01vijay1मेष सभोवतालची परिस्थिती कशीही असो, त्याच्याशी तडजोड करून तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करता. या आठवडय़ात याच कारणामुळे सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे वाटाल. व्यापार-उद्योगात अनुभवी व्यक्तींकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे अवघड कामे सोपी होतील.  घरामध्ये इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळ पडली तर स्वत:च्या आवडी-निवडीवर मुरड घालाल. सगळ्यांसोबत वेळ मजेत घालवाल. मोठी खरेदी होईल.

वृषभ एकाच वेळी तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर तुम्ही सक्रिय असल्यामुळे वेळ आली कशी आणि गेली कशी हे समजणार नाही. व्यवसाय-उद्योगात एखाद्या नवीन पद्धतीचा प्रारंभ करण्यापूर्वी आवश्यक असणारी कायदेशीर बाजू लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कोणतीही सवलत द्यायला आढेवेढे घेतील. तुम्ही त्यांना खूश करून स्वत:चा मतलब साध्य कराल. घरामधला माहोल हलका-फुलका असेल.

मिथुन ग्रहमान संमिश्र आहे. घरामधले काम म्हटले की तुमच्या कपाळावर आठय़ा पडतात. पण या आठवडय़ात तेच काम तुम्ही आनंदाने कराल. सभोवतालच्या व्यक्तींशी कामासाठी गोडीगुलाबीने वागावे लागेल. व्यवसाय उद्योगात लांबलेल्या काही कामांना धक्का स्टार्ट या पद्धतीने गती द्याल. नोकरीच्या ठिकाणी कामात शॉर्टकट घेण्याचा तुमचा इरादा असेल. घरामध्ये सजावट करताना तुमच्यातील कल्पकतेची चुणूक दिसून येईल.

कर्क अनेक कामे एकाच वेळी करायची असल्याने तुमच्या मनाचा गोंधळ होईल. अशा वेळी एखाद्या युक्तीचा वापर करून तुमचे उद्दिष्ट तुम्ही साध्य कराल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाइकांना खूश ठेवण्यासाठी घडय़ाळ्याच्या काटय़ानुसार काम करत राहाल. नोकरीमध्ये या टेबलावरून त्या टेबलावर अशी तुमची स्थिती असेल. योग्य व्यक्तीची योग्य कारणाकरिता निवड कराल. घरामध्ये तरुणांना आपल्या पद्धतीनेच वागायला आवडेल. गाठीभेटी/ पाहुणचार याकरिता वेळ राखून ठेवा.

सिंह इतरांचा मूड कसाही असो, पण तुम्ही मात्र हलक्याफुलक्या मूडमध्ये असाल. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल. व्यापार-उद्योगामध्ये जगावेगळे आणि मोठे काम करून स्वत:कडे इतरांचे लक्ष वेधवावेसे वाटेल. सरकारी नियम नीट हाताळा. प्रतिष्ठित व्यक्तीचे मूड तुम्हाला सांभाळावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तींना चुचकारून काम करून घ्यावे लागेल. पाहुण्यांची व नातेवाईकांची सरबराई करण्यात बराच वेळ जाईल.

कन्या नियोजन केल्याशिवाय तुम्ही कोणतेही काम करत नाही. पण या आठवडय़ात तुम्हाला काय वाटते याला महत्त्व न देता तुम्ही इतरांचा विचार कराल. व्यवसाय-उद्योगात एखाद्या स्वप्नमयी प्रोजेक्टचा ‘श्री गणेशा’ होईल. जोडधंदा असणाऱ्यांना कमाईची चांगली संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ थोडय़ा वेळात तुमच्याकडून बरेच काम करून घेतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये खास कार्यक्रम ठरविलेला असेल तर तो उत्तम रितीने पार पडेल.

तूळ सभोवतालचे वातावरण एकदम बदलल्यामुळे तुम्ही थोडेसे विचारात पडाल, परंतु त्यावर मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा जास्त असल्यामुळे तुम्हाला थोडीही फुरसत मिळणार नाही. उधारीचे व्यवहार जास्त असतील. जोडधंद्यातील काम स्वीकारताना ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री करा. नोकरीमध्ये ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्या-करिता मेहनत घ्यावी लागेल. घरामध्ये स्वत:च्या आवडीनिवडीला मुरड घालाल.

वृश्चिक प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे, हे तुमचे धोरण लवचीक ठेवले तर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल. व्यवसाय-उद्योगात भरपूर कामे करण्याची तुमची इच्छा असेल. गिऱ्हाइकांची वहिवाट भरपूर असल्याने तुम्ही खूश रहाल, पण भावनेच्या भरात त्यांना भलतेच आश्वासन देऊ नका. आíथक व्यवहार शांतचित्ताने हाताळा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी सवलत देतील, पण त्याच्या बदल्यात जास्त काम करून घेतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या तनातीत रहावे लागेल.

धनू तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत, त्यांना ताबडतोब वेग देण्याकरिता हा आठवडा चांगला आहे. व्यापार-उद्योगात केलेले काम कधीही वाया जात नाही, याची तुम्हाला जाणीव होईल. खेळत्या भांडवलाची सोय झाल्यामुळे काम करण्याची उमेद वाढेल. नोकरीमध्ये  कंटाळवाण्या कामातून तात्पुरती सुटका झाल्याने तुम्हाला बरे वाटेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार सर्व कार्यक्रम ठरवाल.

मकर काय चांगले आणि काय वाईट हे माणसापेक्षा येणारी परिस्थितीच ठरवत असते. आता तुमच्या राशीचे ग्रहमान चांगले असल्यामुळे अवघड कामातही तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रयोग करून गिऱ्हाइकांचे लक्ष आकर्षति करून विक्री आणि उलाढाल याचे प्रमाण वाढविण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला एखादा चांगला संकेत देतील. घरामध्ये कोणाचे मतभेद झाले असतील तर ते मिटवायला चांगला सप्ताह आहे.

कुंभ ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती होणार आहे. पण अशाही परिस्थितीत तुम्ही तुमचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात नवीन कामाची सुरुवात आíथक पाठबळावर अवलंबून असेल. त्याकरिता बँक किंवा इतर मार्गाने पसे उभे करावे लागतील. नोकरीमध्ये संस्थेच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम हाताळावे लागेल. त्यामध्ये शॉर्टकट शोधाल. घरामध्ये सर्वाचे हट्ट पुरवाल. वेळ पडली तर स्वत:च्या हौसेवर मुरड घालाल. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा.

मीन प्रकृती आणि मनस्वास्थ्य ठीक असले की आपण किती चांगले काम करू शकतो हे या आठवडय़ात समजेल. टीमवर्कला महत्त्व द्या म्हणजे तुमचे उद्दिष्ट साध्य होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी जोडलेले हितसंबंध विशेष उपयोगी पडतील. नवीन काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आवडते काम वेळेत झाल्याने तुम्ही खूश असाल. नातेवाईक आणि जुन्या मित्रांच्या गाठीभेटीमुळे तुमच्यात उत्साह येईल. महिला नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण करून घेतील. मोठय़ा वस्तूची खरेदी कराल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com