खरंतर भारतामध्ये वयाची ६० वर्ष उलटून गेली की माणसं निवृत्तीसाठी बघितलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणू पाहतात. मग कोण चारधार यात्रा करतं, कोणी केसरी टूर्सबरोबर युरोप सहलीला जातात, कोणी आपल्या फार्म हाऊसवर आयुष्य घालवायचं ठरवतात. हे सगळं करताना संसारातला आपला सहभाग कमी करायचा आणि परतीचा प्रवास सुरू करायचा असा एक दृष्टीकोन असतो. पण आज आपण ज्या आजी-आजोबांबद्दल बोलणार आहोत ते साठी काय सत्तरी उलटली तरी तरुणांच्या बरोबरीने धम्माल-मस्ती करणारे, बारमध्ये जाऊन नाचणारे, प्रेमात पडणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहणारे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यामध्ये हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस याने “द कॉमिन्स्की मेथड” या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सीझन येत असल्याचं जाहीर केलं. याच महिन्याच्या शेवटी हा सीझन येणार असून त्याबद्दल उत्सुकता नक्कीच आहे कारण पहिले दोन्ही सीझन हिट ठरले होते. डग्लस (सँडी कॉमिन्स्की) आणि अ‍ॅलन आर्किन (नॉर्मन) हे वयाची ७० वर्ष पार केलेले दोन मित्र. डग्लस हा अभिनेता असतो आणि आता उतारवयात तो अभिनयाचे धडे देतो. त्याची तीन लग्नं आणि घटस्फोट झाले आहेत व तो आपल्या मुलीबरोबर राहतो. अ‍ॅलन हा वकील आहे आणि पहिल्याच भागामध्ये त्याची बायको कॅन्सरने मरते. त्यामुळे या दोन मित्रांची भावनिक जवळीक अधिक होते. पण हे एवढं सरळ नाही. डग्लस हा मुक्तपणे वावरणारा, तरुणांप्रमाणेच डेटला जाणारा, इगो असलेला आणि आपल्याला झालेला आजार मान्य न करणारा बिनधास्त व्यक्तिमत्व असतं. दुसरीकडे अ‍ॅलन मात्र अजूनही त्याच्या बायकोच्या प्रेमात अडकलेला, मुलीच्या व्यसनाधीनतेमुळे थोडा चिंतेत असलेला आणि बायकोची कमी भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीत मन गुंतवण्याचा प्रयत्न करणारा एक मध्यममार्गी मनुष्य असतो. पण हे दोघेही जेव्हा एकत्र येतात तेव्हा लहान मुलांप्रमाणे भांडतात, एकमेकांच्या इगोला धक्के देतात आणि सॉरी म्हणून पुन्हा गळ्यात गळे घालतात. या मालिकेतले काही प्रसंग तर अप्रतिम रंगीले आहेत. अ‍ॅलनची बायको मरते तेव्हा तिची शोकसभा ही रडारड, कंटाळवणी होऊ नये म्हणून ती आधीच आपल्या इच्छा लिहून ठेवते. त्यामध्ये कार्यक्रम हा अमेरिकेतला प्रसिद्ध निवदेक-मुलाखतकार जे लेनोकडून करवून घ्यायचा, बार्बरा स्ट्रेसँडचं गाणं आणि लेडी मार्मालेड हे प्रसिद्ध गाणं म्हणायचं, अशा इच्छा व्यक्त केलेल्या असतात. गंमत म्हणजे डग्लस या शोकसभेला आपल्या गर्लफ्रेंडला डेटला बोलवतो. आणि हा सांस्कृतिक सोहळा पाहून तीही खूष होते. आणखी एका भागामध्ये डग्लसची मुलगी आपण लग्नं करणार असल्याचं जाहीर करते. पण आपल्या बापाच्या वयाच्या माणसाशी. ते एकून बाप अर्थातच चिडतो. पण त्या माणसाला भेटल्यावर तो समवयस्क असल्याने ते दोघेही गप्पांमध्ये एवढे हरवून जातात की त्या मुलीला विसरतात. रोजच्या आयुष्यातल्या अशा अनेक धम्माल कथा यामध्ये येत राहतात, थोड्या आनंदी, थोड्या दुःखी.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by shriti ganpatye on the kominsky method the lady in the van review kpw
First published on: 08-05-2021 at 14:29 IST