आमचं सर्व कुटुंबच प्राणी व पक्ष्यांची आवड असणारं आहे. आमचं सगळ्यात पहिलं घर डोंबिवली येथे होतं. भाडय़ाचंच पण भलंमोठं घर होतं. आई आणि बाबा आमच्या जन्माच्या आधीपासूनच तिथे राहात होते. बाबा सकाळी ऑफिसला गेले की, आईच्या दिवसभर टय़ुशन्स सुरू. या सगळ्या आठवणी आई सांगते तेव्हा मजा वाटते.  स्वयंपाकघर व हॉल या दोनच पण भल्यामोठय़ा खोल्या होत्या. आणि या दोन्ही खोल्यांना जोडलेली लांबलचक ‘एल’ (छ) टाइप गॅलरी. आतल्या खोलीच्या खिडकीत दोन खारूताई नेहमीच यायच्या. एक दिवस त्यांच्याबरोबर त्यांचं छोटं पिल्लूही यायला लागलं. आणि काही दिवसांनी ते एकटं पिल्लूच येत होतं. एक दिवस ते घायाळ होऊन आलं. त्याच्या पायाला बरंच लागलं होतं. आईने त्याला हळूच पकडलं. त्याच्या पायाच्या जखमेवर हळद टाकून बारीकशी चिंधी बांधली. आणि घराच्या एका कोपऱ्यात कांदे- बटाटय़ांच्या जाळीच्या टोपलीत दोन- तीन दिवस ठेवले. खायला, प्यायला त्याला बास्केटमध्येच मिळत असे. त्यानंतर मात्र ते बास्केटमधून बाहेर येऊन घरभर हुंदडत असे. आणि एक दिवस खिडकीतून बाहेर पसार झाले. यानंतर आम्ही कल्याणला स्वत:चा ब्लॉक घेतला. बिल्डरने बांधलेले कॉम्प्लेक्स नवीनच होते. अर्थातच त्यामुळे झाडे- झुडपे काही नव्हती. कॉलनीत काही लोक राहायला आले होते. आमच्याही बिल्डिंगमध्ये जवळजवळ प्रत्येक मजल्यावर एकएकच घर रिकामे होते. झाडांची खूपच आवड असल्यामुळे आईने कुंडय़ांमध्ये खजूर, पारिजातक, जास्वंद, फणस अशी लहानमोठी बरीच झाडं लावली होती. आज यातली काही झाडे आमच्या मुरबाडच्या बंगल्याभोवती सुखाने नांदताहेत. पण बरीचशी झाडे आमच्या कॉलनीच्या भोवताली कंपाउंडच्या भिंतीला लागून लावलेली आहेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे पहिल्यांदाच साजरे झाले तेव्हा घराघरातून हाका मारून, हाताला धरून लोकांना खाली बेलावून आम्ही वृक्षारोपण केले. परत कुंडय़ांमध्ये वेगळी झाडं लागली ती गोष्ट निराळीच. एक-दोन वर्षांनीच पारिजातकाचा सडा मागल्या बेडरूमच्या अंगाला पडू लागला. जास्वंद बहरून आलं. आमच्या विंगमधील लोकांना भरपूर फुलं मिळू लागली. आमच्या वरच्या मजल्यावरील कुलकर्णी आजोबांनीदेखील मग बरीच झाडे लावली. वृक्षारोपणाचा पायंडा तर पडला, पण तेथे बरेच साप फिरू लागले. खरंतर तेही आमचे सोबतीच होते. झाडावर वेगवेगळे पक्षी येऊ लागले. कोतवाल, कोकिळा, खंडय़ा, बुलबुल, मैनांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळू लागले.

अशाच एका मध्यरात्री वॉचमन  सांगायला आला किचनच्या खिडकीच्या खाली एक साप दिसतो आहे. आमची आई सापाला बिलकुलच घाबरत नव्हती. माझी ताई त्या वेळेस लहान होती. ताईचे जाड दुपटे व उशीचा अभ्रा घेऊन आई-बाबा व वॉचमन मागे गेले. टॉर्चच्या उजेडात आईने दबा धरून सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेथून निसटून तो कोपऱ्यात जाऊन बसला. अंगाची वेटोळी करून तोंड लपवून बसला. आईने झटकन त्यावर दुपटे टाकून बाबांनी धरलेल्या उशीच्या अभ्य्रात दुपटय़ासकट टाकला. अभ्य्राचे तोंड दोरीने घट्ट बांधले आणि आता सकाळी काय ते बघू म्हणून त्या कोंबलेल्या सापाला ट्रान्सफॉर्मरच्या खाली ठेवले. सकाळ होताच आम्ही सगळ्यांनीच तेथे धाव घेतली. पण हाय रे दैवा! उशीचा अभ्रा रिकामा होता. एके ठिकाणी उसवलेल्या शिवणीतून महाराज सहीसलामत बाहेर पडले होते. हा अनुभव ऐकताना अजूनही रोमांच उभे करतो. मग ताई तीन वर्षांची असताना आमच्याकडे एक पोपटाचे पिल्लू आणले. आई सांगते, त्या पिल्लाच्या अंगावर एकही पीस नव्हते. चोचही मोठी करडय़ा रंगाची होती. ते पोपटाचे की गिधाडाचे हेही कळत नव्हते. पण ते एका खास दुकानातून आणले होते. त्यानेही पोपटाचे पिल्लू सुरुवातीला असेच असते असे सांगितले होते. पिचकारीसारख्या बाटलीतून त्याला बेसनपिठाची, कधी भाताची पेस्ट भरवून भरवून आईने त्याला वाढवले. पंख फुटेपर्यंत त्याला मोकळेच ठेवले होते. फक्त झोपताना छोटय़ाशा गोधडीवर पिंजऱ्यात ठेवत असू. जेव्हा तो पूर्ण पोपट दिसू लागला तेव्हापासून तो पिंजऱ्यात राहू लागला. पिंजरा स्वच्छ असेल तरच तो खात असे. रागाने दिलेले त्याला आवडत नसे. मग मानमिनत्या करून त्याला द्यावे लागे. हॉलच्या खिडकीसमोर चार फुटांवर पपईची दोन झाडे होती. आणि हॉलच्या खिडकीत कुंडय़ांच्यावर त्याचा पिंजरा अडकवलेला असे. दुपारची वेळ होती. वातावरण शांत होतं. अचानक पोपटाचा पंख फडफडण्याचा आवाज आला. बेडरूममधून येऊन आई बघते तो काय, एक चॉकलेटी व एक हिरवा असे दोन साप (४ फुटी) पिंजऱ्याकडे झेपावत होते. त्यांना बघून मिठ्ठची वाचाच गेली होती. संध्याकाळपर्यंत आईच्या कुशीत बसला होता. आई सकाळी बालवाडी शाळा चालवीत असे व दुपारपासून ते बाबा येईपर्यंत, संध्याकाळी सात वाजेपर्यंत शिकवणीचे वर्ग. अर्थातच हाताशी शिक्षकांचा ताफा होताच. आमच्याच घराच्या बाजूला दुसरा ब्लॉक घेऊन हे सर्व चालत असे. आणि सोबतीला या अनुभवांची शिदोरी.

कॉलनीमधील (इ) विंगच्या मागे दुपारी पुन्हा साप निघाला. तेथील मुलं आमच्याकडे शिकवणीला येत असत. तोपर्यंत आईने साप पकडला ही बातमी सर्वश्रुत झलीच होती. त्यामुळे हा साप निघाल्यावर साहजिकच मॅडम, मॅडम करत मुलं आली. पुन्हा एक मोठे जाड कापड व कुठेही न उसवलेला अभ्रा घेऊन आई निघाली. सापाला पकडताना चेंबरच्या फटीत गेला. काळ्याकरडय़ा रंगाचा साडेचार फुटी तो साप होता. आईने शेपटीला धरून त्याला बाहेर ओढले. एका हाताने शेपटी व दुसऱ्या हातात जाड कापड घेतलेले होते. त्या हाताने तोंड धरले आणि झटकन उशीच्या अभ्य्रात कोंबले. सापाचे ते गाठोडे पुन्हा ट्रान्स्फॉर्मरच्या खाली ठेवून रात्री झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी गाठोडय़ातली वळवळच सांगत होती की साप तेथेच आहे. मग बाबांनी एका ब्रीफकेसमध्ये ते गाठेडे ठेवले आणि ती ब्रीफकेस घेऊन थेट हाफकिन इन्स्टिटय़ूट गाठले. त्यांनी त्या सापाला ठेवून घेतले व तो बिनविषारी असल्याचे सांगितले. आईच्या नावाने एक सर्टिफिकेट व रुपये १००चे बक्षीस दिले.

एकीकडे पोपटाचे नखरे सुरूच होते. दिवसभर दमल्याभागल्या आईला रात्री पिंजरा स्वच्छ करून, पोपटाला खायला देऊन मग झोपावे लागे. दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री त्याला खायला देत असत. पण अधूनमधून फळं, मिरच्या, डाळ आमच्याकडे येणारे सर्व जण त्याला देत असत. एक दिवस आई खूप वैतागली होती. चिडचिड करत तिने पोपटाला पोळी दिली पण पिंजरा धुतला नाही. दुसऱ्या दिवशी रात्रीची पोळी तशीच होती. पोपटाला आईचा राग आवडला नव्हता. सकाळी पिंजऱ्याची कडी स्वत: चोचीने काढून तो घरभर फिरला. आईच्या खांद्यावरही बसला. आईने, ‘मिठू पिंजऱ्यात जा’ असं सांगूनही तो गेला नाही. नंतर त्याने गॅलरीतून थेट बाहेर झेप घेतली. त्याला उडलेले पाहून आनंद व दु:ख दोन्ही भावना दाटून आल्या. पण आईसाहेब मात्र दु:खी झाल्या. मी त्याच्यावर रागावले म्हणून तो उडून गेला, असे आईला वाटले.

आजपर्यंत ती आठवण काढून आई खंतावते. मी दुसरीत असताना एक कबुतराचे पिल्लू आमच्या गॅलरीत आले. कावळे मागे लागले म्हणून गॅलरीत एका टोपलीखाली त्याला झाकून ठेवले. आम्ही त्याचे नाव ‘कोको’ ठेवले. त्याला पाळल्यासारखे खायला- प्यायला देणे, थंडी असल्याने त्याला उबेत पोत्यावर झोपवणे, टोपलीवर कापड टाकून झाकणे असे सर्व काही आम्ही करायचो. पण एक दिवस त्याच्या डोळ्यांभोवती मोठय़ा पुटकुळ्या आल्या व ते मेले. आम्ही त्याला घराच्या मागच्या बाजूला पारिजातकासमोर खड्डा खणून पुरले व त्यावर गुलाबाचे रोप लावले.

दोन वर्षांपूर्वी आम्ही आणखी मोठे घर घेतले. दोन मोठय़ा गॅलऱ्या व दोन बेडरूम व हॉल किचन. येथे आल्यापासून फक्त चिमण्या गॅलरीत घरटे करण्यासाठी गोंधळ घालतात. ‘सेव्ह अव्हर स्पॅरो’ या संस्थेबद्दल ॅ्रंल्ल३२ ठी६२ छी३३ी१ मध्ये लेख वाचला. पुन्हा ‘लोकसत्ता’मधील वास्तुसोबतीकडे लक्ष वेधले. ‘बाटा’च्या खोक्यांना मोठे गोल भोक पाडून ती खोकी गॅलरीत खिळ्याला अडकवून ठेवली. आतापर्यंत तीन-चार वेळा पिलं जन्माला आली. आम्हाला आनंद देऊन गेली.

माझा मामेभाऊ चिन्मय याने तर चिमण्यांसाठी एक प्रकल्पच केला आहे. जोडीला त्याचा मोठा भाऊ म्हणजे कौस्तुभदादा आहेच. (तो जनावरांचा डॉक्टर आहे.

मुरबाडला पाच हजार चौ. फुटाच्या जमिनीवर आमचे चार खोल्यांचे घर व गच्ची आहे. घराभोवती दोन आंब्यांची, पाच-सहा केळींची, नारळांची, खजूर, डाळिंब, सीताफळ, पारिजातक, साग, िलबू, संत्र, चिकूची झाडे आहेत. त्यांपैकी पारिजातक, खजूर, फणस व डाळिंब ही कुंडीतली वाढलेली झाडे. आम्ही जेव्हा मुरबाडला जातो तेव्हा या झाडांच्या फांद्यांवरून आई प्रेमाने हात फिरवते. खूप दिवसांनी सोबती भेटले असे आईला वाटते.

एक दिवस झुडपांच्या जाळीमध्ये मैनासदृश पिवळ्या पक्ष्यांचे थवे बसलेले पाहिले, आकारही मैनेएवढाच होता. एका पक्ष्याचा पाय झुडपातल्या फांदीवरच्या दोऱ्यामध्ये अडकला. ते सर्व पक्षी ओरडून आक्रंदन करत होते. आमच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या झाडांच्या जाळीत ते अडकले होते. सकाळी असे वाटले त्यांना मांजर किंवा साप दिसला असेल म्हणून ते ओरडत असतील. पण दुपारचे चार वाजले तरी त्यांचे ओरडणे थांबले नव्हते. कंपाऊंडच्या भिंतीला लागून पण आतल्या बाजूला एक मोठा दगड होता. त्या दगडावर उभे राहून जाळीमध्ये डोकावले तेव्हा दिसले की, फांद्यांमध्ये अडकलेला दोरा त्याच्या पायालाही गाठ मारल्यागत अडकला होता. एका छोटय़ा काठीला खिळा ठोकून त्या काठीने फांदी जवळ ओढली. आणि कात्री घेऊन आईने दोरा कापून त्या पक्ष्याला मोकळे केले. हे सर्व करत असताना पक्ष्यांचे ओरडणे सुरूच होते. थोडासा दोरा हाताने काढून, उरलेला कात्रीने कापून पक्ष्याला मोकळे केले. दोन मिनिटे भांबवल्यागत दुसऱ्या फांदीवर जाऊन ते सगळे चिडीचूप झाले. दुसऱ्या क्षणाला ते सर्व उडून गेले. नंतर कधी तरी दोनच पक्षी कंपाऊंडच्या भिंतीवर येत. आई म्हणायची बहुधा ते धन्यवाद देण्यासाठी येत असावेत.

केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा फक्त मनुष्यप्राणी होय. मुकी जनावरे व पक्षी एवढेच काय तर झाडे-झुडपेही केलेले उपकार लक्षात ठेवात असतात. पशु-पक्ष्यांना प्रेम-जिव्हाळा दिल्यास त्याची ते जरूर परतफेड करतात. झाडांना रोज प्रेमाने हात फिरवल्यास किंवा मधुर संगीत त्यांना ऐकवल्यास त्यांची वाढ जोमाने होते. तोच त्यांचा खुराक असतो. खरे तर मानवी मन व मेंदू या सर्वाहून किती तरी तीक्ष्ण व हुशार असते. पण स्वार्थापोटी तो सर्व घालवून बसतो. निसर्ग आपणास सर्व काही देतो, आपण त्याला काय देतो? निसर्गाच्या सान्निध्यात मन शांत होते. तेव्हा कृतज्ञता व्यक्त करून निसर्गाचे ऋण फेडले पाहिजेत.
सुरेखा थिगळे – response.lokprabha@expressindia.com