– मनोज भोयर

जगभर कोविड-19 अर्थात करोनाच्या विषाणूंनी थैमान घातले आहे. चालती-बोलती माणसं अचानकच मृत्यूमुखी पडत आहेत. चीन देशातून परसलेल्या या विषाणूने बघता बघता सगळ्या जगालाच आपल्या विळख्यात घेतले आहे. सुरुवातीच्या काळात कोणालाच काहीच कळत नव्हतं की, करोनाची लागण नेमकी होतेय कशी… हा संसर्गजन्य आजार आहे, इतकाच अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील लोक वर्तवत होते. मात्र मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढतच होता. करोनाला काबू करण्यासाठी शासन/प्रशासन अशा सर्वच यंत्रणा जिवाचे रान करत होत्या… त्या आजही करताहेत. प्रसार माध्यमंही दिवस-रात्र करोनासंबंधीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न करत होते. त्यामुळे सहाजिकच मलाही 24बाय7 काम करावं लागतच होतं. त्यातच ऑफिसमध्ये स्टाफची कमतरता होती. म्हणून मग कामाचा ताण अधिकच होता. मात्र, इतक्या वर्षांच्या टेलिव्हिजन वर्ल्डमधील अनुभवामुळे कमी मनुष्यबळातही आम्ही काम करतच होतो. करोनापासून बचाव करण्यासाठी जे जे उपाय करायचे असतात, ते सारे उपाय मी खरंतर आम्ही सर्वचजण करत होतो. त्या उपाययोजना करून आणि आवश्यक ती काळजी घेवूनच आम्ही ऑफिस आणि घरातही वावरत होतो. दुसरीकडे, करोनाचा प्रार्दुभाव वाढतच होता. आणि अशातच एकेदिवशी मी पॉझिटिव्ह असल्याचे मला समजले… क्षणभर काहीच सूचले नाही… मात्र त्यानंतर होतं नव्हतं तेवढं सारं मानसिक बळ एकवटलं आणि पुढच्या परिस्थितीला सामोरा गेलो… पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह असा चाचण्यांचा प्रवास नेमका कसा झाला, हे मांडण्याचा केवळ हा प्रयत्न नाहीय. तर या जिवघेण्या संकटाशी दोन हात करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, याबाबत काहीतरी सुचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे…

करोना होण्यापूर्वीच माझं जग
करोना काळात सुद्धा मी गेला महिनाभर ऑफिसमध्ये सातत्याने जात होतो. ऑफिसमध्ये करोनामुळे येणार्‍यांची संख्या खुपच घटली होती.आणि त्या कमी मनुष्यबळात चॅनेल जास्तीत जास्त कसं चांगलं ऑन एअर जाईल याचाच आम्ही सगळे प्रयत्न करीत होतो. मात्र २० एप्रिल… तो सोमवारचा दिवस होता. मी दुपारी ऑफिसला गेलो होतो. सवयीप्रमाणे कामाला सुरुवात झाली. त्यादिवशीही महाराष्ट्रभरातील ब्युरो आणि स्ट्रींजर्सकडून येणार्‍या बातम्यांचा वेध घेतला. हे सगळं करेपर्यंत चार वाजताची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमीत होणारी पत्रकार परिषद सुरू झाली. ही चॅनेलसाठी लाईव्ह जाणारी पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्या पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे कॉम्प्युटरवर टाईप करत होतो. ती पत्रकार परिषद संपल्यानंतर नव्याने पुन्हा काम करण्यासाठी छोटा ब्रेक घेतला. सहकार्‍यांसोबत चहा घेतला आणि पुन्हा न्यूजरूममध्ये परतलो.

काम करता करताच मला बातमी कळली की, स्टुडिओमध्ये काम करणार्‍या एका कॅमेरामनला करोनाची लागण झाली आहे. मात्र त्या कॅमेरामनच्या नावात आणि त्याच्या घराच्या पत्त्यात महापालिकेच्या अधिकार्‍यांना एकसूत्रता सापडत नव्हती. त्यामुळे काही काळ आमच्या ऑफिसमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मूळचा कर्नाटकमध्ये राहणारा आणि इथे मुंबईत मात्र एकटाच राहणार्‍या या कॅमेरामनला करोनाची लागण होवू नये, असच मलाही वाटत होते. पण आता या बातमीमुळे मात्र काळजात एकदम धस्स झालं. कारण गेला महिनाभर करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी शक्यती सर्व काळजी घेत होतो. ही काळजी घेताना मी नियमीतपण व्यायाम करत होतो. संत्री खात होतो… आणि कायमच हळदी घातलेलं गरम पाणी पित होतो. अगदी स्टुडिओत अँकरिंग करत असतानादेखील मी ही सर्व काळजी घेतच होतो.

ही बातमी आमच्या सर्वांसाठी अस्पष्ट जरी असली तरी ती माझ्या पत्नीला सांगणं तितकंच महत्त्वाचं होतं, म्हणून तिलाही मी तातडीने फोन केला. कारण घरात 13 वर्षांचा माझा मुलगाही होता. ही बातमी ऐकून स्वाभाविकपणे तीही घाबरली… आणि खरंतर घाबरण्याचं दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अँकरिंग करण्याच्या निमित्ताने त्या कॅमेरामनचा आणि माझा स्टुडिओमध्ये सतत संपर्क येत होता. रात्री दहा वाजेपर्यंत अशाच बेचैन आणि अस्वस्थ मनाने मी काम करत होतो. यानंतर मग मी ऑफिसच्या कारने घराकडे निघालो. तोपर्यंत त्या कॅमेरामनला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मग मी सोसायटीच्या गेटमधून आत आलो. गेटवर माझी ऑफिसची बॅग आणि माझे हात नीट सॅनेटाईज करून घेतले. लिफ्टने वर आलो. दाराच्या समोरचा सॅनेटायझरचा स्प्रे हातात घेतला आणि सर्वात आधी माझ्या मजल्यावरील लिफ्ट माझ्या दारातल्या स्प्रेने सॅनेटाईज केली. स्वत:चे शूजही सॅनेटाईज केले . पत्नीने दरवाजा उघडला. तिच्या चेहर्‍यावर मला चिंतेचं जाळं स्पष्ट दिसत होतं. मी तिला काहीही न बोलता घरात प्रवेश केला आणि ठरलेल्या जागेवरच मी माझी बॅग ठेवली आणि बाथरूम जवळ आलो. स्वत:चा बेल्ट, घड्याळ सॅनेटाईज केले. टिफिन सॅनेटाईज केला आणि कपडे थेट कडक डेटॉलच्या पाण्यात टाकून आंघोळ केली. सर्वात महत्त्चाचं म्हणजे, त्या दिवशीच मी माझ्या बेडरूममध्ये सेल्फ कॉरेन्टाईन झालो. करोनाच्या सावटामुळे सेल्फ कॉरेन्टाईनची ती रात्र अतिशय अस्वस्थ आणि बेचैनीत गेली.

जेव्हा मला करोनाचा अंदाज आला
दुसर्‍या दिवशी पत्रकारांसाठी चेंबूरमध्ये करोना चाचणी शिबिराचे आयोजन केले गेले होते. ईस्टर्न प्रेस क्लब आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पत्नी न्यूज 18 लोकमतची पत्रकार असल्यामुळे आम्ही दोघांनीही वेगवेगळ्या वाहनांमधून जावून दोघांनीही टेस्ट करून घेतली. मोठ्या कालावधीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात फिल्डवर काम करणारे पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडीओ कॅमेरामन यांच्या भेटी झाल्या. या अगोदर अशाच एका चाचणी शिबिरामध्ये ५३माध्यमकर्मींना झाली होती. देशभर या बातमीने अस्वस्थता पसरली. मीडियाकर्मींच्या घरात आधीच असलेली काळजी कैक पटीने वाढली .याच 53 जणांमध्ये आमचाही तो कॅमेरामन होता. त्यामुळे हे चाचणी शिबिर आम्हा मीडियाकर्मींसाठी खूपच महत्त्वाचे ठरले होते. मेडिकल स्टोअरमधून मास्क आणि हँडग्लोज यांचा पुरेसा साठा विकत घेवून मी घरी पोचलो. तेव्हा संध्याकाळी मला थोडासा अशक्तपणा जाणवू लागला होता. अंगात थोडा ताप असल्याचेही जाणवत होते. आणि मी तेव्हाच मी निर्णय घेतला की, आता आपण घरामध्ये अजिबात थांबायचे नाही.
भाग २ – जेव्हा मी संशयीत करोना रुग्ण झालो
(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)