News Flash

तक्षशिला ते ‘अद्भुतनाथ’!

गांधार देशांतील शत्रूंचा नाश करण्यासाठी रामाने भरताला धाडले. भरताने त्यांचा बीमोड केला.

तक्षशिला - भग्न स्तूपाचे वर्तमानकालीन छायाचित्र (विकिपीडिया)

प्रदीप आपटे

कनिंगहॅमने अनेक ग्रंथांचा आधार तक्षशिला नगरीच्या शोधासाठी घेतला, पण ग्रंथांतील माहिती अपुरी, म्हणून स्वत:च अदमास बांधावे लागले. लयास गेलेल्या संस्कृतीचे दर्शन त्यातून घडले, मात्र वर्तमान संस्कृतीसुद्धा माहितीला वळसे घालते ती कशी, हे ‘चरणपाद’ तसेच ‘अद्भुतनाथ’ यांसारख्या उदाहरणांतून त्याला दिसले!

अलेक्झांडर कनिंगहॅमचा संशोधन आणि सर्वेक्षणातला चमू फार मोठा नसायचा. गरज पडेल, जरूर वाटेल तेवढे स्थानिक लोक घेऊ न काम उरकण्याची त्यांची रीत होती. पण काही प्रश्न मनुष्यबळाने सुटणारे नसतात. बऱ्याचदा स्थानिक लोकांना फार वेगळी माहिती असते असेही नाही. कनिंगहॅमचे झपाटलेपण, अथक चिकित्सा आणि चिकाटीचे एक उदाहरण म्हणजे त्याने तक्षशिला नगरी कुठे असेल याचा घेतलेला वेध!

तक्षशिला (म्हणजे शब्दश: पाषाणात कोरलेली नगरी) हे अगदी प्राचीन नगर! त्याबद्दलचे वाङ्मयीन पुरावे पुष्कळ होते. रामायणातील उत्तर कांडात त्याचे असे वर्णन आहे :

हतेषु तेषु सर्वेषु भरत: कैकयी सुत:

निवेशयामास तदा समृद्धे द्वे पुरोत्तम

तक्ष तक्षशिलायां तु पुष्कलं पुष्कलावते

गंधर्वदेशे रुचिरे गान्धार विषये च स:

गांधार देशांतील शत्रूंचा नाश करण्यासाठी रामाने भरताला धाडले. भरताने त्यांचा बीमोड केला. आपल्या तक्ष आणि पुष्कल या दोन पुत्रांसाठी नगरे वसविली. त्यांची नावे तक्षशिला आणि पुष्कलावती. ही दोन्ही नगरे उत्कृष्ट आणि धनधान्य समृद्ध होती. या रघुवंशाची तेथील राजवट किती काळ होती ते निश्चित माहीत नाही. महाभारतात त्याचा उल्लेख येतो स्वर्गारोहणपर्वात. जनमेजयाचे सर्पसत्र येथेच झाले असे उल्लेखांवरून दिसते. गौतम बुद्धकाळात तिथला राजा पक्कुसातीने मगधाचा राजा बिंबिसाराकडे प्रतिनिधी पाठविले होते. खुद्द अशोक युवराज असताना याच भागात प्रथम जम बसवून राहिला. मौर्य काळात हे एक महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र होते. बौद्ध जातकांत तक्षशिलेचा ‘गांधार देशाची राजधानी’ म्हणून उल्लेख आढळतो. ह्याुएनत्सांगपर्यंत या नगराचे वर्णन २६०० वर्षांपूर्वी कुरुष या इराणच्या शासकाने तक्षशिलेवर कब्जा केला आणि बरीच वर्षे तेथे हुकमत चालविली, असेही झाले. सिकंदराच्या स्वारीच्या वेळी इथल्या राजाचा उल्लेख बसिलिअस आणि ताक्सिलिज असा केलेला आढळतो. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात इथे एक मोठे विद्यापीठ होते. पाणिनीसारखा वैय्याकरणी तक्षशिला विद्यापीठात होता. अख्यामेदीन साम्राज्य, मौर्य साम्राज्य- हिन्दी- ग्रीक हिन्दी- सिथियन अशा कितीतरी ऐतिहासिक वारशाचा घटनांचा साक्षीदार असलेले हे नगर. ते बुद्ध पंथाचे मोठे ख्यातनाम ठिकाण होते. त्या नगराचे अनेक लेखी पुरावे, उल्लेख, वर्णने भरपूर उपलब्ध होती. सर्वच लेखी उल्लेखांनुसार तक्षशिला विशाल संपन्न आणि मोठ्या लोकवस्तीचे नगर होते. ग्रीक लेखकांनी दिलेली माहिती वापरून तेथील संपत्तीचे अंदाजदेखील कनिंगहॅमच्या अहवालात नोंदले आहेत. परंतु हे नगर नेमके कुठे होते हे काही उलगडत नव्हते. कारण ग्रीक थोरल्या प्लायनीने केलेले उल्लेख दिशा आणि अंतरे सदोष होती. त्याचा शोध घ्यायचा तरी कुठे?

‘तक्षशिला होती तरी कुठे’ हा दीर्घकाळ अनुत्तरित प्रश्न सोडवण्यासाठी कनिंगहॅमने कशी यशस्वी अटकळ बांधली त्याचे वर्णन त्याच्या अहवालात आहे.

‘‘या सुप्रसिद्ध नगराचे नेमके ठिकाण आजवर अज्ञात राहिले आहे… प्लायनीच्या सगळ्या प्रती ताडून बघितल्या. प्लायनीने उल्लेख केले त्यानुसार तक्षशिला प्युकोलटिस ऊर्फ हश्तनगरपासून साठ रोमन मैलांवर आहे. म्हणजे ते कुठे तरी हरो नदी (दरिया ए हरो) जवळ हसन अब्दाल शहराच्या पश्चिमेला असणार (हसन अब्दाल हे पाकिस्तानमधले शहर शीखपंथाचे मोठे यात्रास्थळ आहे. तिथे पंजासाहिब गुरुद्वारा आहे. ह््युआनत्सांगने तक्षशिलापासून ‘सत्तर ली’ म्हणजे सुमारे २२ मैल अंतरावर एक पवित्र एलापत्र निर्झराचा उल्लेख केला आहे. पंजासाहिब त्याच झऱ्यावर आहे.) चिनी यात्रेकरूंनी जो मार्ग लिहिला आहे त्यानुसार ते स्थळ ‘सिंधू नदीच्या पूर्वेला’ आहे आणि तीन दिवसांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचतो. मुघल सैन्याचे नेहमीचे सिंधूपासून तिसरा तळ ठोकायचे ठिकाण ‘कालका सराई’ इथेच आहे. ह्याुआनत्सांग चीनला परतला तेव्हा तो हत्तीवर सामान लादून चालला होता आणि तक्षशिला ते उत्खंड ऊर्फ ओहिंद पाशी सिंधू नदीपर्यंत पोहोचायला तीन दिवस लागले. सध्यादेखील अंतर जवळपास तसेच आणि तेवढेच आहे. तात्पर्य कालका सराईच्याच आसपास तक्षशिला असणार.’’

कनिंगहॅमने ‘‘अशा अटकळीनुसार शोध घेतला तर कालका सराईच्या ईशान्येला तटबंदी असलेले नगर आढळले. तिथे किमान ५५ स्तूप, २८ भिक्षुवास आणि नऊ मंदिरे अवशेषरूपाने दिसली. त्यातले दोन स्तूप तर मानकिआल स्तुपाएवढे मोठे होते.’’ प्लायनी फाहान ह््युआनत्सांग मुघल वृत्तांत या सगळ्याची साक्षेपी साक्ष तक्षशिलेच्या साक्षात्कारात साकारली! अशा महत्त्वाच्या प्राचीन नगराचे तग धरून राहिलेले ‘उर्वरित’ रूप शोधण्याचे नेमके ठिकाण सापडले आणि बघायला मिळाले याचा त्याला अभिमान होता. कनिंगहॅमनंतरदेखील या आसपासचे खूप विस्तृत संशोधन चालू राहिले.

अहवालातले दोन मजेशीर किस्सेही सांगायला पाहिजेत. पहिला बेदिबन (वेदिवन) नावाच्या हिंदू देवळाचा. हे चांगले बांधलेले चौसोपी आणि भोवती तटबंदी असलेले. आतमध्ये एक मोठी चौकोनी शिळा होती. त्यावरून तर या वेदिवन मंदिराचे नाव पडले होते. ही शिळा म्हणजे ‘भगवान का चरणपाद’! हा ‘चरणपाद’ दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद आणि एक फूट जाडीचा! त्यावर लोक फुले वाहात, इतर गोष्टीदेखील अर्पण करीत. हे भाविक बहुसंख्येने हिंदूच असायचे. सर्वेक्षण करताना औत्सुक्याने जाऊन कनिंगहॅमने त्या शिळेचे निरीक्षण केले. नीट निरखून पाहिले तर त्यावर उंचावून कोरलेली अक्षरे दिसली. (म्हणजे ती अक्षरे दगडात खड्डा करून खोदलेली नव्हती. उत्थित होती, उत्कीर्ण नव्हती) त्यावरती वाहिलेल्या गोष्टी झटकून पाहिल्या. तर अरबी लिपीतील सात ओळी होत्या. वाहिलेल्या तूप आणि पाण्यामुळे त्यातली बहुतेक अक्षरे झिजून ओसरली होती. त्यामुळे वाचण्यासारखी राहिली नव्हती. फक्त सन सबा अर्बेन (अरबा= चार आणि सबाह् =सात) हे शब्द दिसत होते. हिजरी सनाचा शतवाचक अंकाचा शब्द स्पष्ट नव्हता. तो ‘त्समान मयत’ म्हणजे ते बहुधा ८४७ या हिजरी सनाचा असावा. कुणा ‘मुसलमीना’चे ते थडगे असावे! पण ती मूळ शिळा काय आहे हे न तपासता चरणपादाची पूजाअर्चा फुले, कुंकू, तूप सारे सुरू होते!

दुसरा किस्सा अद््भुतनाथ देवाचा! ‘अंधार उज्यान’ नावाचे गाव सीतामढ़ीच्या पश्चिमेला चार मैलावर आहे. या ठिकाणी एके दिवशी रात्री खूप तोफेचा स्फोट झाल्यागत आवाज आला. तो पंचक्रोशीभर दुमदुमला. कनिंगहॅम आणि त्याचे सहकारी तेथे जवळच्या गावात होते. त्यांनीही तो ऐकला. तो एक उल्कापात होता. ती उल्केची शिळा चांगली मोठी वाटोळी होती. उल्का पडली तेव्हा ती पांढुरकी पण गरम होती. जसजशी गार पडली आणि धुतली तसा तिचा रंग काळवंडून गेला. ती वाटोळी उभट शिळा म्हणजे शिवपिंडच! स्थानिक ब्राह्मण पुजारी आणि कुणी एक वाराणसीचा ‘जोगी’ यांनी लगोलग त्या जागेभोवती साफसूफ करून चौथरा केला होता. अशी शिवपिंडी अवतरल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. फक्त आसपासच नव्हे दूरदूरवरून लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले होते. ही ख्याती कनिंगहॅमच्या कानी आली तेव्हा त्याने तिथे लगेच जायचे ठरविले. उत्तरेत खूप स्वयंभू शिवलिंग देवळे आहेत. त्यापैकी बरीच अशा धाटणीनेच उद्भवली असा त्याचा कयास होता.

कनिंगहॅम तेथे काहीच दिवसांत पोहोचला. त्या गावाला जणू यात्राच भरली होती. इतक्या अल्प दिवसांत त्याभोवती चौथरा बांधला गेला होता. देवळाच्या भिंतीचा आडोसा बांधता बांधता चांगला दोन फुटांपर्यंत वर आला होता. स्थानिक ब्राह्मण आणि वाराणसीच्या जोगीबुवांनी त्याचा पार कब्जा केला होता! कनिंगहॅम जवळच तंबूबाहेर बसून गर्दी न्याहाळत होता. तेथे लोकांनी वाहिलेल्या ‘दक्षिणे’चा अंदाज चांगला घसघशीत होता. सकाळी बरीच झुंबड होती. दुपार चढल्यावर ती जरा ओसरली. कनिंगहॅमने त्या शिळेचे आकारमान आणि वजन अदमासे मोजले. पण नुसते देऊळच झटदिशी साकारले होते असे नाही! त्याचे नामकरणही झाले होते आणि तेदेखील कर्णोपकर्णी झाले होते! या शिवपिंडीला नाव पडले होते ‘अद्भुतनाथ’! प्राचीन मंदिरे शोधणाऱ्याला नवजात अद्भुतनाथाचे मंदिरही डोळ्यादेखत वर येताना बघायला मिळाले!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:11 am

Web Title: article on takshshila to adbhutnath abn 97
Next Stories
1 ‘प्राचीन भारताचे भूवर्णन’
2 ‘अदृश्य’ स्तूपाचे दर्शन!
3 प्राचीन भूमिकन्यांचा ‘जनक’
Just Now!
X