भारत-पाक लढत; गेले ते दिन गेले!

भारत पाकिस्तानमधले सामने रंगतात केवळ सोशल मीडियाच्या मैदानात

– केके कौस्तुभ

ना सचिननं शोएबला खेचलेला षटकार, ना जावेदच्या माकडउड्या, ना वेंकटेश प्रसादचं आमिर सोहेलला दिलेलं सडेतोड उत्तर… विश्वचषकातली भारत-पाक सामन्याची रंगत गेल्या काही वर्षात पार संपून गेलीय. भारत-पाक क्रिकेट सामन्यांचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना वेगळं सांगण्याची गरज नाही. एकवेळ वर्ल्ड कप नाही मिळाला तरी चालेल पण हा सामना जिंकायलाच हवा असं दडपण दोन्ही देशांच्या क्रीडारसिकांचं खेळाडूंवर असायचं. या लढती खरोखर लढती असायच्या नी त्यांत दिसणारी खुन्नस, जोश, त्वेष आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची ईर्षा केवळ जर्मनी आणि इंग्लंड मधल्या फुटबॉल सामन्यातच बघायला मिळत असेल. जर कुस्तीच्या सामन्यात एखादा मल्ल दुसऱ्याला धोपट धोपट धोपटतोय नी समोरचा काहीच प्रतिकार करता येत नसल्यानं खा खा मार खातोय असं झालं तर ही लढत बघायला खऱ्या क्रीडाप्रेमींना मजा येईल का? असंच झालंय भारत पाक सामन्यांचं… क्रिकेटच्या सगळ्या अंगांचा विचार केला तर पाकिस्तानपेक्षा बाप असलेला भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला एकतर्फी हरवतोय नी क्रिकेटच्या लढतीच्या खऱ्या मजेला क्रीडारसित मुकतायत हेच खरं.

गेल्या १५ वर्षांत पाक संघाची झालेली वाताहत, स्टार खेळाडूंचा अभाव आणि जागतिक दर्जाचे गोलंदाज तयार करण्यातली कसूर – अशा विविध कारणांमुळे पाकिस्तानी संघ पारच नेस्तनाबूत झालाय. आजमितीस, मोहम्मद आमिर वगळता पाककडे जागतिक दर्जाचा एकही खेळाडू नाही. आणि अशा दुय्यम संघाने मजबूत अशा भारतीय संघाला टक्कर द्यावी, ही अपेक्षाच गैर आहे.

आजतागायत भारताने पाकिस्तानला विश्वचषकात ७ वेळा हरवलंय. परंतु याआधी हरवलं नी आता हरवतंय यात महत्त्वाचा फरक आहे. त्यापैकी ११९२ ते २००३ दरम्यानच्या चारही लढती जोशपूर्ण झाल्या. या काळात भारताकडून कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अजय जडेजा, नवज्योत सिद्धू, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि युवराज सिंग अशा अनेक रथी-महारथींनी मैदान गाजवलं. आणि अशीच भरभक्कम बाजू पाककडेसुद्धा होती – इम्रान खान, जावेद मियांदाद, इंझमाम उल हक, आमिर सोहेल, सलीम मलिक, रमीझ राजा, सईद अन्वर, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद, शाहीद आफ्रिदी, मोहम्मद युनूस, मोईन खान आणि इतर अनेक प्रतिभावान खेळाडू पाककडे होते.

नावांची ही लांबलचक यादी पाहिली तर जाणवेल, १९९२ ते २००३ दरम्यान दोन्ही संघात प्रचंड आक्रमक, जागतिक दर्जाचे आणि सामना एकहाती जिंकून देऊ शकणारे अनेक खेळाडू होते. आणि त्याचंच प्रतिबिंब खेळातही दिसायचं. जरी सर्व सामन्यांत पाकचा पराभव झाला असला तरीही प्रत्येक सामना त्वेषपूर्ण झाला, प्रत्येक सामन्याची स्वत:ची अशी ओळख निर्माण झाली आणि शिवाय तयार झाल्या अनेक आठवणी. आजही भारत-पाक विश्वचषक सामना म्हटलं की आठवतं किरण मोरे आणि जावेद मियांदादचं सिडनीतलं भांडण, अजय जडेजाने वकारला बंगळुरात मारलेले षटकार, व्यंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा काढलेला त्रिफळा आणि त्याचीच १९९९ मधली एखाद्या स्पिनरलाही लाजवेल अशी अति-हळू गोलंदाजी किंवा सचिन-सेहवागने वकार-शोएबला सेंच्युरियन मैदानावर मारलेले “अपर-कट”चे षटकार… प्रत्येकवेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकला हरवल्याचं समाधान तुल्यबळ व आक्रमक पाकला हरवल्यानं द्विगुणीत होत असे. परंतु या आणि अशा अनेक आठवणी २००३ नंतर संपुष्टात आल्या कारण एका फटक्यात पाकचे ७ स्टार खेळाडू निवृत्त झाले. भारतीय संघात ताज्या दमाचे खेळाडू येत गेले आधीच्या दिग्गजांचे विक्रम मोडणारे नवे खेळाडू भारतानं घडवले. परंतु पाकिस्तानच्या क्रिकेटची मात्र शोकांतिकाच झाली.

त्यात भर पडली 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची. सहा खेळाडू जखमी झालेला श्रीलंकेचा संघ दौरा सोडून परत गेला आणि तेव्हापासून पाकिस्तानमधल्या क्रिकेटला ग्रहण लागलं. याच सुरक्षेच्या कारणांमुळे 2011 मधले विश्वचषकाचे पाकिस्तानमधले सामने रद्द करण्यात आले आणि ते भारत, बांग्लादेश व श्रीलंकेत विभागण्यात आले. तेव्हापासून अफगाणिस्तान व केनयासारख्या क्षुल्लक संघांचा अपवाद वगळता फारसे सामने पाकिस्तानात झाले नाहीत आणि पाकिस्तानी संघाचं होमग्राउंड संयुक्त अरब अमिराती वगैरे असतं. आपल्याच घरात अनाथ झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटचं पर्यवसान अत्यंत दुबळ्या, संघशिस्तीचा अभाव असलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या व बडा घर पोकळ वासा असं झालं. परिणामी क्रीडारसिकांना भारत – पाक सामना म्हटलं की कितीही खुमखुमी येऊ दे पाकिस्तानच्या आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, परिणामी भारत-पाक सामने एकतर्फी आणि रटाळ होऊ लागले.

मोहालीतील २०११च्या सामन्यात पाकने थोडीफार रंगत आणली पण २०१५ (अॅडलेड) आणि कालचा मँचेस्टरचा सामना भारताने किरकोळीत जिंकला. पाकिस्ताननं दोन वर्षांपूर्वी फखर झमनच्या शतकाच्या बळावर भारताला चांगल्या फरकानं हरवलं हा एक अपवाद. पाक खेळाडूंकडे काही गुण निसर्गत:च दिसायचे. ते म्हणजे जिद्द, आक्रमकता, ईर्षा, ऊर्जा आणि खुनशी प्रवृत्ती. २००३ नंतर त्यांच्यातले हे गुण दिसेनासे झाले आहेत. कालच्या सामन्यात तर पाकचा कर्णधार थेट जांभई देताना दिसला. त्यावरूनच त्या संघाची एकूण मानसिकता दिसून आली.

त्याउलट रोहित, राहूल, विराट, धोनी, बुमराह, पंड्या, चहल, शंकर आणि कुलदीप यादव आदींनी व्यावसायिक पद्धतीने खेळून भारताला सहज विजय मिळवून दिला. भारतीय संघाची एकूण प्रगती आणि गुणवान युवा खेळाडूंचा भरणा बघता पुढील विश्वचषकातही भारत पाकपेक्षा सरसच राहणार (अर्थात सामना झाला तर) असं दिसतंय. त्यामुळेच भारत-पाक सामन्यांबद्दलची उत्सुकता आता केवळ टीव्ही, ब्रँड्स, सोशल मिडिया (ट्विटरवरील हमरी-तुमरी) आणि उपहारगृहांपुरतीच मर्यादित राहिल्याचं चित्र आहे. मैदानावर होतोय तो फक्त आधीच निकालाची कल्पना असलेला एक सर्वसामान्य रटाळ सामना!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog india pakistan world cup match

Next Story
BLOG – डीव्हिलियर्सने देशापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले का ?
ताज्या बातम्या