– सॅबी परेरा

काल नितीन गडकरी साहेब म्हणाले की, वाहनांचे सध्याचे कर्कश हॉर्न बंद करून भारतीय पारंपरिक वाद्यांचे आवाज असलेले हॉर्न बसवणार. गडकरी साहेब, तुमचा वरील निर्णय आम्हाला आवडलेला आहे. तुम्ही जनतेचं ऐकून घेणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी आहात म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. ज्या ज्या विभागातील गाडी आहे त्या विभागाचं किंवा तेथील लोकप्रिय नेत्याचं वैशिष्ट्य असेल असे हॉर्न गाडीला लावले तर आणखी मज्जा येईल. उदाहरणार्थ …

१) दिल्लीच्या गाड्यांना खोकल्याच्या आवाजाचा हॉर्न

२) पश्चिम बंगालच्या गाड्यांना ‘खेला होबे” असं बोलणारा हॉर्न

३) भांडुपच्या गाड्यांना रोखठोक आवाजाचा हॉर्न

४) सिंधुदुर्गातील गाड्यांना चिरक्या आवाजाचा हॉर्न

५) गुजरातेतील गाडयांना मोठ्या आवाजाचा आणि लांब फेक असलेला बॅटरी संपली तरी वाजणारा हॉर्न

६) नागपुरातील गाड्यांना “मी पुन्हा येईन” असं बोलणारा हॉर्न

७) जामनेरच्या गाड्यांना पिस्तुलाची फायरिंग केल्यासारखा हॉर्न

८) गोंदिया-भंडाराच्या गाड्यांना दहाची स्पीडलीमीट आणि हॉर्नचा आवाज ना-ना-लिमिट

९) बारामतीच्या गाड्यांना ती गाडी येऊन आपल्या बुडाला टेकली तरी कळणार नाही असा हॉर्न आणि त्यासोबतच उजवीकडे वळायचे असेल तर डावीकडचा सिग्नल पेटेल अशी व्यवस्था

१०) भोकरदनच्या गाड्यांना ‘हट बे साले’ असं बोलणारा हॉर्न

११) नरिमन पॉईंटच्या गाड्यांना “अध्यक्ष महोदय” असं बोलणारा हॉर्न

१२) मलबार हिलच्या गाड्यांना “चाय ला चला” असं बोलणारा हॉर्न

१३) वसईच्या गाड्यांना शिट्टी

१४) शिवाजी पार्कच्या गाड्यांना सतत आवाजाची दिशा बदलणारा हॉर्न

१५) वांद्र्याच्या गाड्यांना मुळमुळीत आवाजाचा हॉर्न, किंबहुना हॉर्न नकोच!