15 August 2020

News Flash

समाधानी वृत्ती

वयाच्या साठीनंतर समाधानी आयुष्य जगायचे तर पन्नाशीपासूनच नियोजन करायला हवे.

वयाच्या साठीनंतर समाधानी आयुष्य जगायचे तर पन्नाशीपासूनच नियोजन करायला हवे. आमच्या दोन्ही मुलांच्या जबाबदाऱ्या ५०व्या वर्षी पूर्ण झाल्यामुळे आम्हाला आर्थिक नियोजन करणे सोपे गेले. पेन्शन नसली तरी पैसे अशा तऱ्हेने गुंतविले की ६५ वयानंतर सक्षम राहू. मी ६५व्या वर्षी क्लासमधे शिकवणे थांबविले. माझे पती सत्तरीनंतरही सल्लागार म्हणून काम करतात.

आर्थिक बाजू समाधानकारक असली की भरभरून जगणे सोपे होते. म्हणूनच मी रेणुताई गावस्करांच्या ‘एकलव्य बालशिक्षण न्यास’मध्ये १०वीच्या मुलांना ४ वर्षे पूर्णपणे मोफत गणित शिकविले. नात्यात किंवा ओळखीत कोणत्याही समारंभाचे बोलावणे आले की मी जाते व आनंद मिळवते. पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानांना तोटा नसतो. मी अशा कार्यक्रमांना जाते. नाटक, सिनेमा, टीव्ही, व्हाट्स अ‍ॅप आणि देशी विदेशी पर्यटन असतेच. ट्रॅव्हल कंपनीबरोबर गेल्यामुळे वेगवेगळ्या माणसांशी ओळखी होतात. संबंध पुढे राहिले किंवा नाही तरी १०/१५ दिवस मजेतच जातात. टीव्ही किंवा मोबाइलवर किती वेळ घालवायचा याला मर्यादा घातल्यामुळे वाचनाचा छंदही जोपासला.

माझी दोन मंडळे आहेत. स्वानंद मंडळात आम्ही ८/१० जणी दर महिन्याला एकेकीच्या घरी जमतो. खाणे पिणे व गप्पा असतातच पण २/३ विषय ठरवून, त्यातील एका विषयावर लिहून आणतो आणि प्रत्येक जण वाचतो. ‘भारतीय स्त्रीशक्ती जागरण’तर्फे चालविल्या जाणाऱ्या अभिव्यक्ती वाचक मंचाची मी सदस्य आहे. प्रत्येक महिन्यात पहिल्या मंगळवारी दुपारी आम्ही माझ्याकडे जमतो  आणि आम्ही विकत घेतलेल्या पुस्तकांची लायब्ररीप्रमाणे देवाणघेवाण करतो. सर्वाचे वाचून झाल्यावर पुस्तक जिचे तिला परत देतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची पुस्तकपेटीही आमच्याकडे आहे. या वाचलेल्या पुस्तकांवर आम्ही परीक्षण लिहून चर्चा करतो. चांगले वाचलेले वाचून दाखवितो. मंडळामध्ये पदाधिकारी नाही, सासू-सून संघर्षांवर गप्पा नाहीत.

‘भारतीय स्त्री-शक्ती जागरण’तर्फे दर वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होतो. कुसुमाग्रजांच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या मेळाव्यात विविध कार्यक्रम होतात. वाचनाच्या आवडीतूनच मी वाचकपत्र व छोटे लेख लिहू लागले. वृत्तपत्र व मासिकांमध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली. जास्तीत जास्त स्वावलंबनाने जगण्याचा प्रयत्न करणे, अडचणी आल्यातरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे, इगो दूर ठेवणे व आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंद मानून समाधानी वृत्ती ठेवण्यामुळे भरभरून जगता येते.

वासंती सिधये, पुणे

 

गळ्यात फलक अडकवून समाजप्रबोधन

मी वयाची ६० वष्रे पूर्ण झाल्यावर ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या नावाजलेल्या संस्थेमधून डेंटल टेक्निशिअन या पदावरून फेब्रुवारी २०१० मध्ये सेवानिवृत्त झालो. माझी पत्नी रमा गेले कित्येक वष्रे कर्करोगाशी उमेद न हारता झगडत होती. मला साथ देत होती. माझे आई व वडील या दोघांनी स्वत:च्या कार्यातून आणि संस्कारातून समाजकार्यासाठीची तळमळ आमच्यात रुजवली होती. विशेष करून सामाजिक कार्य करीत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्याही तितक्याच तळमळतेने पार पाडण्यास शिकविले होते.

सेवानिवृत्त झाल्यावर एक गोष्ट मात्र ठामपणे मनाशी ठरवली होती ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहून आपल्या आजूबाजूचा परिसर व माणसे यांना आनंदी करायचे. सर्वप्रथम माझ्या पत्नीची पूर्णत: जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे दिवसातला जवळजवळ ७५ टक्के वेळ तिच्याबरोबरच घालवत असे. उरलेल्या २५ टक्के वेळामध्ये ठरवलेल्या विविध गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. उदाहरणार्थ, आमच्या हाऊसिंग सोसायटीमधील आवारात असणाऱ्या झाडांची निगा राखणे. हे काम करत असताना एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळत होता. त्या झाडांना नवीन आलेली पालवी, फुले व काही ठिकाणी फळे पाहून, मनाला कृतार्थ वाटत होते. येणारे-जाणारे या माझ्या कामामध्ये त्यांना जमेल तसा सहभाग देत होते. या निमित्ताने सोसायटीमधील सर्व वयोगटातील माणसांबरोबर प्रेमाचा संवाद साधला जात होता.

कौटुंबिक स्तरावरदेखील काम करण्यात मला विलक्षण आनंद मिळत होता आणि अजूनही मिळतो आहे. घरातील कामांमध्ये अगदी निवडणे, टिपणे, जेवण करणे, घरातील वस्तूंची खरेदी या सर्वातून एक वेगळा प्रकारचा आनंद मिळत होता. जेवण करण्याबाबतदेखील असाच अनुभव होता. वेगवेगळ्या पाककृती यांच्याबाबतचे प्रयोग करताना वेगळाच अनुभव येई. हे सर्व काम सांभाळत असताना बँकेची अथवा पोस्टाची कामे करून आपले व्यवहार अद्ययावत ठेवणे, यामधील सुरक्षिततेची भावना मनाला आनंद देऊन जात होती. मिळणारे उत्पन्न जरी ठरावीक रकमेचे असले तरी त्याचा विनियोग व्यवस्थितपणे केल्यामुळे संसाराची गाडी रुळावरून घसरत नव्हती. आमच्या कॉलनीमधल्या ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी मला त्यांच्या संघामध्ये सदस्यत्व दिले. त्यानुसार त्यांचेदेखील काम मोठय़ा हौसेने सुरू केले. त्यामुळे जीवनात कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांचे ज्ञान झाले. पत्नीने मला माझ्या सामाजिक कार्य करण्याच्या इच्छेबद्दल आठवण करून दिली. मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलची प्रकर्षांने आठवण आली. तेथे मी पाच वष्रे काम केले. त्या वेळी तोंडांचा कर्करोग झालेले असंख्य रुग्ण मी पाहिले होते. त्यामधील, बहुतांश रुग्ण हे तरुण वयातील होते. तेव्हा तंबाखू, गुटखा, सिगारेट इत्यादी व्यसनापासून लोकांना परावृत्त करण्याचे काम निश्चयाने करायचे ठरवले. २६ जानेवारी २०११ रोजी मी गळ्यात दोन फलक (एक पुढे व एक मागे) असे अडकवून समाज प्रबोधनाचे हे कार्य सुरू केले. फलकावर तंबाखू किंवा गुटखा सेवनाचे दुष्परिणाम लिहिले होते. तसेच अशा दुष्परिणामांमुळे तंबाखू व गुटखा सेवन न करण्याचे आवाहन सर्वजनांस केले होते. हे दोन्ही फलक गळ्यात अडकवून काहीही न बोलता जास्तीत जास्त वेळ रेल्वे स्थानकावर उभे राहायचो व अजूनही राहतो. रेल्वे स्थानक ही जागा निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहचवावेत हे होते. अशा प्रकारचे फलक फिरवण्याचे काम गेली सहा वष्रे करीत आहे. माझ्या या तंबाखूविरोधी छोटय़ाशा अभियानाचा परिणाम विविध स्तरांतील लोकांवर झाल्याचे समजले. अनेकांनी आपली तंबाखू किंवा गुटखा सेवनाची सवय (व्यसन) सोडून दिल्याचे आपणहून सांगितले. या अभियानाबरोबर दुसऱ्या २ ते ३ समाजविधायक कार्यासाठी काम करण्याचे ठरवले. उदाहरणार्थ- ध्वनिप्रदूषण, स्वच्छता अभियान आणि मृत्यूनंतर अवयव-देहदान व त्यासाठी या विषयाचे फलक गळ्यामध्ये पुढे व मागे अडकवून समाजप्रबोधन करत होतो व अजूनही करतो.

रमेश डोंगरे, कांदिवली (पूर्व).

 

थांबला तो संपला

१९९९ मध्ये मी ‘गणित अध्यापक’पदावरून निवृत्त झालो. तत्पूर्वी मी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळात कार्यरत होतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित या रूक्ष आणि कंटाळवाण्या समाजल्या जाणाऱ्या विषयासंबंधी अभिरुची निर्माण व्हावी आणि ती वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने मी व्यक्तिश: आणि महामंडळामार्फत विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे कार्य करत होतो.

सेवानिवृत्त झाल्यावर एकदम खायला आलेले रिकामपण मला अस्वस्थ करू लागले. आपण सेवेत नसलो, तरीदेखील आपण विद्यार्थ्यांकरिता काही तरी करायलाच हवं असं मला तीव्रतेनं वाटू लागलं. विचारांती मला एक मार्ग सुचला. मुलांना गणिताची कोडी आवडतात. त्या आवडीचा उपयोग करून नवनवीन गणित कोडी तयार करून त्यांना मी मनोरंजक कथासाज चढवून त्या गणित कोडी कथा शाळांमध्ये जाऊन सांगण्याचा नि:शुल्क उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळू लागला. पण तेवढय़ानं माझं समाधान होईना. कारण आपण या उपक्रमाद्वारे फारच मर्यादित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, हे माझ्या लक्षात आले. ती व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने मी नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या संपादकांना भेटलो आणि ‘कोडं आमचं डोकं तुमचं’ हे साप्ताहिक सदर चालवण्याची माझी कल्पना त्यांना पटली, लवकरच माझे हे सदर सुरू झाले. मी तयार केलेल्या ‘गणित कोडे / कथा’ वाचकांना आवडू लागल्या. पुढे पुढे तर विद्यार्थी वाचकांबरोबरच बँक कर्मचारी, डॉक्टर, शेती, दुकान अशा व्यवसायातील आबालवृद्धदेखील माझ्या या उपक्रमात सहभागी झाले. आणि ‘कारवाँ बढताही गया’. माझा हा उपक्रम केवळ एक-दोनच नव्हे तर तब्बल साडेतीन वर्षे सुरू राहिला. निवडक गणित कोडी कथांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

मुलांकरिता मी, मुलांचे मासिक, किशोर आदी अंकांमधून लिहीत असतो. दर वर्षी इतरही नामवंत दिवाळी अंकांमधून माझे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित होत असते. माझी काही पुस्तकेदेखील प्रकाशित झाली. त्यांपैकी एक पुस्तक मी नाशिकला जाऊन कुसुमाग्रजांची भेट घेऊन त्यांना दिले. त्याप्रसंगी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. नंतर त्यांनी माझ्या पुस्तकावर संक्षिप्त स्वरूपाचे अभिप्राय पत्रदेखील पाठवले. तो ‘अमूल्य पत्र ठेवा’ मी माझ्या संग्राहात जपून ठेवला आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझा ‘बालसाहित्यातील योगदान’ म्हणून सत्कार झाला. आकाशवाणी नभोनाटय़ लिखाण. व्याख्याने, हे माझे उपक्रम वयाची सत्त्याहत्तरी उलटल्यानंतरही सुरूच आहेत. आजही कामात वेळ कसा निघून जातो? ते समजत नाही. अशा प्रकारे भरभरून जगताना, या जीवनांचा आपल्या परीने समाजाकरिता उपयोग होत आहे, याचे मला भरीव समाधान मिळत आहे. थांबायला वेळ नाही. ‘थांबला तो संपला.’ ही माझी धारणा आहे.

भालचंद्र देशपांडे, नागपूर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 12:26 am

Web Title: senior citizens share stories of life experiences with loksatta chaturanga part 15
Next Stories
1 आयुष्य नित्यनवे भासते
2 आनंददायी सेकंड इनिंग      
3 शोधिला मार्ग सुखी जीवनाचा
Just Now!
X