन घटक वेगवेगळ्या व्यक्तींना दिले जातात. म्हणजेच एका रक्तदानाचा फायदा तीन आजारी व्यक्तींना मिळू शकतो आणि त्यांचे प्राण वाचू शकतात.’’

मुले खूप उत्सुकतेने ऐकत होती. त्यांचे कुतूहल वाढले होते. प्रणवने विचारले, ‘‘रक्तदानाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली गं ताई?’’
‘‘साधारण तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये प्राण्यांचं रक्त काढून आजारी माणसाला दिलं गेलं. पण त्याचा त्या माणसांना खूप त्रास झाला. मग मात्र अनेक शोध लागले आणि माणसांचं रक्तच माणसांसाठी वापरलं जाऊ लागलं. पण अजूनही रक्तगटांचा शोध लागला नव्हता. रक्तगट म्हणजे ब्लड ग्रुप. माहीत आहेत ना तुम्हाला?’’‘‘हो. माझा ‘बी’ पॉझिटिव्ह..’’ ‘‘माझा ‘ओ’ निगेटिव्ह..’’ ‘‘माझा ‘एबी’ पॉझिटिव्ह..’’ मुलांनी एकच गलका केला.ताईने आणखी माहिती सांगितली. ‘‘रक्तगटांचा शोध १९०० साली लागला. कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने ‘ए’, ‘बी’, ‘ओ’ या रक्तगटांचा शोध लावला. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये इतर रक्तगटांचेही शोध लागले. त्यामुळे त्या, त्या रक्तगटांप्रमाणे रक्त देणं शक्य झालं. म्हणजे ‘बी’ पॉझिटिव्हला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त याप्रमाणे. ‘ए’, ‘बी’, ‘ओ’ या रक्तगटाच्या महत्त्वाच्या शोधासाठी लँडस्टायनर यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांचा जन्मदिवस १४ जून हा दरवर्षी ‘जागतिक रक्तदाता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी जगभर रक्तदान शिबिरं भरवली जातात. तसं आपल्या वाडीतही शिबीर आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की इतर वेळेस आपण रक्तदान करू शकत नाही. रक्ताची गरज कुणालाही आणि केव्हाही लागू शकते. त्यामुळे नियमितपणे रक्तदान करायचं असतं.. शिबिरात किंवा जवळच्या रक्तपेढीत जाऊन.’’

‘‘हो, मोठं झाल्यावर आपण नक्की रक्तदान करायचं.’’ मुलांचं एकमत झालं.‘‘खूप छान मुलांनो! आणि यातली सुंदर गोष्ट अशी की यामध्ये गरीब-श्रीमंत, धर्म, जात असा कुठलाच भेदभाव नसतो. या गोष्टी रक्तदानाच्या आड येऊच शकत नाहीत. आपण सर्वजण एकच आहोत ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला माहीत नसतं की आपलं रक्त कोणाला मिळालं आहे. आणि आजारी व्यक्तीलाही माहीत नसतं की आपले प्राण कुणी वाचवलेत. तरीसुद्धा त्यांच्यात एक ‘रक्ताचं नातं’ निर्माण होतं. हो ना? आणि रक्तदान केल्यावर एक समाधानही मिळतं. मी गेल्या वर्षी रक्तदान केलं होतं आणि आता शिबिरामध्ये पण करणार आहे. तेव्हा काय लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनी.. करू या रक्तदान..’’ ताईच्या सुरात सूर मिळवत मुले म्हणाली, ‘‘आणि वाचवू या प्राण.’’

शाळेची घंटा वाजली..
खूप मोठ्ठी सुट्टी संपली
शाळेची घंटा वाजली
दारं वर्गाची खुली झाली
श्वास मोकळा घेती झाली

पेंगुळलेल्या बाकांना
जाग आली खाडकन्
गालातल्या गालात ती
हसली कशी खुदकन्

भिंतीवरच्या फळ्याचा
आनंद गगनात मावेना
हळूच म्हणाला खडूला,
छान सुविचार लिही ना!

घंटेनं दिला इशारा
स्वागतास सज्ज वर्ग
पावलं वाजली मुलांची
वर्गाचा झाला स्वर्ग!- गौरी कुलकर्णी

निसर्गचक्र
फाल्गुन, चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षांत
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा
उमलते पान न् पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा- एकनाथ आव्हाड
bhagwatswarupa@yahoo.com