जय पाटील

राजकारण म्हटलं की जनाधार, लोकप्रियता याबरोबर टीक-टिप्पणी, वाद, चिखलफेकही आलीच. हे दोन्ही पचवणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. टीकेच्या बाबतीत पचनक्षमता अगदीच नाजुक असलेल्या भाजपाने याची प्रचिती पुन्हा एकदा दिली. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर नेटकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत यू ट्युब चॅनलवर अवघ्या काही मिनिटांत साडेचार हजार डिसलाइक नोंदवले. त्यानंतर लगेचच या चॅनलचे डिसलाइक बटन बंद झाले. त्यामुळे भाजपाला टीकेची भीती वाटत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर चांगलीच रंगली.

याआधी ३० ऑगस्टला झालेल्या मन की बातमध्ये नीट आणि जेईईच्या मुद्द्यावर भाष्य न केल्यामुळे पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या रोषाचे धनी ठरले होते. त्यावेळीही पंतप्रधान कार्यालयाच्या यू ट्युब चॅनलवर प्रतिक्रियांचा भाग बंद पडला होता. विद्यार्थ्यांच्या रोषाचे पडसाद उमटू नयेत म्हणून मुद्दाम प्रतिक्रिया बंद ठेवण्यात आल्याची टीका झाली होती. मंगळवारी सकाळासून ‘बॉयकॉट मोदी भाषण’ हा हॅशटॅग ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत होता. मोदी यांचे भाषण डिसलाइक करण्याचे आवाहनही करण्यात येत होते. भाषण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत भाजपाच्या अधिकृत चॅनलवर हजारो डिसलाइक्स नोंदवण्यात आले. त्यानंतर डिसलाइक दिसणे किंवा नोंदवले जाणे बंद झाले. त्यामुळे समाजमाध्यमांवर भाजपाला डिसलाइक्सची भीती वाटत असल्याची चर्चा रंगली. ‘लाइक्स से नहीं डिसलाइक्स से डर लगता है सहाब,’ ‘डर गये जनाब ३६,’ ‘डिसलाइक बटन डिसएबल्ड- इसे डर के भाग जाना कहते हैं. कब तक भागोगे, बिहार, बंगाल में पकडे जाओगे’, ‘देश को संबोधित तो किया पर डर के मारे डिसलाइक बटन गायब कर दिया’, ‘आम्ही डिसलाइक कसं करायचं, प्रतिक्रिया कशी नोंदवायची, कृपया मार्गदर्शन करा,’ ‘व्हॉट यू थ्रो अप कम्स बॅक डाउन… गोदीजी हाइडिंग लाइक्स, डिसलाइक्स. यह डर अच्छा लगा’ अशा आशयाच्या पोस्ट्स व्हायरल झाल्या.

काहींनी डिसलाइक बटन बंद करण्यात आल्याचं दाखवणारे स्क्रीनशॉट्स शेअर केले. मोदी यांनी भाषण नेमकं कशासाठी केलं, काय नवी माहिती मिळाली? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. अक्षय कुमारच्या विविध चित्रपटांतील दृश्य वापरून मीम्स तयार करण्यात आली. मोदी भक्तांना मोदींनी बरेच दिवसांत थाळ्या, मेणबत्त्यांसारखी कोणतीच कामं दिली नसल्याचं निदर्शनास आणून देत खिल्ली उडवण्यात आली. भाजपने रडीचा डाव खेळल्याचीच भावना समाजमाध्यमांतून व्यक्त झाली.