03 April 2020

News Flash

BLOG : अस्तित्वाचे ‘राज’कारण विसरले?

लोकसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ फेसबुक आणि ट्विटरवर 'अनाकलनीय...' इतकी प्रतिक्रिया देऊन राज ठाकरे पुन्हा गायब झाले.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मतदाररूपी विठ्ठलाकडे वारी काढायला सुरुवात केली आहे. पण, यात मात्र राज ठाकरे कुठेच नाहीत. त्यांचा मुद्दा आहे तो EVM चा. यासाठी त्यांनी मुंबईत विरोधी पक्षातील नेत्यांसोबत पत्रकार परिषदही घेतली आणि आपण घरोघरी जाऊन लोकांमध्ये याविषयी जागृती करणार असल्याची भूमिका घेतली. भाजप EVM मध्ये काहीतरी गडबड करतो आणि निवडणूक जिंकतो, असा त्यांचा आरोप.

पण, राज ठाकरे इथवर का पोहोचले? याचा इतिहास काय? या सर्वाची सुरुवात अचानक झाली नाही; मग त्याची कारणे काय? याची कारणे आहेत ती अगदी २०१२-१३ या वर्षांमध्ये. ही तीच वर्ष होती जेव्हा राज ठाकरे नरेंद्र मोदींचे खंदे समर्थक होते. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने आपल्याला भविष्यात शिवसेनेची जागा घेता येईल, ही मनीषा राज ठाकरेंची असणार यात वाद नाही. पण, फासे उलट पडले. शिवसेनेचे १८ खासदार आले आणि भाजपला स्वबळावर बहुमतही मिळाले. विधानसभेत मात्र भाजपचे बहुमत नसले तरीही मनसेच्या निवडून आलेल्या एका आमदाराने भाजपला काहीच फरक पडणार नव्हता. सत्ता चालवण्यासाठी शेवटी शिवसेना सत्तेत सहभागी झाली. रोज भांडत – रडत का होई ना, पण देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला. आज त्यांच्याइतके राजकीयदृष्ट्या वजनदार नेते राज्यात नाहीत.

पण, या सर्व काळात गोची झाली ती मनसे आणि पर्यायाने राज ठाकरेंची. हातातल्या महापालिकेतील जागा सुटू लागल्या. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवलं तेच आज विरोधात होते. त्यामुळे मनसेला विरोधी पक्षाची जागाही महाराष्ट्राच्या राजकारणात राहिली नाही. शिवसेनेने सरकारमध्ये जागा पक्की केली आणि विरोधी पक्षाचीही भूमिका निभावली. दरम्यानच्या काळात मनसेची पक्ष म्हणून अवस्था गडगडू लागली. ‘ना घर का ना घाट का’ या अवस्थेत पक्ष रुतला आणि राज ठाकरे यांच्या लहरी स्वभावाने तो बराच दिशाहीनही झाला.

यातच लोकसभा निवडणूका होऊ घातलेल्या असताना राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील ‘स्नेह’ वाढू लागला आणि मनसे लोकसभा लढवणार नाही; पण युती विरोधात उघड प्रचार करेल ही भूमिका घेऊन राज ठाकरेंनी आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला. याचे परिणाम कितपत झाले, यावर आता चर्चा नको. ती बरीच झाली. पण, खरी मेख पुढे आहे. कारण, राज ठाकरेंचे उपद्रव मूल्यही आजच्या राजकारणात राहिलेले नाही, ही ठळक बाब आहे.

लोकसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ फेसबुक आणि ट्विटरवर ‘अनाकलनीय…’ इतकी प्रतिक्रिया देऊन राज ठाकरे पुन्हा गायब झाले. भाजपचा डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर लगेच दुपारी पत्रकार परिषद घेणाऱ्या राज ठाकरेंनी लोकसभेच्या निकालानंतर माध्यमांना साधी प्रतिक्रियाही दिली नाही. खरे तर आपल्या बहुचर्चित सभांचा सपाटा लावणारे राज ठाकरे कुठे गायब झाले? हा प्रश्न अनेक जण समाज माध्यमांवर उपस्थित करत होते.

लोक सभेचे निकाल लागून दोन महिने होऊन गेल्यावर राज ठाकरे काहीसे दिसू लागले. काही ठिकाणी पक्षांतर्गत बदल, शाखांची उद्घाटने किंवा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तत्सम काही कार्यक्रमांत ते आता दिसत होते. नाही म्हणायला दिल्ली वारी करून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि EVM वर चिंता व्यक्त केली. तेव्हाच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही ‘सदिच्छा भेट’ घेतली.

याच दरम्यान त्यांचे पुत्र अमित ठाकरेसुद्धा पक्षात जबाबदारी स्वीकारताना दिसू लागले.

लोकसभेत ‘मनसे फॅक्टर’चा शून्य परिणाम झाल्यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार आणि विधानसभेत कसे आमदार निवडून आणणार, हा विषय महत्त्वाचा होता. पण, आज निवडणुकीला अगदी दोन महिने राहिले असले तरी, राज ठाकरे नक्की काय करत आहेत? हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पडला असेलच.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज ठाकरे गेले कलकत्त्याला… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेऊन EVM हेच युतीच्या विजयाचे कारण असून आपण उभारत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा, म्हणून ते दिदींना भेटले. त्यानंतर राज यांनीच पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार दीदींनी त्यांना “मोर्चात मी आहे असे समजा,” असे सांगून पाठिंबा दिला.

याचाच अर्थ असा की दीदींनी राज ठाकरेंच्या भूमिकेला केवळ आणि केवळ ‘नैतिक’ पाठिंबा दिला. बरं, ममतांच्या बंगालमध्ये निवडणुकीला दोन वर्षे आहेत. तर महाराष्ट्रात दोन महिन्यांत निवडणूक आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे प्रयत्न हे महाराष्ट्र विधानसभेसाठी आहेत, हे न जाणण्याइतपत दुधखुळे कोणीच नाही.

ही भेट साधून राज ठाकरेंनी नक्की मिळवले तरी काय? कारण महाराष्ट्रात ममता बॅनर्जींना कोणी विचारत नाही की बंगालमध्ये राज ठाकरेंचा काही करिष्मा आहे. अनधिकृत बांग्लादेशी मुसलमानांना आजवर दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि बंगालमध्ये वाढलेल्या राजकीय हिंसाचारामुळे ममता बॅनर्जी या कोणालाच विश्वासार्ह नेत्या वाटत नाहीत. २०२१ मध्ये त्या सुद्धा अखिलेश यादव, मायावती, लालू प्रवास यादव आणि चंद्राबाबू नायडूंच्या पंगतीत जाऊन बसतील अशा शक्यता जास्त आहेत.

खरे तर, राष्ट्रीय राजकारणात राज ठाकरे सुद्धा त्यांच्या भूतकाळातील टोकाच्या आणि जहाल ‘परप्रांतीय विरोधी’ भूमिकेने वाळीत टाकले गेलेले नेते आहेत. त्यांच्या याच प्रतिमेमुळे महाराष्ट्रात काँग्रेसने मनसेला उघडपणे आघाडीत स्थान द्यायला विरोधही केला होता.

आज निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असताना शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर नेते आदेश बांदेकर ‘माऊली संवाद’ करत फिरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ‘महाजनादेश यात्रा’ काढत आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीनेही ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढून प्रचाराला सुरुवात केली आहे.

पण, या सगळ्यात राज ठाकरे आहेत कुठे? तर त्याचे उत्तर आहे कलकत्त्यात. का? तर EVM च्या मुद्द्यावर भांडत आहेत. खरे तर शिवसेना सोडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये एक हवा निर्माण केली होती. पण, आज ही ऊर्जा कुठेच दिसत नाही.

मनसेने मराठीच्या मुद्द्यावर ठळक आंदोलन शेवटी कधी केले? असा प्रश्न विचारला तर आज कोणालाही त्याचे उत्तर देणे, कठीण जाईल. परप्रांतीय लोंढ्यांचा मुद्दा एके काळी लावून धरणारा पक्ष आज नक्की काय भूमिका घेतो आहे, हे समजायला मार्ग नाही. २०१४ पासून तर मनसेच्या भूमिका पाहिल्यास पक्षाचा जन्म मराठीच्या मुद्द्यासाठी झाला होता, हे संगितल्यास कोणाचा विश्वासही बसणार नाही. कोणते आंदोलन नाही, की स्पष्ट भूमिका नाही. कोणता मुद्दाच मुळात पक्ष उचलून धरत नाही. आणि घेतलेल्या मुद्द्यांना मतांच्या बाजारात किंमत नाही. यातून पक्षाची अधोगती आजवर कायम आहे.

२००९ मध्ये पहिल्याच निवडणुकीत त्याच EVM वर १३ आमदार मिळवणारा पक्ष आज अचानक त्याच यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करत आहे. पण, निवडून आलेल्या व्यक्ती कशा सोडून जातात? त्यात तर EVM चा दोष नाही ना? यावर साधा विचारही करत नाही.

राज ठाकरे आज पुरते दिशाहीन आहेत. एके काळी ज्यांच्या नकला करून राज त्यांच्या सभेत गर्दीच्या टाळ्या आणि दाद मिळवत होते त्याच छगन भुजबळ, अजित पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत ते जवळीक साधतात. देशात आज ज्या नेत्यांची आणि पक्षांची पत, जनाधार आणि विश्वासार्हता उरलेली नाही, अशा नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ते आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करतात. यात जनसंपर्क आणि जनतेशी संवाद या बाबी कुठे दिसतही नाहीत. माध्यमे आणि पत्रकार सोडले तर राज यांचे कौतुक कोणालाच नाही.

पक्षातले चार चेहरे सोडल्यास कोणी चेहरेही दिसत नाहीत. एके काळी जनाधार असलेले हे चेहरे आज शेवटचा किल्ला लढवत असल्यागत भासतात.

मोठा गाजावाजा करून राज ठाकरे (खूप उशिरा का होईना) समाज माध्यमांवर आले. पण, सुरुवातीचा उत्साह लगेच मावळला. मध्यंतरी आपल्या व्यंगचित्रांचा धडाका लावल्यानंतर आता तिथेही दुष्काळच आहे. तरुणांशी संवाद साधण्यासाठी पक्षाकडे नक्की कोणती योजना आहे?

येणाऱ्या निवडणुका या महाराष्ट्रातील विषयांवर आणि समस्यांवर लढण्यापेक्षा मनसेला त्या लोकांना फारशा न पटणाऱ्या EVMच्या मुद्द्यावर लढवायच्या असतील तर अगदी मतपत्रिकेवर घेतल्या तरी मतं मिळणार नाहीत, हे समजत नाही काय?

आपण शिवसेनेतून बाहेर का पडलो? आपला नक्की मुद्दा काय? आपली खरंच एक भूमिका आहे काय? आपले नक्की उद्दिष्ट काय? यासाठी कोण पोषक आहे? आणि मुळातच आपण पक्ष नक्की का स्थापन केला? या सर्व प्रश्नांची उत्तरे कुठेच सापडत नाहीत. हे चित्र पाहून आपल्या अस्तित्वाचे राज कारणच विसरले का? असा प्रश्न पडूच शकतो.

 

– संदेश सतीश सामंत
messagesamant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2019 2:09 pm

Web Title: mns president raj thackeray jammu kashmir maharashtra bjp narendra modi abn 97
Next Stories
1 Blog : तहान भागवणारं पाणी आज जीवघेणं ठरतंय
2 Friendship day 2019 : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स
3 लोकमान्य टिळक पुण्यस्मरण : अवघाचि झाला देह ब्रह्म
Just Now!
X