शरद कद्रेकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीच्या भारतीय संघाचा चांगला दबदबा आहे. मात्र एक काळ असा होता ज्यावेळी भारतीय संघाची परिस्थिती फारशी बरी नव्हती. ही गोष्ट आहे ६० च्या दशकातली…ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या तीन अव्वल संघांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व होतं. या संघांच्या तुलनेत भारत-पाकिस्तान, न्यूझीलंड यांच्यासारखे देश खिजगणतीतही नव्हते. नरी काँट्रॅक्टरला झालेल्या दुखापतीमुळे २१ वर्षीय मन्सूर अली खान पतौडीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं. १९६८ साली पतौडीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-१ ने हरवत इतिहास रचला. याआधी परदेशात भारताची विजयाची पाटी ही अंदाजे तीन तपांपर्यंत कोरीच होती, मात्र पतौडीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ११ मालिकांच्या पराभवाची मालिका खंडीत करत इतिहास रचला. परदेशातील या पहिल्या वहिल्या विजयाचे श्रेय जाते ते प्रसन्ना आणि बेदी या जोडगोळीला. मात्र या सर्वांमध्ये मराठमोळ्या बापू नाडकर्णींनीही आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचे ७४ पैकी ५४ मोहरे बेदी-प्रसन्ना आणि नाडकर्णी या त्रिकुटाने गारद केले. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे ३६ वर्षीय बापू नाडकर्णी यांनी १७.९२ च्या सरासरीने १४ बळी गारद केले. बापूंच्या खात्यात बळी कमी असले तरीही सरासरीत त्यांचं अव्वल स्थान पटकावणं त्याकाळात कोणालाही जमलं नव्हतं. ख्राईस्टचर्च कसोटीत बापूंनी ६६ षटकं टाकली तर वेलिंग्टन कसोटीत ४३ धावात ६ गडीदेखील टिपले. आपल्या समारोपाच्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत बापूंनी सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.

पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत चांगली सुरुवात केली. इरापल्ली प्रसन्ना आणि बापू नाडकर्णी हे या विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात नाडकर्णीच्या गोलंदाजीचं पृथक्करणं होतं, ४८.३ षटकं, २६ निर्धाव, ४४ धावा आणि ३ बळी…तर दुसऱ्या बाजूने प्रसन्नाने या सामन्यात ६ बळी घेतले. मात्र ज्या पद्धतीने बापू नाडकर्णींनी न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला ते पाहण्यात एक वेगळीत मजा होती. मुंबईकर अजित वाडेकर यांनी या सामन्याच चमकदार फलंदाजी करत दोन्ही डावांत अर्धशतकं झळकावली. ५ गडी राखून भारताने हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मात्र या सामन्यातली बापू नाडकर्णींची गोलंदाजही लक्षात राहण्यासारखी आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचं गणित बिघडलं…नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी देण्याचा पतौडीचा निर्णय पुरता फसला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत सामन्यावर वर्चस्व गाजवलं. ६ गडी राखत दुसरा कसोटी सामना जिंकत न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. वेलिंग्टनला खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा प्रसन्ना आणि नाडकर्णी या फिरकी जोडगोळीची जादू चालली आणि न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. नाडकर्णींनी दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. यानंतर ऑकलंडच्या अखेरच्या कसोटी सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत ३-१ ने बाजी मारली. तीन महिन्याच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड जोड दौऱ्यात कांगारूंकडून ४-० असा मार खाणाऱ्या भारताने किवीजवर ३-१ असा विजय संपादताना इतिहास घडवला.

कसोटी सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करावं लागतं याची जाणीव टायगर पतौडीला झाली. फिरकी गोलंदाजी हेच भारताचे प्रमुख अस्त्र हे त्याने हेरलं. बेदी, प्रास,चंद्रा आणि वेंकट या चौकडीवर भारताची भिस्त होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मिळून ८५३ बळी घेतले. क्लाईव्ह लॉईडकडे रॉबर्टस, होल्डिंग, गार्नर, क्रॉफ्ट असा भेदक मारा करणारी तेज चौकडी कसली तर तोफखानाच होता ! मात्र यानंतर याच फिरकीपटूंच्या जोरावर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. फिरकी चौकडीच्या उदयाआधी भारताने केवळ ७ विजय मिळवले ते देखील ७६ कसोटी सामन्यात…त्यामुळे भारतीय संघात फिरकीपटूंचं असणारं महत्व हे अधोरेखित होतं. टायगर पतौडीच्या भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये विजय मिळवत भारतीय संघाचा पाया रचला…यानंतर अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करत कळस चढवला. भारतीय संघासाठी हा बदल महत्वाचा होता, कारण पूर्वी सामना बरोबरीत सोडवण्यात धन्यता मानणाऱ्या भारताला आणि सामना विजयाची आस लागली होती.