कलावंत व्यवस्थेसमोर दबून राहू लागला तर तो समाजच्या समाजच दबलेल्या अवस्थेत जातो, भेदरून जातो. म्हणून घाबरणाऱ्या समाजाला आधार द्यावयाचा असेल तर कलाकारांनी ताठ मानेने उभे राहायला हवे, असे मत प्रकाश राज यांनी व्यक्त केले. केरळ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रकाश राज यांनी सरकारला चार खडे बोल सुनावले इतकेच त्यांचे मोठेपण नाही. तर कलाकार म्हणून आपली भूमिका काय याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे आणि ती व्यक्त करण्यात कोणतीही हयगय त्यांनी केली नाही, हे विशेष कौतुकास्पद. कलावंतांना एकदा का या शाबासकीची सवय लागली की पाठीच्या कण्यास बाक येतो आणि कोणत्याही प्रश्नावर सरळ उभे राहताच येत नाही. आताही सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचारधारा वगैरे शब्दप्रधान बोलघेवडे कलावंत वास्तविक आयुष्यात काही भूमिका घेतात असे दिसत नाही. दुसऱ्या वर्गाने प्रवास करून पहिल्या वर्गाचे भाडे सरकारकडून वसूल करण्यापुरतेच यांचे शौर्य. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते एका मराठी चित्रपटास राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनपटाचा मिळालेला मान नाकारला जाणे असे बरेच काही घडत असूनही आपली कलावंत मंडळी मूग गिळून राहण्यातच धन्यता मानतात हे अगदीच लाजिरवाणे. कलावंताने आपल्या प्रतिभेने काळास आकार द्यावयाचा असतो. कसे ते प्रकाश राज यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कृतीने कलावंत आणि कवडे यांतील फरकदेखील स्पष्ट झाला आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘कलावंत की कवडे?’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यर्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘कलावंत की कवडे?’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com  मेलवर संपर्क साधावा.