लिव इन रिलेशनशिप आणि प्रेम प्रकरणाने गेल्या काही दिवसात तीन जणांचा जीव घेतला आहे. आत्महत्या, खून, खुनी हल्ला या घटना प्रेम प्रकरण आणि लिव इन रिलेशनशिप मधून घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून आपल्या मुलांवर पालकांचे लक्ष नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक तर पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर मानले जाते. यासाठीच तरुण तरुणी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात दाखल होतात. घरच्यांचा मुलांकडून मोठ्या अपेक्षा असतात खेड्यातून आल्याने शहरात मोकळा श्वास मुलांना घ्यायला मिळतो हवं तसं जगता येत. शहरातील वातावरण पाहून तरुण तरुणी हे प्रेम प्रकरण तसेच लिव इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास तयार होतात कालांतराने याचेच रूपांतर मोठ्या घटनेत होत आहे. अशा घटनांमधून गेल्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरात तिघांनी जीव गमावला आहे.

यात एका विद्यार्थिनीचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे. तर दहावी पर्यंत सोबत शिक्षण घेणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. हडपसर येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी ईश्वरी पवार ही पिंपळे गुरव येथे योगेश सोनवणे या तरुणा सोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. ते गेल्या काही वर्षांपासून सोबत होते. ईश्वरीने योगेशला लग्नाचा तगादा लावला होता,परंतु योगेशने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याच दरम्यान योगेशचे लग्न ठरल्याचे ईश्वरीला समजले तिने याच रागातून इमारतीच्या टेरेसवर जाऊन थेट उडी मारत आत्महत्या केली.

योगेश हा आयटी कंपनीत कामाला आहे. मयत ईश्वरी ही मूळ मराठवाड्यातील असून शिक्षण घेण्यासाठी ती शहरात आली होती. आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने तिला शहरात पाठवले होते. महाविद्यालयीन अभ्यास करणारी ईश्वरी प्रेमाचा आणि लिव इन रिलेशनशिपचा पण अभ्यास करत होती. याची जाणीव आई वडिलांना नसावी. वेळीच आई वडिलानी तिच्याकडे लक्ष दिले असते तर ईश्वरी या जगात असती.
शालेय जीवनातील प्रेयसी असलेली अदीती बिडवे ही गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडमधील चुलत्यांकडे राहात होती.

बहुदा अदिती ही प्रियकर नजीमुद्दीन शाहा याच्या संपर्कात असावी त्यामुळेच तो लातूरहून नोकरीच्या शोधात पुण्याला जात असल्याचे आई वडिलांना सांगून भेटायला आला होता. नजीमुद्दीन आणि अदिती हे औंध उरो रुग्णालय येथील निवस्थानी कोणी नसताना भेटले त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच प्रियकर नजीमुद्दीन याने प्रेयसी अदिती बिडवे हिचा खून करून स्वतःआत्महत्या करत प्रेमाचा अंत केला.नजीमुद्दीन आणि अदिती यांनी दहावी पर्यंत शिक्षण हे सोबतच घेतलं होतं.

त्यानंतर ते विभक्त झाले.त्यांचं प्रेमप्रकरण घरच्यांना माहीत असावं अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.तर पिंपळे सौदागर येथे एका तरुणीवर लिव इन रिलेशनशिप मधून चाकू हल्ला झाला होता.आरोपी हा विवाहित असून त्याला पत्नी आणि मूल होती. मुलगा दुसऱ्या मुलीसोबत राहात असल्याची माहिती आई वडिलांना होती.त्यांनी वेळीच मुलाला समजवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे होते.

या तिन्ही घटना पालकांच्या न कळत घडल्या असून दुर्दैवी आहेत. पालकांनी बाहेरगावी किंवा शहरात शिक्षण किंवा रोजगार घेण्यासाठी गेलेल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून अश्या घटना घडणार नाहीत. त्यामुळे पालकांनो सावध रहा म्हणण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा किंवा मुलगी काय करत आहे याकडे कटाक्षाने नजर ठेवा.