News Flash

BLOG : ‘विराट’ शाप की वरदान?

केलेल्या चुका मान्य करण्याचे संस्कार त्याच्यावर झालेच नाहीत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली

आमीर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा फसलेला प्रयोग नुकताच आपण पाहिला आहे. हा चित्रपट ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या गाजलेल्या चित्रपट मालिकेवरुन उचलला होता. या मालिकेतील ‘जॅक स्पॅरो’ ही व्यक्तीरेखा चित्रपट इतिहासातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखली जाते. २४ तास नशेत वावरणारा, चित्रविचित्र पोशाख परिधान करणारा, अवास्तव बडबड करणारा जॅक वरकरणी अगदी बावळट वाटतो. परंतु अनेक बुद्धीजीवी प्राणी त्याच्या याच बावळटपणाला बळी पडतात. कारण त्याचे हे विक्षिप्त रुप केवळ जगाला दाखवण्यापुरते आहे. वास्तवात आतून तो तितकाच चलाख व धुर्त आहे. मिश्कील हास्य घेऊन मिरवणाऱ्या जॅकच्या गळ्यावर शत्रुची तलवार असली तरीही चिंतेची किंवा भयाची एक रेषही त्याच्या चेहऱ्यावर उमटत नाही. त्यामुळेच बहुदा चाहते त्याच्या बावळटपणावरही फिदा आहेत. असो… परंतु ‘जॅक स्पॅरो’ आठवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सध्या सुरु असलेले ‘आक्रमक विराट कोहली’ हे प्रकरण होय.

‘विराट कोहली’ व ‘जॅक स्पॅरो’ या दोघांमध्ये दोन समान गुण आहेत. एक- दोघेही ‘कॅप्टन’ आहेत आणि दोन- दोघेही आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. विराट हा भारतीय क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात आक्रमक खेळाडू म्हणुन ओळखला जातो. त्याच्या शिवराळ वृत्तीचे विराटभक्तांना कौतुक असेल मात्र नसीरुद्दीन शाह सारख्या अनेक वैचारिक मंडळींना त्यात उद्धटपणा जाणवतो. विराटचा हा उद्धटपणा दिवसेंदिवस आधिकच वाढत चालला आहे. परंतु यश पायाजवळ लोळण घेत असताना खरच इतके आक्रमक होण्याची गरज भासते का?

आक्रमकता म्हणजे नक्की काय? तर.. आक्रमकतेची अशी काही ठरलेली कोणतीही व्याख्या नाही. परंतु मैदानावर सतत शिव्या घालून पालकांनी केलेल्या संस्कारांचे जाहीर प्रदर्शन करणे म्हणजे आक्रमता नक्कीच नाही, आणि तसे असेल तर मात्र ‘सचिन तेंडुलकर’, ‘रॉजर फेडरर’, ‘ल्युका मॉड्रिच’, ‘मायकल फेल्प्स’ यांसारख्या कित्येक यशस्वी खेळाडूंना मवाळच म्हणावे लागेल.

‘कर्णधार विराट कोहली’ची तुलना ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’शी केली याचे कारणच काहीसे असे आहे की, जॅक हे कोहलीपेक्षा जास्त आक्रमक व्यक्तिमत्त्व आहे. परंतु स्वत:ची आक्रमकता सिद्ध करण्यासाठी त्याला शिव्याशापांचे प्रमाणपत्र दाखवण्याची गरज भासत नाही. ही आक्रमकता त्याच्या डोळ्यात दिसते व त्याच्या काम करण्याच्या शैलीतून त्याची जाणीव होते. Why Fight When You Can Negotiate या मंत्राचा जप करणारा जॅक तलवार न उचलता देखिल मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतो. प्रतिकूल परिस्थितीत तो डगमगत नाही. आणि अनुकूल परिस्थितीत हुरळून जात नाही. त्यामुळेच बहुदा संपूर्ण जग त्याला ‘द ग्रेट कॅप्टन जॅक स्पॅरो’ या नावाने ओळखते. जॅक ही ‘टेड इलियट’ व ‘टेरी रॉसीओ’ या दोन लेखकांनी तयार केलेली काल्पनीक व्यक्तिरेखा असली तरी प्रत्येक सांघिक खेळात संघाला अशाच कर्णधाराची गरज भासते आणि भारतीय क्रिकेट संघही त्यास अपवाद नाही.

‘विराट कोहली’ हा सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. परंतु नेतृत्त्वगुण त्याच्यात नक्कीच नाहीत. कारण अनुकूल वातावरणात तो अगदी हुरळून जातो तर प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या मेंदूवरचा व तोंडावरचाच नव्हे तर पार शरीरावरचा ताबाही सोडताना आपण पाहिले आहे. परिणामी संघाला त्याची मोठी किंमत मोजावी लागते आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि आता ऑस्ट्रेलियात पर्थमध्ये झालेला पराभव होय. विराटची एकामागून एक झळकणारी शतकेही हा पराभव थोपवू शकली नाहीत. विराटचा उग्रपणा त्याच्या स्वत:साठी यशदायी असला तरी संघाला मात्र मारक ठरतो आहे. आज भारतीय संघ पूर्णपणे विराटकेंद्री झाला आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी हे भारतीय संघाचे सर्वात मजबूत अंग मानले जाते. परंतु वस्तुत: हे अंग आतून अगदी पोकळ झाले आहे. विराट स्वस्तात बाद झाला की भारतीय संघाचा पराजय जवळपास निश्चित होतो. विराटच्या कर्णधार पदाखाली भारताने आजवर जेवढे सामने जिंकले त्यातील जवळपास सर्वच सामने त्याने घरच्याच मैदानावर आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकवले आहेत. जेव्हा कधी विशेषत: ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका २०१४, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८, दक्षिण अफ्रीका कसोटी मालिका २०१८, इंग्लंड एकदिवसीय व कसोटी मालिका २०१८ आणि आता ऑस्ट्रेलियात त्याच्या कर्णधारपदाचा कस लागला तेव्हा संघाच्या पदरी निराशाच आली आहे.

विराटला संघ निवडीतले काहीच कळत नाही. कुठला गोलंदाज कुठल्या खेळपट्टीवर खेळवावा या बाबतीत आजवर त्याने नुसता गोंधळच घातला आहे आणि मजेशीर बाब म्हणजे याला आयपीएल स्पर्धाही अपवाद नाही. खेळपट्टी व वातावरणाचा अंदाज त्यास बांधता येत नाहीच पण क्षेत्ररक्षणाच्या नियोजनाबाबतीतही त्याचे असलेले ज्ञान दिवसेंदिवस उघडे पडते आहे. शिवाय केलेल्या चुका मान्य करण्याचे संस्कारही त्याकडे नाहीत. या पार्श्वभूमीवर विचार करता गर्विष्ठ विराटने पुन्हा एकदा आपल्या कर्णधारपदाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा वेळ प्रत्येकाची येते, कधी काळी ती क्रिकेट खेळातील पहिले शतक झळकावणाऱ्या ‘जॉन स्मॉल’ची आली, पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या ‘चार्ल्स बॅनरमन’ची आली, सर्वाधिक सरासरी असलेल्या ‘सर डॉन ब्रॅडमन’ची आली, सर्वात आधी ब्रॅडमनचे विक्रम मोडणाऱ्या ‘सुनिल गावसकर’ची आली, सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या ‘सचिन तेंडुलकर’ची आली. आणि आता लवकरच ‘विराट कोहली’ची देखील येणार यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 11:12 pm

Web Title: virat kohli indias worst cricket team captain
Next Stories
1 विराट कोहलीची खिल्ली उडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला नेटीझन्सनी केलं ट्रोल
2 IND vs AUS : विराट सौरव गांगुलीचा वारसा पुढे चालवतोय !
3 टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केला बाळाचा पहिला फोटो
Just Now!
X