दर आठवडय़ाला रोख पारितोषिके जिंकण्याची संधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला वाव मिळावा, विचार नेमकेपणाने व्यक्त होण्याची शिस्त लागावी आणि अशा विद्यार्थी विचार विश्वाचा आविष्कार समाजासमोर यावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’तर्फे ‘ब्लॉग बेंचर्स’ हा राज्यव्यापी उपक्रम सुरू करण्यात येत असून शुक्रवारी नववर्षदिनी खुला होणार आहे. गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळावर आजपासून लॉगइन करून त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ खुले होणार आहे.
महाराष्ट्राला खंडनमंडनाची, विचारमंथनाची अभिमान वाटावा अशी एक परंपरा आहे. या परंपरेमुळेच महाराष्ट्राने देशाचे वैचारिक नेतृत्व केले आणि या परंपरेच्या दृढ प्रवाहामुळेच हे राज्य इतरांच्या तुलनेत नेहमीच प्रबोधित राहिले. परंतु, अलिकडे मात्र ही परंपरा क्षीण होताना दिसते. याला सध्याची समाजरचना आणि माध्यमेही जबाबदार आहेत. यामुळेच माध्यमांनीच पुढाकार घेऊन या रचनेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ एक पाऊल पुढे टाकत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद विमर्षांची बौध्दिक परंपरा जेथे आहे तेथे सुदृढ व्हावी, जेथे नाही तेथे रूजून यावी या उद्देशाने आणि वैचारिकतेच्या क्षेत्रात गांभीर्य आणि पोक्तपणाने उठून दिसणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर या अशा विद्यार्थी विचारास स्थान मिळावे या विचाराने आम्ही हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत ‘लोकसत्ता’ प्रत्येक आठवडय़ातील एखादा अग्रलेख निवडून त्यावर आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करेल. यातील पहिला लेख आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखाच्या अनुषंगाने दोन तज्ज्ञही आपली मते त्यावर नोंदवली आहेत. विद्यार्थ्यांच्या लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील. या निबंध लेखकांना घसघशीत रोख पारितोषिकेही आहेतच. तसेच निवडक निबंधांना लोकसत्ताच्या संकेतस्थळावर आणि अंकात प्रसिद्धी दिली जाणार आहे.
या उपक्रमाबाबत राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनीही सकारात्मकता दर्शवत उपक्रम पुढे नेण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थी हिताच्या या उपक्रमाला पुढे घेऊन जाण्याचे शिवधनुष्य ‘लोकसत्ता’सोबतच या प्राध्यापकगणांनीही उचलले आहे. यामुळेच मुंबईसह नाशिक व नागपूर येथे कुलगुरुंनी प्राचार्याची बैठक बोलावून या उपक्रमाची माहिती देण्याची संधी ‘लोकसत्ता’ला दिली. अशाचप्रकारची प्राचार्याची बैठक राज्यातील इतर शहरांमध्येही होणार आहे. तर मग विद्यार्थ्यांनो ‘तुमचा आवाज; तुमचा विचार’ मोकळेपणाने मांडा आणि लिहिते व्हा.