दुपारचा शांत प्रहर! गावपाणंदीच्या मधोमध उभ्या असलेल्या चिंचेच्या डेरेदार अशा चेटूक झाडावर; गावाचा डोळा चुकवून मोर अलबत थांबलेला. वार्ता हळूच गावभर झालेली. मोर बघू पाहणारी माणसं नि काही उनाड मुलं गावपाणंदीकडे वळतात. रणरणत्या उन्हाच्या टोकदार झळा चुकवत मोर फांद्यांत विसावलेला. त्याचं ते देवदुर्लभ दर्शन, मनाला प्रसन्नता देणारं! त्याचा राजबिंडा देह सोनेरी उन्हाच्या सोबतीनं झळाळत राहतोय. त्याच्या इंद्रधनू पिसाऱ्यावर माणकाचे इवलाले निळूले डोळे हसत असलेले. अलबत आलेल्या वाऱ्याच्या नाजूक झुळकेवर, त्याच्या देखण्या पिसाऱ्यातले दोन-चार पिसं वाऱ्यावर गिरकी घेत खाली येऊ लागतात. मुलं वेडालेली, ती घालतात त्या पिसांभोवती पिंगा, त्यांना पकडू पाहण्यासाठी. समंजस माणसं मुलांच्या ह्य अधिरपणावर थोडंसं हसून घेतात.

पण पुढल्याच क्षणी मुलांच्या आभाळ व्यापू पाहणाऱ्या गोंगाटात मोर झेपावतो आभाळाच्या दिशेनं. त्याची ती सुरेल अस्मान भरारी डोळ्यांचे पारणे फेडणारी! माणसं नि मुलं गावाकडे परततात; देखण्या मोराचं दुर्लभ दर्शन त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय असतोय. मोराच्या अशा सुघड आठवणीत मग गाव हरवून जातं कितीतरी दिवस!

एखाद्या उनाड थंडीच्या संध्याकाळी, शेकोटीच्या तांबूस प्रकाशात विषय निघतोय; मोरनाचण पाहण्याचा! जुनी-जाणती माणसं मग अशी देखणी जागा वा स्थळ पाहिल्याच्या नोंदीचे आयुष्यातील सुंदर संदर्भ शोधू लागतात. असा एखादा देखणा क्षण त्यांनी अलवार जपून ठेवलेला असतोय मनात! ती हरवत जातात त्या ओढाळ क्षणांचा तपशील पुरवत असताना! नव्हाळ मुलंही मोरकथेत हरवून घेतात स्वत:ला नकळत. अशी स्वप्नजागा असल्याचं माणसं सांगत राहतात आपल्या आयुष्य संदर्भावरून. ती जागा गावातल्या पूर्वेकडच्या दाट जंगलात असल्याचं कळतंय.. मनात निनादत राहतेय नाचण.. मोरनाचण! मी उत्सुक ..शोधतोय या कामी मदत करणारा गावगुराखी!

मी दुसऱ्या दिवशी सकाळी गुराख्याच्या दारात उभा राहतोय. तो चकित, माझी अशी गळेपडू वृत्ती पाहून! पण मी त्याचा पिच्छा सोडायला मुळीच तयार नसलेला.. तो मला पाणंदीच्या काठावरील उकीरडय़ात चरत असलेल्या कोंबडय़ांकडे घेऊन येतोय; नि दाखवतोय एक देखणं कुतूहल! सुरुवातीला काहीच लक्षात येत नाहीय; पण मग कळतंय त्या कोंबडय़ांच्या इतर पिलांत चरत असलेलं एक आगळसं पिल्लू! थोडंसं ओबडधोबड, त्यांच्यापेक्षा वेगळं! अजूनही त्याच्या अंगावर इतर पिलांसारखी पिसं आलेली नसतात. ते दिसतंय थोडंसं मलूल नि आळशीही. इतर पिलं तुरतुरत धावत राहतात कोंबडीच्या मागे आपल्या उपाशी चोची घेऊन. हे मात्र पुरेपूर बेफिकीर; आपल्याच न्याऱ्या डौलात! मला काहीच कळत नाहीय. मग गुराखी हळूच करतोय लाखमोलाचा उलगडा.. ते एक मोराचं पिल्लू आहे म्हणून! मी आवाक! कोंबडय़ांत चरणारा मोर पाहून!

मी गुराख्याला विचारून घेतोय, त्या अजब पिलाची कुळकथा.. कुठल्याशा एका पावसाळ्याच्या दिवशी, रानात गुरांच्या मागे असताना त्याला ऐकू येतात मोरांच्या केका! दाट जग्ांलाच्या आभाळात काळे ढग  गर्दी करू लागतात. दिशांच्या अस्मानी शिवेवर विजा काडाडू लागलेल्या. रानात शांतपणे चरणारी गुरं थोडी सैरभैर झालेली. हरणांचा एक उनाड कळप रानझुडुपांच्या आडोशाला थांबलेला. आभाळ दाटून येतंय. आसमंत अंधारून आलेला. चरत असलेली गुरं डेरेदार झाडांखाली नकळत येऊन थांबलेली! दूरवर रानाच्या काठावर टिटवीचं मन उसवून टाकणारं ‘टिटीव- टिवं’चं ओरडणं! तो एका झाडाच्या बुंध्यापाशी थांबतोय.. डोक्यावर सागाच्या पानाची टोपी धरून. त्याची नजर समोरच्या दृश्यावर स्थिरावतेय. दूरवरच्या निष्पर्ण झाडाच्या खाली मोर पिसारा फुलवून नाचू लागलेला. लाजरी-बुजरी लांडोर त्याला अधूनमधून साथ देऊ पाहतेय.

पाऊस टपटपू लागतोय. झाडांच्या इवल्याल्या पानांत थेंबांचं स्वर्गीय संगीत वाजू लागतंय. सारं रान पावसाच्या या अजब संगीताच्या तलावर फेर धरू पाहतंय. झाडांखाली थांबलेली गुरं हंबरू लागलेली. ढगांच्या बेधुंद तालावर नाचून घेतल्यावर मोर नि लांडोर विसावतात त्या निष्पर्ण झाडावर. लांडोर झाडाच्या ढोलीत शिरू पाहतेय. मोर टिपून घेतोय पिसाऱ्यावर सांडलेल्या पाऊसथेंबांना. दरम्यान संध्याकाळ होऊ पाहतेय. पाऊस काही क्षणासाठी थांबलेला. गुरं गोठय़ाच्या ओढीनं हंबरू लागतात. त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाला किणकिणत वेल्हाळू लागलेल्या. दाट जंगलाची वेस ओलांडून गाव गुरांचा कळप गावदिशेनं निघालेला.. त्यांच्यामागे तो गुराखीही! त्याच्या मनात रुणझुणू लागतंय एक अनोखं स्वप्न!

दुसऱ्या दिवशी रानभरी झाल्यावर गुराखी गाठतोय अलबत ते झाड! मोर-लांडोर चरण्यासाठी निघून गेलेले. आजूबाजूला एक नजर टाकून तो चढू लागतोय त्या झाडावर. झाड खरं तर चढण्यासाठी अवघड. पण गुराखी जिद्दी, तो गाठतोय झाडाची उघडी असलेली ढोल. क्षणभर तो दूरूनच डोकावून पाहतोय. ढोलीत अंधार काठोकाठ भरलेला. दुसऱ्याच क्षणी तो टाकतोय ढोलीत हात. एक  गुळगुळीत अंडं त्याच्या हाताशी आलेलं. त्याचे डोळे चमकतात. तो ते घरी घेऊन येतोय, कोंबडीच्या अंडय़ाबरोबर उबवण्यासाठी. त्याच्या डोळ्यात अंगणात थुईथुईणारा मोर नाचू लागतोय!

दिवस-मास निघून गेलेले. दरम्यान ते पिल्लू बाळसं धरू लागतंय. हळूहळू आकारू लागतोय कोंबडय़ांच्या कळपात एक देखणासा राजबिंडा मोर! आजूबाजूचे चकित होतात. मोर कोंबडय़ांबरोबर फिरू लागलेला.  कधी कधी घेऊ पाहतोय आभाळ भरारी, पण काही वेळच. संध्याकाळी बरोबर तो परततोय घरटय़ाकडे.. आता एवढय़ात गुराखी हवालदिल.. एखाद्या संध्याकाळी आकाशात झेपावलेला मोर परतणार नाही म्हणून! पण त्यालाही वाटतंय, मोरानं घ्यावी झेप दाट जंगलाच्या दिशेनं आपल्या देखण्या नि मायाळू आई – वडिलांच्या शोधात!

दरम्यान मी गुराख्याचा पिच्छाच पुरवतोय; त्यानं जंगलातील मोरनाचण दाखवावी म्हणून! हो नाहीच्या ठेक्यावर ताल धरणारा गुराखी एकदाचा तयार होतोय.. एका प्रसन्न सकाळी गोठाणावर जमा झालेली गुरं घेऊन निघतोय आम्ही जंगलाच्या अनाम दिशेनं! साऱ्या वाटेवर मोर माझ्या मनात नाचू लागलेत! जंगल – टेकडीचं एक टोकदार चढण चढून आम्ही दाट जंगलाच्या भागात येतोय. येथे डेरेदार झाडं आभाळाशी स्पर्धा करू पाहतात. जंगलाच्या काठावरून झुळझुळणारा एक शुभ्रसा ओढा खळाळत असलेला. रात्रीच्या दाट काळोखात हरणं, तडसं नि सांबरं अमृत पाणी पिऊन गेल्याचं कळतंय. ओढय़ाच्या काठावर मातीत त्यांची खुरं बेमालूमपणे उमटलेली. गुराखी बरोबर हुडकून काढतोय खुरांवरून प्राण्यांची ओळख! जंगलाची एक अबोल शांतता मनात भीतीचा काटा रोवणारी. मी अधीर मोरनाचण पाहण्यासाठी! नाचणारे मोर त्यांच्या स्थळी पाहणं किती दुर्लभ! मला आज ते दृश्य दिसणार असतं!..

मागच्या वर्षी पावसाळ्याच्या ढगाळ दिवसांत गुराख्यानंही इथेच मोरांचे नाचरे, देखणे झुंड पाहिलेले. मोर निघून गेल्यावर त्यानं ढिगभर गोळा केलेली त्यांची ती देखणी पिसं अजूनही त्याच्या घरी हसत असतात. आजही आभाळात ढग दाटलेले.. पाऊस येणार असल्याची वार्ता जंगलभर फिरून पावश्यानं ओरडून ओरडून दिलेली. अंधारून येत असताना जवळच्या झाडांतून मोरांचे व्याकूळ आवाज जंगलभर घुमू लागतात. आम्ही दोघेही मनातून आनंदून जातोय. गुरं गवताच्या तलम हिरवळीवर हुंदडत असतात. मोरांच्या देखण्या अस्तित्वाचा कानोसा घेत आम्ही त्या जागेकडे सरकू लागतोय. दाट जंगलातली ती जागा! डेरेदार झाडांच्या आभाळ फांद्या दूरदूपर्यंत फैलावलेल्या.

आता मोरांचे आवाज अधिक जवळून येत असलेले. आम्ही अजून थोडं पुढे सरकतोय. गवताची तलम फुले वाऱ्यावर डोलू लागलेली. गवतात सांडलेली मोरांची असंख्य पिसं दिसू लागतात.. आम्ही स्वत: ला झुडूपात लपून पाहतोय.. मोरांनी आम्हाला पाहू नये म्हणून! अचानक दोन-चार मोर पुढे सरसावतात. उतरतात झाडावरून त्या स्वर्गीय  जागेवर अन् फुलवतात आपला देखणा पिसारा.. माझं हृदय वेल्हाळू लागलेलं! पण भोवती अंधार दाटू लागलेला. जवळच्या झाडाच्या फांदीतून अचानक भिरलेलं एक पीस अलबत ओंजळीत पकडून मीही क्षणभर नाचून घेतोय. परतीच्या रस्ताभर मोर माझ्या मनात बेधुंद नाचू लागतोय!
रवींद्र जवादे – response.lokprabha@expressindia.com