22 February 2020

News Flash

वारी

मला ते सर्व अनुभवायचे आहे. ते तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालायचे आहे.

मागच्या आठवडय़ात रेडिओवर मी एका ट्रॅव्हल कंपनीचा कार्यक्रम ऐकला होता. विशिष्ट तारखेपर्यंत जे लोक ऑस्ट्रेलिया टूरचे बुकिंग करतील त्यांना सिडनी शहराची हेलिकॉप्टर राइड फ्री आहे म्हणून. मनात म्हटलं काय छान मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ना! मग अचानक मी या टूरची नकळतच आपल्या पंढरपूरच्या ‘वारी’वाल्या टूरशी तुलना करू लागले. समजा मी या ऑस्ट्रेलिया टूरसाठी बुकिंग केले असते तर काय काय आणि कशी कशी तयारी केली असती. एकदम व्हेकेशन मूडमध्ये गेले असते. आणि ती हेलिकॉप्टर राइड ! किती सारे फोटो. किती छान निसर्गरम्य ठिकाणं, किती आरामदायी हॉटेल्स..

मग म्हटलं, चला ऑस्ट्रेलिया टूर तर झाली. आता ही पंढरपूरची वारी काय असते तेपण अनुभवूया. आपलं मन बघा कसं आहे. झटक्यात जाऊन आलं ऑस्ट्रेलियाला आणि आता निघालं पंढरपूरला जायला.

माझ्या गळ्यात मी तुळशीची माळ घातली आहे. मी याआधी अशा माळा कधीच घातल्या नाहीत. मला आवडही नाही तशी. पण माझ्या अहोंनी पंढरपूरहून विठ्ठलाच्या चरणाशी लावून माझ्यासाठी आणि माझ्या लेकीसाठी अशा दोन माळा आणल्या. म्हटलं एवढय़ा प्रेमाने आणल्या आहेत तर मन कशाला मोडा. आम्ही दोघींनीही त्या गळ्यात घातल्या आहेत. ओळख नसलेले खूप जणं विचारतात तुमची वारी कधी? आधी मला काही समजायचे नाही काय विचारतात म्हणून. नंतर समजले की ते या वारीबद्दल विचारतात. म्हणून मग म्हटले बघू या तरी खर्चाचं आणि बाकी सगळे नियोजन करून. पण या टूरसाठी ना कुठल्या बुकिंगची गरज ना कुठल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीची.

अगदी कमी खर्चात होत असेल ही टूर बहुधा. एक पिशवी घ्यायची, ज्यात आपले नित्याचे गरजेचे सामान असेल आणि हातात टाळ. काही जणं तुळशीचे छोटे रोप असलेले तुळशी वृंदावन घेतात आणि निघतात. चला. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत हळू हळू चालत चालत पंढरपूरला प्रयाण करायचे. मिशन एकच त्या सावळ्या सुंदर विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. दिवसभर चालायचे, रात्र झाली की जवळच्या एखाद्या गावी राहायचे. त्या ठिकाणी जशी सोय असेल, जे मिळेल ते खायचे आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे. चालून चालून दमल्यावर इतकी भूक लागत असेल की मग जेवायला जे मिळेल ते छानच लागत असेल आणि नुसत्या खाटेवर किंवा जमिनीवरपण झोप येत असेल या लोकांना. आरामदायी हॉटेल आणि आलिशान रूमची आठवणपण येत नसेल बहुतेक. किती तो वेडा ध्यास आहे बघा ना त्या विठुमाऊलीच्या दर्शनाचा! या एका दर्शनासाठी हा होणारा त्रास काय चीज आहे! उन्हातान्हात चालून स्कीन टॅन होण्याची भीती नसेल का वाटत या लोकांना? चालून चालून पायांना पडणारे घट्टे यांना दिसतच नसतील बहुतेक. मनी फक्त एकच लक्ष्य. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट चालावी पंढरीची. विठुनामाचा जयघोष करत मजल दरमजल करत त्या भीमा तिरी पंढरपूरला पोहोचून त्या माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले की या सर्व परिश्रमांचा विसर पडत असेल या लोकांना. ती भगवंताच्या दर्शनाची आस आणि त्या दर्शनाने मिळालेला तो परमानंद याची तुलना कशाशीच होऊ  शकणार नाही बहुतेक. त्या सिडनेवाल्या हेलिकॉप्टर राइडपेक्षा हा आनंद अवचित मोठाच असेल.

मी ऑस्ट्रेलिया टूरसाठी कधी जाईन की नाही माहिती नाही, पण मला या पंढरपूरच्या वारीच्या स्पेशल टूरला नक्की जावंसं वाटतंय. मला ते सर्व अनुभवायचे आहे. ते तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालायचे आहे. टाळाच्या गजरात तल्लीन होऊन जोरजोरात विठ्ठलाची गाणी आणि भजने म्हणायची आहेत. आपण गाणी तर काय कधीही एकत्र भेटल्यावर पार्टीमध्ये म्हणतच असतो ना. जरा अशा पद्धतीनेपण गाणी म्हणून बघायची आहेत. ते चालून चालून थकून जायचे आहे. ती चुलीवरची भाजी-भाकरी खायची आहे. ती चव कधीही न विसरता येणारी असते असं म्हणतात. काय सांगावं हॉटेलमधल्या इटालियन, थायी आणि चायनीज फूडपेक्षा हेच जास्त चविष्ट लागेल. मला त्या खाटेवरचं झोपणं अनुभवायचं आहे. ते गावचं वातावरण, ती साधी राहणी, ती प्रेमळ आणि कोणालाही कधीही मदत करणारी माणसं दिसतात तरी कशी ते बघायचं आहे. मला त्या विठ्ठलाच्या देवळातल्या दर्शनाची आस नाही आहे. झाले नीट दर्शन तर उत्तमच. पण या संपूर्ण प्रवासात या वारीमध्ये मी एक गोष्ट मात्र खात्रीने सांगू शकेन की ती विठुमाऊली मला अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन नक्कीच देऊन जाईल. आणि जर माझ्या मनात प्रामाणिक भाव असतील तर प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडेल. किती मोठा अनुभव असेल हा माझ्यासाठी. किती शिकायला मिळेल मला या वारीतून. आपल्यापेक्षा सुखी लोकं जशी पाहायला मिळतील तशीच आपल्यापेक्षा दु:खी लोकंसुद्धा असतात हे पाहायला मिळेल. आणि मग या सर्वामधून मिळणाऱ्या त्या भगवंताच्या दर्शनाने या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. स्वर्ग की काय म्हणतात तो कदाचित हाच असेल किंवा मग दोनच बोटं दूर असेल. मग चला या टूरचे बुकिंग करूया. जितकं लौकर बुकिंग, तितके परमेश्वराचे आशीर्वाद जास्त.

कोमल केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 30, 2016 3:18 am

Web Title: australia tour compare with pandharpur wari
Next Stories
1 असाही विश्वास…
2 मोरनाचण
3 बेचकी