– निनाद सिद्धये

मी राज ठाकरे यांचा एक प्रचंड मोठा फॅन किंवा चाहता आहे. त्यांचे व्यक्तिमत्व जबरदस्त आहे. अवघ्या मराठी समाजाचे नेतृत्व करण्याची ताकद आणि क्षमता त्यांच्यात निश्चितच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या सगळ्याच नेतृत्त्वावर जी मुलुखमैदान तोफ डागली आहे, ते पाहून एकीकडे पब्लिकची तुफान करमणूकही होते आहे आणि अंधभक्तांचा तीळपापडही होतो आहे.

राज ठाकरे ही काय जादू आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळे सांगायची गरज नाही. अवघ्या दशकभरापूर्वी भरभरून मतदान करून त्यांच्या पक्षाच्या 13 आमदारांना मराठी माणसाने विधानसभेत पाठवले. त्याच सुमारास 2009 मध्ये मुंबई महानगर प्रदेशातल्या लोकसभा जागांवर उभ्या असलेल्या त्यांच्या जवळपास प्रत्येक उमेदवाराने एक लाखाच्या आसपास मते मिळवत सेना-भाजपचा पराभव आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय सुकर केला. त्यानंतर मात्र त्यांच्या इंजिनाचा वेग मंदावत गेला. मोदींची दाढी कुरवाळली, तर आपण शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त प्रिय होऊ, या गोड गैरसमजाने त्यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळण्यास प्रारंभ केला आणि इथेच मनसेचे इंजिन रुळांवरून घसरले.

मुंबई ही ठाकरे कुटुंबियांची पहिली माशूका. बाळासाहेबांपासून ते राज ठाकरेंपर्यंत याच मुंबईने आतापर्यंत या कुटुंबावर अपार माया केली. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या स्व. बाळासाहेबांच्या मंत्रापासून ते मुंबई मराठी माणसाचीच, या जुन्या मंत्रात नवा हुंकार फुंकणाऱ्या राज ठाकरेंपर्यंत सगळ्याच ठाकरे कुटुंबियांनी मुंबईच्याच जोरावर महाराष्ट्र आपलासा केला. पण या मूळ मुंबईकराने जेव्हा राज यांना मोदीभजने गाताना ऐकायला सुरुवात केली, तेव्हा तो काहीसा मूढ झाला. ज्याच्याकडून सेना- भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यापेक्षा वेगळी काहीतरी अपेक्षा होती, तोच नेता मोदींसारख्या बेपारी वृत्तीच्या माणसाच्या आहारी जावा, हे बऱ्याच मराठी मनांना रुचले नाही.
राजकारण हे भाषणबाजीत जितके असते, त्याहून कित्येक पटीने ते समाजाची नाडी किंवा नस ओळखण्यात असते. आज शरद पवारांवर कितीही आरोप झाले, तरी त्यांच्याइतका महाराष्ट्र राज्यातल्या दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ठाऊक नसेल. पवारांची मुलाखत राज यांनी घेतली खरी, पण त्यातून ते कितपत शिकले, हा प्रश्न बऱ्याच अंशी अनुत्तरित राहिला आहे. आज मोदींच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवून त्यांनी भाजप-सेनेला गुगली टाकलाय, हे मान्य. त्याचा फायदा काही ना काही प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार, हेही मान्य. पण लेग स्पिनर सारखा गुगलीच टाकत राहिला, तर कसलेल्या फलंदाजाला त्याचा लगेचच अंदाज येतो, हे राज यांना शिवाजी पार्कसमोर राहात असल्यामुळे का होईना, माहिती असेल, अशी आशा आहे.

राज यांच्या या गुगलीमुळे भांबावलेल्या भाजपची जरी भंबेरी उडाली, तरी ते असले गेम करण्यात आघाडीवर आहेत. आज उमेदवार न देता, निवडणूक न लढवता क्लिपा लावून मनोरंजन करणाऱ्या राज ठाकरेंचे निवडणुकीनंतर काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे “मोदी-शहा नकोत की भाजपच नको?” या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर ना राज ठाकरे देत आहेत, ना त्यांच्या क्लिपोन्मेषाने बेहोष झालेले त्यांचे भाट देत आहेत. मोदींऐवजी जर राजनाथ पंतप्रधान झाले तर राज त्यांना मान्यता देतील का? अगदी मराठी माणूस म्हणून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर राज यांची प्रतिक्रिया काय असेल? आत्तापर्यंत त्यांच्या प्रछन्न टिकेचे धनी असलेल्या अजित पवारांनीही मोकळेपणाने राज यांच्या भाषणाचा फायदा होत असल्याचे कबूल केले आहे. अजित पवारांचे काका तर राज यांचे लाडकेच आहेत. शरद पवार जर या सगळ्यातून पंतप्रधान झाले, तर राज यांची भूमिका काय असेल, याचा विचारही सूज्ञ मतदार निश्चितच करतील.

जाता जाता एक गोष्ट मात्र निश्चित. लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उभा करता फुटेज मात्र सर्वाधिक राज यांनी खाल्ले आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. भाषणांमध्ये मोदी-शहा दुकलीची आणि खासकरून मोदींच्या भंपकपणाची छकले उडवण्यासाठी त्यांच्याच भाषणाच्या क्लिप्स वापरणे, हा निव्वळ मास्टरस्ट्रोक आहे. मात्र हे सगळे करून त्यांनी फॅन क्लब जरी मिळवले असले, तरी मतदार किती कमावले, हे बघण्यासाठी कदाचित विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागेल.

(लेखक माध्यम सल्लागार आहेत)