– चंद्रकांत पांडे, औरंगाबाद

ग्रामीण भागातील स्रीच्या जीवनामध्ये दर्शन घडविणाऱ्या कथा बऱ्याच येऊन गेल्या परंतू आजची धोंडाबाईची कथा ही वास्तविकतेशी निगडीत आहे. कारण मागील बऱ्याच वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, राजकीय व आर्थिक सर्वेक्षण करतो त्यामधून ग्रामीण भागातील ६७% स्त्रियांचे जीवन कशाप्रकारे आहे हे एक धोंडाबाईच्या नावाने सर्वच ग्रामीण भागातील स्त्रिची प्रातिनिधीक वास्तविकता आहे. धोंडाबाईचे लग्न साधारण वयाच्या १५-१६ व्या वर्षी झालेले असते तेव्हापासून ते वयवर्ष २५ पर्यंत तीन ते चार लेकरांचे बाळंतपण त्यांचे संगोपण व त्यासोबत घरी असलेल्या शेतीवर जाऊन शेतीची कामे करणे असा रहाटगाडा चालू असतो.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

वयाच्या २५ वीशीपर्यंत घरातील कारभाराची सुत्रे सासऱ्याकडे होती नंतर जगरहाटीप्रमाणे व ग्रामीण भागातील रिती रिवाजाप्रमाणे घरातील लहान मुलाचे अर्थात धोंडाबाईच्या दिराचे लग्न झाल्यानंतर शेतीची व घराची वाटणी होते. एकत्र कुटुंब पध्दतीत धोंडाबाईच्या सासऱ्यांचा सर्वचं मुलांवर बऱ्यापैकी वचक होता परंतू वाटण्या झाल्यानंतर सर्वच कुटुंबांना स्वातंत्र्य मिळाले. धोंडाबाईचा नवरा घरातील मोठा असल्यामुळे शेतीची कामे करीत नव्हता तर गावगाड्याच्या कारभारीपणाची हौस भागवून घेत होता. ही सवय अंगवळणी पडली होती परंतू आता वाटण्या झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी तटपुंजा वाटून आलेल्या शेतीवर भागणार नव्हती.

गावगाड्याच्या कारभारी पणापासून धोंडाबाईच्या नवऱ्याला लागलेले दारुचे व्यसन आजून वाढले. त्यासोबतच जुगाराचे (पत्यातील तिर्रट हा खेळ) व मटकाही लावण्याची सवय लागली होती. धोंडाबाईचा नवरा पैसा कमविण्याचे शॉर्टकट शोधत होता. गावगाड्याच्या कारभारीपणाची लागलेली हौस ही पुढे वाढत जाऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशा लोकप्रतिनिधींसोबत फिरणे वाढले त्यामुळे आपसुकच घरातील सर्वच जबाबदारी धोंडाबाईवर येऊन पडली. धोंडाबाईचा दिवस भल्यापहाटे चार वाजताच सुरु होत होता. घरातील सकाळची कामे आटोपून लहान मुलांच्या शाळेत जाण्याची तयारी करुन देऊन शेतात जाण्याची तयारी करीत असे. तर दुसरीकडे धोंडाबाईचा नवरा सकाळी उठून आंघोळकरुन पारावर चकाट्या पिटण्यासाठी जात होता. धोंडाबाईची शेतात जाण्याची गडबड त्याचवेळेस महाशय घरी येऊन तालुक्याला जायचे आहे आमदार साहेबांनी बोलावले आहे माझी जाण्याची तयारी कर.. हे महाशय आंघोळ जेवण करुन, कडक इस्त्रीचे कपडे घालून तालुक्याकडे जायला निघायचे तर धोंडाबाई चार-पाच मजुरणी बायांसोबत शेतात जायची.

धोंडाबाई दिवसभर शेतामध्ये काबाड-कष्ट करायची पुन्हा संध्याकाळी घरी येऊन मुलांना अभ्यासाला बसवून विहीरीचे/हापशीचे पाणी आणणे, दुकानातून मोजकेच किराणा सामान आणणे, गिरणीतून दळण आणणे या सर्व कामांसोबत संध्याकाळचे जेवण करणे, मुलांना जेऊ घालून झोपविणे व उद्या शेतातील काम काय करायचे, मजूरदारणीचे पैसे कुठून द्यायचे, पोरांच्या शाळांची/टीवीशनची फी, मास्तरांनी गृहपाठासाठी वह्या आणायला सांगितल्या असा तगादा सर्वच मुलांकडून होता याची पण चिंता करत महीला बचत गटाकडून काही पैसे मिळतात का? यासाठी तिला महीला बचत गटाच्या मिटींगलाही जायचे होते. या सर्व चिंतेत असतांनाच नवरोबांची स्वारी झोकांड्या खातचं घरात प्रवेश करते. इने इच्या चिंतेचे विषय नवऱ्याला सांगून उपयोग नव्हता हे ती समजून होती कारण यापैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याचेकडे नसते. नवऱ्याला जेऊ घालून ती ही नवऱ्यासोबत दोन घास पोटात ढकलते व झोपी जाते कारणं हे रोजचेच चित्र असते.

वयाच्या २५-२६व्या वर्षीच तारुण्य सुलभ भावनांचा कोंडमारा करत मुलांना कुशीत घेऊन झोपी जाते नवरोबाला वाटते चार लेकरं पैदा केलेत म्हणजे माझा संसार संपला आता पुढे बायकोने बघून घ्यायचे कारण रोजच तथाकथित राजकारण्यांसोबत फुकटची दारु ढोसायची बऱ्याचवेळा ढाब्यावरचं जेवण करायचे. दारु ढोसतांना हे तथाकथित राजकारणी यांना दारुच्या नशेतचं लंब्या चवड्या बातांमध्ये मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या करुन आणतात. त्यामुळे हा नवरोबा घरी आल्यानंतरही हवेतच असतो. अशाच प्रकारच्या जीवनशैलीत या नवरोबाला आपल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची हेळसांड, बायकोच्या आर्थिक ओढा-ताणीची किंवा तारुण्य सुलभ भावनांची कधीच कदर नसते सकाळी उठल्यानंतर चहा पिंताना बायको घरातील प्रश्नांचा व आर्थिक विंवचनेचा पाढा नवऱ्यासमोर मांडते. त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तरदायित्व न घेता तो बायकोच्या थोबाडीत दोन-चार ठेवून देतो. तु तुझे बघून घे मला तालुक्याला जायचे आहे माझ्या जेवणाची तयारी कर.. असे म्हणून तो पुन्हा पारावर बीडी फुंकत चकाट्या मारायला निघून जातो. धोंडाबाईसमोर रात्रीचे डोक्यात सर्वच रडगाणे गाण्यापेक्षा आता आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल म्हणून ती पदर खोसून परत कामाला लागते.

तात्पर्य :- ही धोंडाबाईची थोडक्यात कथा ग्रामीण भागातील वास्तविकतेचे दर्शन घडविते. अशा धोंडाबाई प्रत्येक घरात आहेत, त्याच मग शेती बरोबर मुलांना शिकविणे, शेतीच्या उत्पन्नावर भागत नसल्यामुळे महीला बचत गटाच्या माध्यमातून वाळवणाचे पदार्थ तयार करणे, गावातील श्रीमंतांच्या घरी घरकाम करणे, स्वतःच्या शेतातील कामे संपल्यानंतर दुसऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी जाणे, मनरेगाच्या कामावर जाणे अशाप्रकारचे आर्थिक स्त्रोत उभे करत करत मुलां-मुलींसोबत स्वतःलाही सांभाळणे या रहाट गाड्यात बदल म्हणून गावातील मंदिरात किर्तन, प्रवचन, भागवत कथेला हजर राहणे अशाही गोष्टी ती करतच असते अशा सर्व परिस्थितीला तोंड देत ती संसाराचा रहाटगाडा चालवित आपल्या मुलांना मोठे करते.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महीलांना ५०% आरक्षणाची संधी दिली परंतू त्यांच्याकडे कारभाराचे मॅनेजमेंट दिले नाही कारण अशा कारभाराचे कारभारपण अशा बायांचे नवरेच करतांना दिसतात ही वस्तुस्थिती पाहायला मिळते. घराच्या कारभारातून नवरोबा जसे हद्दपार झालेत तसेच या स्थानिक स्वराज्याच्या कारभारातूनही त्यांना हद्दपार करावे. मुंबईच्या  डबेवाल्यांची सक्सेस स्टोरी, आय.आय.एम., च्या अभ्यासक्रमासाठी रोल मॉडेल आहे तर मग आमच्या ग्रामीण भागातील धोंडाबाईचे आर्थिक मॅनेजमेंट सोबत सामाजिक, सांसारिक, स्वतः च्या तारुण्य सुलभ भावनांचे मॅनेजमेंट करणाऱ्या असंख्य धोंडाबाई आजही ग्रामीण भागात आपले आयुष्य खेचत आहेत या सर्व महिलांचे मॅनेजमेंट आपल्यासाठी रोल मॉडेल का ठरू नये …!