विचारांच्या मुद्देसूद मांडणीला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणींकरीता ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पध्रेच्या दुसऱ्या आठवडय़ात विद्यार्थ्यांना ‘स्वच्छ क्रिकेट अभियान!’ या अग्रलेखावर मते मांडण्याची संधी देण्यात आली होती. यापैकी सीबीडी बेलापूर येथील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या व्यंकटेश झांबरे या विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार..

Untitled-30
मी लहान असताना दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने आवडीने बघायचो. तेव्हा माझे आजोबा म्हणत, अरे हे लोक पसे लावून खेळतात आणि आपण मात्र आपला अमूल्य वेळ वाया घालतो. आज माझे आजोबा नाहीत पण त्यांनी केलेल्या विधानाचा प्रत्यय येतो आहे. ‘स्वच्छ क्रिकेट अभियान’ या अंतर्गत लोढा समितीने जो अहवाल सादर केला तो आजच्या तरूण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण हे लोक पशांसाठी खेळतात व त्यावर आजचा तरुण वर्ग बेट लावत प्रसंगी िहसक होतोय. क्रिकेट व त्यात होणारा भ्रष्टाचार त्यांच्या समोर असल्यामुळे तरी या घटना कमी होतील. लोढा समितीचा अहवाल म्हणजे ’देर आये लेकिन दुरुस्त आये’ असेच म्हणावे लागेल. बीसीसीआय किंवा तत्सम क्रिकेट मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर एकही खेळाडू नसतो! सगळेच राजकारणी! त्या राजकारण्यांनी क्रिकेटचे भले केले असे म्हटले तरीही स्वत:चेही भले करण्यास ते विसरले नाहीत. राजकारण क्षेत्रातील घराणेशाहीही क्रिकेट मध्ये येऊ पाहत होती. पण, या अहवालामुळे या परिस्थितीला अप्रत्यक्षरीत्या चाप बसला आहे.
आयपीएल तसेच २०-२० क्रिकेटमुळे तर क्रिकेटची ‘अति तेथे माती’ झाली आहे. मोठमोठय़ा कंपन्या आयपीएलमध्ये आपली रक्कम गुंतवून स्वत:चे भले करीत आहेत! पण, त्यामुळे क्रिकेटचे बाजारीकरण होता कामा नये. जसे एखाद्याला रोज पंचापक्वान्नाचे जेवण दिले तर त्याची त्यावरची वासनाच उडून जाईल, तसेच अखंड चालणाऱ्या कोणत्या न कोणत्या क्रिकेटच्या सामन्यांमुळे क्रिकेट बघावेसे वाटत नाही. लोढा समितीच्या अहवालात क्रिकेट मंडळात एका महिला सदस्याची शिफारस केली आहे. ती योग्यच आहे! कारण महिलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सामने होतात; पण माध्यमांना त्याची दखलही घ्यावीशी वाटत नाही. या अहवालानुसार अंमलबजावणी झाल्यास महिला क्रिकेटलाही चांगले दिवस येतील, असे वाटते. माझ्या मते तर क्रिकेट मंडळावर ३३ टक्के म्हणजे नऊ पकी किमान तीन महिला सदस्यांचा समावेश असावा. तसेच त्यांना विविध भूमिकांची जबाबदारी देण्यात यावी. जेणेकरून महिला क्रिकेटमधील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढेल. जो महिला क्रिकेटचीही पारदर्शकता वाढवण्यास कारणीभूत ठरेल. ‘आपीएल’साठीच्या संघांसाठी खेळाडूंचा लिलाव होतो. या लिलावात खेळाडूंना स्वत:ला कुणाच्यातरी दावणीला बांधून घेताना काहीच खेद वाटत नाही. ही एक प्रकारची गुलामगिरीच आहे! वेगवेगळ्या स्पर्धामुळे अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळते हे मान्य. पण, तेथे प्रवेश मिळवण्याकरीता गुणवत्तेपेक्षाही कुण्यातरी गॉडफादरचाच आशीर्वाद लागतो.
या आधीही अनेक गुणवान खेळाडू केवळ गॉडफादर नसल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवू शकले नाहीत. हिशेब तपासणीसाठी लोढा समितीने महालेखापालांचा प्रतिनिधी नेमण्याची शिफारस केली आहे. पण जर ‘कुंपणानेच शेत खाल्ले तर काय करणार?’ ज्यांना पारदर्शीपणे काम करायचे आहे त्यांना अशा लेखापालांची आवश्यकताच नसते; पण असे होण्यासाठी ‘ रामराज्य’च यावे लागेल. आणि या अहवालामुळे क्रिकेट मंडळाच्या कारभारात पारदर्शीपणा आणण्यास नक्कीच मदत होईल असे वाटते.
तसे पाहता राजकारणही एक खेळच आहे, पण क्रिकेटमधील राजकारणाच्या सहभागामुळे खेळाचे राजकारण कसे होते हेही आपण पाहतोच आहोत. पण या अहवालामुळे अनेक आमुलाग्र बदल होतील, अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. तसेच या सर्व प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप असल्यामुळे काहीतरी सकारात्मक घडेल व स्वच्छ क्रिकेट अभियान यशस्वी होईल हीच अपेक्षा! वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही हे फारच छान! तसेच एका पदावर सलग दोनदा निवडून येता येणार नाही हेही योग्यच! त्यामुळे नवीन चेहऱ्यांना आणि तरुणांना या मंडळावर येण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे ‘बीसीसीआय’ ही खासगी संस्था असूनही सरकारचा, तसेच राजकारण्यांचा तेथे फार मोठा हस्तक्षेप असतो आणि त्यांचे लांगुलचालन करीतच खेळाडूंना संघात प्रवेश मिळवावा लागतो. ‘एक राज्य, एक मंडळ’ असे केल्यास खेळाडूंना संधी कमी होतील; पण खेळाडूंच्या वयोगटानुसार क्रिकेटच्या संघटना तयार केल्यास जास्त खेळाडूंना संधी मिळतील. क्रिकेट संघटनांप्रमाणेच इतरही खेळ व त्यांच्या संघटनांमध्ये भ्रष्टाचाराच्या किडीने शिरकाव केला आहेच. पण लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास इतरही संघटनाची स्वच्छता करणे सोपे होईल. सट्टा अधिकृत करावा ही शिफारस उत्तमच. परंतु, सट्टा रेटनुसार सामने फिरवले जाणार नाहीत, याची हमी कोण देणार? त्यामुळे खेळासाठी सट्टापेक्षा, सट्टय़ासाठी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या चर्चामधून काहीतरी सुवर्णमध्य निघो आणि क्रिकेटलाच नव्हे तर सर्वच खेळांना चांगले दिवस येवोत हीच प्रार्थना!