21 October 2020

News Flash

BLOG: पाकिस्तानपेक्षा पवार, ठाकरेंना बालाकोटची जास्त चिंता

बालाकोट स्ट्राइकचा विषय निघाला की पुरावे मागितले जातात. देश भावनेपेक्षा त्याची सत्ता भावना प्रबळ होते.

२६ फेब्रुवारीच्या आधी बालाकोट काय आहे, कुठे आहे तिथे काय चालते हे कोणालाच माहित नव्हते. कोणाला त्याबद्दल माहित असण्याची गरजही नव्हती. पण २६ फेब्रुवारीला इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी पाक पुरस्कृत दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक केला आणि बालाकोट हे नाव सर्वांच्यांच तोंडी बसले. भारताने आपल्या कारवाईत पाकिस्तानचा दहशतवादी नेटवर्कमधील एक मोठा तळ नष्ट केला. त्यामुळे खरंतर बालाकोटच नाव ऐकून पाकिस्तानच्या काळजात धस्स झालं पाहिजे. पण इथे उलट घडतंय.

बालाकोटचा मुद्दा निघाला की, भारतातील राजकारणी अस्वस्थ होतात. बालाकोट स्ट्राइकचा विषय निघाला की पुरावे मागितले जातात. देश भावनेपेक्षा त्याची सत्ता भावना प्रबळ होते. सत्तेचा कलश आपल्यापासून आणखी दूर जाऊ नये यासाठी मग बालाकोटचं अपयश दाखवून देण्यासाठी भारतीय राजकारण्यांमध्ये स्पर्धा सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी बालाकोट प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावेळीही बालाकोटचा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेने याची सुरुवात केली आहे. खरंतर बालाकोटच्या कारवाईमधून भारताने आपली शत्रू कुठेही लपलेला असला तरी त्याला शोधून लक्ष्य करण्याची क्षमता दाखवून दिली होती. पण भारतात आज बालाकोट राजकीय लढाईचा मुद्दा बनला आहे. बालाकोटच्या विषयावरुन खुद्द लष्करप्रमुखांवरही टीका करायला राजकारणी मागे-पुढे पाहत नाहीत अशी स्थिती आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा बालाकोटचा मुद्दा उपस्थित करताना जवानांच्या रणांगणातील पराक्रमाचे किती श्रेय घ्यायचे याचा विचार करायला हवा.

विरोधकांनी सुद्धा बालाकोट एअर स्ट्राइकमधील त्रुटी, कमतरता दाखवताना त्याचा तिन्ही सैन्य दले, जनता, भावी पिढीच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. कारण अशा टीकेमधून आपणच आपल्या सैन्य दलाच्या क्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन शत्रूला हाती आयते कोलीत मिळवून देतो. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालाकोट एअर स्ट्राइकमधून झालेल्या नुकसानीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. एअर स्ट्राइकमधून काहीही साध्य झालेले नाही. एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांचा जरी खात्मा झाला असता तर त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सोडले नसते असे राज ठाकरे यांचा दावा होता.

आता शरद पवारांनी बालाकोटचा मुद्दा काढला आहे. सीमेवर पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर भाजपाला त्याचा लाभ मिळाला म्हणूनच भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली. तसंच पुन्हा पुलवामासारखं काही घडलं नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असं शरद पवार म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना नेहमीच सैन्यदलाच्या बाजूने उभी राहिली आहे. पण परवा बालाकोटवरुन शिवसेनेने खुद्द लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यावर टीका केली.

“लष्करप्रमुखांनी बोलायचे नसते, करून दाखवायचे असते, असा एक सैनिकी रिवाज आहे. देशाचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चेन्नई मुक्कामी जाहीर केले आहे की, हिंदुस्थानी हवाई दलाने उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. या तळाची पाकिस्तानने फेरबांधणी केली असून तब्बल ५०० अतिरेकी हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती जाहीर करून आमच्या लष्करप्रमुखांनी काय साध्य केले? असा सवाल शिवसेनेने केला.

एकूणच बालाकोटच्या विषयामागे या सर्व राजकीय पक्षांना मतपेटीची चिंता आहे. फक्त एका बालाकोट एअर स्ट्राइकमुळे भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात का? याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या काळातही आणि आता सुद्धा आर्थिक आघाडीवर मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. पण विविध लोककल्याणकारी योजनांचे जनतेपर्यंत पोहोचलेले लाभ आणि विरोधकांकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव या गोष्टी सुद्धा मोदींच्या यशाला कारणीभूत आहेत. लोकसभा आणि आता विधानसभेला मिळणाऱ्या यशा-अपयशाला फक्त एकटया बालाकोटशी जोडून पाहणे कितपत योग्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:17 pm

Web Title: over balakot sharad pawar uddhav thackeray have more concern than paksitan dmp 82
Next Stories
1 महानायकाचा महागौरव
2 BLOG : The Family Man : गोफ नव्हे गुंता!
3 Blog: आपली ऑस्करला एण्ट्री तर असते, पुढे काय?
Just Now!
X