28 May 2020

News Flash

मी तिची फॅन

त्या मुलीचा स्वभाव चांगला होता असे कोणीच म्हणणार नाही. ती मुलगी अजिबात गुणी नव्हती.

सहज एक पुस्तक चाळत होते. थोडय़ा वेळाने का कोण जाणे पण मला ते पुस्तक वाचावेसे वाटले. त्या पुस्तकातील मुलीचे जे कॅरॅक्टर त्यात दाखवले होते ते म्हणा किंवा तिचे जे वर्णन केले होते ते म्हणा मला भावले.

त्या मुलीचा स्वभाव चांगला होता असे कोणीच म्हणणार नाही. ती मुलगी अजिबात गुणी नव्हती. वाखाणण्यासारखा एकही गुण तिच्यात नव्हता. नंबर एकची हट्टी, कोणाचेही न ऐकणारी, स्वत:चेच खरे करणारी, लाडावलेली म्हणजेच वाया गेलेली ती मुलगी मला का आवडली हे माझेच मला कळेना.

दिसायला मात्र ती अतिशय सुरेख होती. उंच, शिडशिडीत बांधा, गोरा रंग, नाकीडोळी नीटस, लांब सडक काळेभोर केस आणि तपकिरी डोळे जे तिच्या सौंदर्यात भरच टाकीत होते. तिचे नावही सुरेख होते. ‘गौरी’.

चैत्र महिन्यात आपण जशी गौर सजवतो तशी देवाने ही गौर मनापासून सजवूनच पाठवली होती.

गौरी अभ्यासात यथातथाच होती. शाळेत जायला लागल्यापासून टिंगल-टवाळ्या करण्याकडेच हिचा कल. अभ्यासाकडे लक्षच नसायचे. अक्षर अतिशय वाईट.

आई-वडिलांची अतिशय लाडकी मुलगी. तिच्या दोन मोठय़ा बहिणी अतिशय हुशार. दोघींना मेडिकलला जायचे असल्याने त्या सतत अभ्यासात गढलेल्या असत. हिच्या बहिणींचेही हिच्यावर फार प्रेम. हिच्या असल्या गुणांमुळे तिचे बाबा मात्र तिच्यावर थोडे नाराजच असत, पण आईची मात्र ती फार लाडकी.

हे सर्व वर्णन करण्यामागचा माझा हेतू एवढाच की एवढे असूनसुद्धा मी या मुलीच्या एवढी प्रेमात का पडले? असे काय आहे तिच्यात की मी तिची फॅन बनावे? मनात विचार आला, कमाल तर खरीच! पण त्याचे कारण विचाराअंती मीच शोधून काढले.

मला ही मुलगी आवडण्याचे कारण एकच- जे मला कधीच जमले नाही ते ही मुलगी सहज जमवते.

आज कुठल्याही कारणाने मी दु:खी नाही. संसार उत्तम झाला. मुले उत्तम, हुशार निघाली, पण मनात एक गोष्ट सतत सलत राहिली की आयुष्यात प्रत्येक वेळी दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून मी माझ्या कल्पनांना मुरड घालत बसले.

मी दहावी पास झाले तेव्हा माझ्या मनात होम सायन्स कॉलेजमध्ये जायचे होते. पण घरच्यांनी नकार दिला. नोकरी मिळवण्याकरिता इकॉनॉमिक्स घेऊन बी.ए. होणे जास्त महत्त्वाचे. मला अमेरिकेत जायची फार इच्छा होती आणि होम सायन्स घेऊन गॅ्रज्युएट झालेल्या माझ्या मैत्रिणी तेव्हा पुढील शिक्षणाकरता अमेरिकेला गेल्या होत्या, पण वडीलमाणसांचे न ऐकणे तेव्हा जमत नव्हते. मोठी माणसे आपल्या भल्याचाच विचार करतात, मग त्यांना कसे दुखवायचे? म्हणजेच काय, आपले मन मारून समोरच्याचे मन दुखवायचे नाही.

उत्तम मार्क्‍स घेऊन मी बी.ए. झाले. वाटले आपण आता एम.ए. झालेच पाहिजे. एम.ए.च्या अ‍ॅडमिशनचे फॉर्म आणून भरले, तर वडिलांनी सही करायला चक्क नकार दिला. कारण विचारल्यावर ते म्हणाले,

‘‘उद्या तू एम.ए. झाल्यावर त्याहून जास्त शिकलेला मुलगा मी कुठे शोधायला जाऊ?’’

तो संपूर्ण दिवस रडण्यात घालवला. मनापासून दु:खी झाले. दुसऱ्या दिवसापासून नोकरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली. नशिबाने नोकरी पटकन मिळाली, त्यात मग रमलेसुद्धा!

मधून मधून वाटायचे, आता काय हरकत आहे? आपण बाहेरून परीक्षा देऊ. एम.ए. होणे ही माझी पॅशन आहे. या नोकरीला वर्षसुद्धा झाले नाही आणि माझे लग्न ठरले.

सासरची मंडळी सुधारक. टिळक, आगरकर, सावरकर यांचे कट्टर अनुयायी. स्वच्छ सात्त्विक वागणे आणि लॉजिकल विचारसरणी आणि सर्वात विशेष म्हणजे आलेल्या कुठल्याही परिस्थितीत थट्टा-मस्करी चालू, त्यामुळे आम्ही सगळेच नेहमी मजेत असायचो.

आता आपण काही तरी पुढे शिकावे, आवडेल तो उद्योग करावा असे नेहमी वाटे, पण याबाबतीत जवळजवळ सर्वाचाच विरोध. त्यातून आमच्या पतिराजांचा तर एकदमच! नीट घर सांभाळा, पाहुण्यांचे आगतस्वागत मनापासून करा आणि आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, असे त्यांचे सांगणे.

वाद घालण्याची सवय नाही. बोलण्यापूर्वी समोरच्याला काय वाटेल याचा पहिला विचार. त्यामुळे परत एक आवंढा गिळला आणि आपल्या रोजच्या कामाला लागले.

आपल्याकडे पूर्वी म्हणत असत- लहानपणी वडील, तरुणपणी नवरा व म्हातारपणी मुलगा यांच्या मतानेच बायकांनी चालावे. आता दिवस बदलले. विचारसरणी तर पूर्ण बदलली आणि कोणालाच कोणाला विचारण्याची जरूर वाटेनाशी झाली. डिफिकल्टी असली तर गुगलवर जा, सर्व शंका तिथे सोडवल्या जातील.

आता मात्र मी मनाशी ठरवले, आपल्या मनासारखेच वागायचे. मुलांना विचारायचे नाही. त्यांच्या अडचणी आता त्यांनीच सोडवाव्या. आपला ग्रुपही छान आहे. आपण आपले प्रोग्रॅम ठरवू. त्यांचे ते पाहतील.

त्याप्रमाणे घरात सांगितले. ‘‘उद्या आम्ही सर्व मैत्रिणी एक दिवस जरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर जाणार आहोत. रात्रीपर्यंत परत येऊ.’’

सकाळची तयारी करून रात्री अंथरुणावर पडले, पण झोप येईना. माझे मन मलाच विचारत होते. ‘‘यात काय मिळवलंस तू? तुला तिकडे जाऊन खरंच आनंद मिळेल का? घरातील जबाबदाऱ्या ज्या रोज तू हौशीने पार पाडतेस आणि सुखाने झोपतेस; तो आनंदच खरा की नाही? हे नवं आणलेलं उसनं अवसान किती टिकेल? त्यापेक्षा तुझ्या पद्धतीने तू जग. त्यात कुठेही कमीपणा नाही, उलट कर्तव्य पार पाडल्याचा आनंदच आहे. दुसऱ्याला दुखवून किंवा त्यांची गैरसोय करून आपल्याला निश्चित समाधान मिळणार नाही. तेव्हा ‘टू ईच हिज ओन’ हेच खरे आहे.’’

एवढय़ात दारावर टकटक झाली आणि मी माझ्या खोलीचे दार उघडले. दारात माझी धाकटी नात उभी होती. माझ्या गळ्यात पडत ती म्हणाली.‘ ‘आजी, तू उद्या नाहीस घरी? ममा म्हणत होती, उद्या तू शाळेतून घरी येशील तेव्हा आजी घरी नसेल. खरं ना?’’

तिला जवळ घेत मी म्हटले, ‘‘कुठे जात नाही तुझी आजी तुला सोडून. तू येशील तेव्हा मी घरीच आहे.’’

जाताना मला गुड नाइट किस देत म्हणाली, ‘‘तरी मी बोललेच होते ममाला, मला सोडून आजी कुठेही जाणार नाही.’’

माझ्या नातीचा विश्वास हा माझा सगळ्यात मोठा आनंद होता. तरीही त्या न पाहिलेल्या मुलीची मी फॅन आहे हे मात्र सत्य आहे.
सरला भिडे –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:12 am

Web Title: a blog i am her fan
टॅग Blog,Bloggers Katta
Next Stories
1 पिकलेली फेअरीटेल
2 एक अतक्र्य वास्तव!
3 एक प्रसंग
Just Now!
X