– मनोज वैद्य, राजकीय विश्लेषक

उध्दवनीतीचा पूर्वार्ध आपण पाहिला. सत्तेत राहुन विरोधकांची भूमिका पार पाडली. त्यावर वेळोवेळी विस्तृतपणे लिहीले गेले आहे. एकाचवेळी शिवसैनिकांना व सत्तातूर सेना लोकप्रतिनीधींची मानसिकतेची भूक भागविणारी योजना तर होतीच. त्याचवेळीस भाजपाने केलेल्या कृतघ्नपणाची परतफेड होती, आणि विरोधी पक्षांची स्पेससुध्दा शिवसेनेनी व्यापली होती. आता या उध्दवनीतीच्या उत्तरार्धात त्यांना शिवसैनिकांकडून अपेक्षित काय आहे, अप्रत्यक्षपणे काय संदेश देत आहेत ते समजून घेणारा “स्मार्ट” शिवसैनिक आणि त्यांचा मतदार हवा आहे. जो मनकी बात नाही तर मौन की बात समजून घेऊन काम करेल.

गोव्यात शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काही उमेदवार दिले आहेत. ऐन निवडणूकीचा मोसम असताना, सामना या शिवसेनेच्या मुखपृष्ठावर राहुल गांधी यांच्या प. बंगालच्या अतीविशाल सभेचे मोठ्या व ठळक छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द करते. यातून ते काय सांगत आहेत, ते शिवसैनिकांनी समजून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून भाजपचे जेवढे कमी खासदार निवडले जातील, ते शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात सेनेचा वरचष्मा राहील. कारण नवीन निकालांच्या आकडेवारीवर जागांचे वाटप केले जाईल. त्यामुळे सेनेला पुन्हा भाजपपेक्षा जास्त जागा हक्काने मागून घेता येतील. अन्यथा मोठा भाऊ हे भाजपने हिसकावून घेतलेला दर्जा पुन्हा प्राप्त करणे गरजेचे आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते रोज दही खाणारे आहेत. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते. ते उध्दव ठाकरे मोदींना जाहीरपणे ” पहारेकरी चोर “आहे हे म्हटलेले विसरले असतील का? अमित शाह तर ” रिव्हेंज ” मानसिकतेचे आहेत. त्यांना मातोश्रीवर जाणीवपूर्वक वहाणा झिजवायला लावल्या हे विसरले असतील का? तर याचे उत्तर नाही असे आहे. पण अमित शाह नेहमी म्हणतात की, सत्ता असली की अपमानाचा हिशोब कधीही चुकता करता येतो. पहिली सत्ता मिळवली पाहीजे. भाजपचे माईंड गेम करणारे सगळे वरिष्ठ नेते, एकच गाणे म्हणत आहेत, अपना टाईम आयेगा!

त्यामुळे उध्दवनीतीला जशी मोदीलाट ओसरण्याची जी परिस्थितीची साथ मिळाली. त्यामुळेच भाजपला झुकवून बरे जागावाटप करुन घेतले, तसेच उत्तरार्धातसुध्दा घडायला हवे. अन्यथा सेना-भाजपचा बदला-२ च्या सामनामध्ये भाजप वरचढ चढू शकते. त्यासाठी देशात भाजपचे पूर्ण बहुमत नसले पाहिजे. सध्या भाजपला महाराष्ट्राकडून खुपच अपेक्षा आहेत. कारण उत्तर प्रदेश, बिहारमधून फारशी आशा नाही. तर हिंदीपट्ट्यात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपच्या जागा कमी होणार आहेत. त्यात गुजरातमध्येसुध्दा मागच्या वेळेप्रमाणे पैकीच्या पैकी जागा मिळणार नाहीत.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून भाजपच्या जागा कमी झाल्या पाहीजेत. किंबहुना ते शिवसेनेचे धोरण असले पाहिजे. त्यामुळे एनडीएचे काठावर बहुमत आले तर, शिवसेनेला केंद्रीय मंञीमंडळात जास्त मंत्रीपदे मिळतील.त्याचा फायदा राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यात होईल.तसेच देशपातळीवर शिवसेना पोहोचू शकेल. शिवसेनेचे खासदार निवडून येणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. कारण भाजपची केंद्रामध्ये सत्ता येणे, त्यात मोदींना पूर्ण बहुमताने पंतप्रधानपदी बसविणे भाजपची प्राथमिकता आहे. पण शिवसेनेची ही गरज नाही हे कोणीही सांगू शकेल. महाराष्ट्रात शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे शिवसेनेचे स्वप्न आहे.

त्यासाठी शिवसैनिकांना काय केले पाहिजे. तर भाजप जितकी मजबूत होईल तेवढी शिवसेना कमकुवत होईल. त्यासाठी भाजपच्या खासदारांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. शिवसेनेचा आत्मसन्मानाचा आवाज वाढेल. शिवसैनिकांनी आता राजकारणाची खेळी प्रत्येक भाजपच्या मतदारसंघात कशी करावी, यांचे मार्गदर्शन सामनातून व्हावे असे वाटत असेल तर ते अपरिपक्वपणाचे ठरेल. शिवसेनेचा प्रत्येक खासदार निवडून येणे ही भाजपची ” मजबूरी ” आहे ,अगदी पालघरचा सुध्दा आला पाहिजे. पण शिवसेनेवर मात्र त्यासाठी मानसिकतेचा,अगदी नैतिकतेचा सुध्दा दबाव नाही. प्रत्येक मतदारसंघात सेना-भाजपचा समन्वयक नेमण्यात आला आहे. ते प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांशी बोलून युतीची”समझौता एक्सप्रेस ” रुळावर आणणार आहेत. पण तिला वेग येईपर्यंत बहुधा निवडणूका संपलेल्या असतील. शिवसैनिकाची मोठी अडचण अशी आहे की, जिथे भाजपचा उमेदवार आहे, त्या प्रत्येक पोलिंगवर कमळाचे बटण दाबा हे स्थानिक मतदाराला सांगणे सोपे नाही. विशेषतः ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (पालिका व पंचायती) त्याला काट्याची टक्कर द्यायची असते, तिथे त्याला आपल्या मतदाराला हा संसर्ग झालेला परवडत नाही. कारण मतदार घडवायला अनेक वर्षे कष्ट करावे लागतात.

यामुळे उध्दवनीतीच्या पूर्वार्धातील रणनीती फारच आरडाओरडा करणारी होती. अगदीच उघडपणाने हल्ला करणारी होती. उध्दवनीतीचा उत्तरार्धात मात्र सारेच मौनात असा होणार असे दिसते आहे. यांमध्ये शिवसैनिकांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. भाजपचा उमेदवार पराभूत करण्यासाठी तटस्थच राहून चालणार नाही. तर प्रत्येक मतदारसंघात भाजपला पराभूत करेल अशा पक्षाच्या उमेदवाराला, थेटपणे मते ट्रांसफर करावी लागतील.

भाजपचे चाणक्य सध्या काळजीत आहेत.शिवसेनेच्या या गनिमी काव्याला कसे तोंड द्यावे. पण शिवसैनिक जालन्यातील असो अथवा भिवंडीतील असो, त्याला हे शिवकार्य केल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही. भाजपच्या खोटेपण्याच्या राजकारणांला शह अभिनय करुन कसा देणार, हे नवीन पिढीचा शिवसैनिक या मोहीमेत किती यशस्वी होईल ते निकालांच्या दिवशी कळेलच. सध्या गाजत असलेले हिंदी कवी राहत इन्दोरी यांची गाजलेली कविता सध्याच्या परिस्धितीला समर्पक आहे, पुढीलप्रमाणे …

झूठों ने झूठों से कहा है सच मत बोलो
सरकारी ऐलान हुआ है सच मत बोलो
घर के अंदर झूठों की एक मंडी है
दरवाजे पर लिखा रखा है सच बोलो
गंगा मैया डुबने वाले अपने थे
नांव में किसने छेद किया है सच बोलो.

२३ मे रोजी निवडणूकीचा निकाल लागल्यानंतरच कळेल उध्दवनीतीचा उत्तरार्ध, महाराष्ट्रातील जनतेला एक नवीन शिवसेना पहायला मिळू शकेल. पण उध्दव ठाकरेंच्या मौन की बातला शिवसैनिक किती समजून घेतात यावरच सारे अवलंबून आहे.