28 January 2021

News Flash

‘साराभाईं’ची पाकिस्तानी कॉपी

शब्द आणि शब्द, फ्रेम आणि फ्रेम कॉपी

– सुनीता कुलकर्णी
एकेकाळी स्टार प्लसवर लागणारी, आजही अनेकांची आवडती असलेली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही टीव्ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिची कॉपी झाल्यामुळे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’चे लेखक आतिश कापडिया यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून या गोष्टीची माहिती दिली आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ची कुणीतरी कॉपी केली यापेक्षाही ती कॉपी किवा नक्कल अतिशय भ्रष्ट आहे, याचा त्यांना जास्त राग आला आहे.

२००४ मध्ये स्टार प्लसवर आलेल्या आणि सलग दोन वर्षे सुरू असलेल्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेमधलं कुटुंब लोकांना आजही अगदी आपलंच कुटुंब वाटतं. गमत्या इंद्रवदन, सतत आपल्या उच्चवर्गीयपणाचा टेंभा मिरवणारी माया, आई आणि बायको यांच्यामध्ये फूटबॉल झालेला साहिल, उच्चवर्गीय कुटुंबात आपला मध्यमवर्गीयपणा जराही लपवू न शकणारी मोनिशा, आपल्या भयंकर कविता आवडीने सादर करणारा रोसेश, सोनिया ही त्यांची बहीण आणि तिचा नवरा या तसच प्रसंगोपात त्यांच्या घरी येणाऱ्या त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. २०१७ मध्ये ‘साराभाई’चा नवा सीझन आला पण पहिल्या सीझनची मजा काही औरच होती. उच्चवर्गीयांमधला उथळपणा आणि मध्यमवर्गीयांमधला संकुचितपणा यावर बेतलेले विनोद यावर या मालिकेचा मुख्य भर होता. माया आणि मोनिशा या दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या दोन वर्गांचा संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारे विनोद यातून ‘साराभाई’ने प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं. आता या मालिकेचे सगळे सीझन डिस्ने हॉटस्टारवर बघायला मिळतात.

प्रेक्षकांच्या अतिशय आवडत्या मालिकांपैकी एक असलेल्या ‘साराभाई’ची नक्कल करून पाकिस्तानी टीव्हीवर मालिका दाखवली जात असून कुणीतरी तिची लिंक आतिश कापडिया यांना पाठवली. त्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहिताना कापडिया लिहितात की तांत्रिकदृष्ट्या कॉपीराईटचा भंग झालेलाच आहे. त्यांनी अगदी शब्द आणि शब्द, फ्रेम आणि फ्रेम कॉपी केली आहे. त्यात कलाकारांनी त्यांना हवी ती भर घालून आणखी घोळ घातला आहे. एवढं सगळं करून तिथल्या विनामूल्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ही मालिका दाखवली जात आहे.

हा रिमेक इतका बेक्कार आहे की त्या मालिकेचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही. तिला तेवढीही प्रसिद्धी द्यायची तिची लायकी नाही. आतिश यांच्याच इतका राग ‘साराभाई’ कुटुंबाच्या चाहत्यांनाही येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 6:27 pm

Web Title: sarabhai vs sarabhai pakistan aatish kapadia angry on seeing alleged pakistani version of his 90s show sarabhai vs sarabhai calls it daylight robbery nck 90
Next Stories
1 पुन्हा बायोपीकचं पीक
2 एलिझाबेथ राणीचे संकेत
3 घरापेक्षा तुरुंगच छान
Just Now!
X