सुनिता कुलकर्णी

आपल्याकडचा गणपती जसा त्या त्या वर्षीचे सामाजिक, राजकीय रंग घेऊन अवतरतो तसंच दुर्गापूजेच्या बाबतीतही आहे. पश्चिम बंगालमध्ये, ओरिसामध्ये यंदाची दुर्गा करोनामुळे उद्भवलेल्या बायो मेडिकल वेस्ट या प्रश्नाच्या रुपात अवतरली आहे.

धुबरी इथं डिझास्टर मॅनेजमेंट विभागात काम करणाऱ्या बसाक यांना कोविड १९ च्या महासाथीमधील ड्युटीचा भाग म्हणून औषध दुकानांना भेट द्यावी लागत होती. तिथे त्यांनी बघितलं की दुकानदार मुदतबाह्य औषधं फेकून देतात. त्यातून त्यांना वाया जाणारी औषधं, वैद्यकीय उपकरणं यांचा वापर करून दुर्गेची मूर्ती घडवायची कल्पना सुचली. मुदत संपलेल्या गोळ्या, स्ट्रिप्स, ३० हजार कॅप्सुल्स, सिरींज या सगळ्याचा वापर करत त्यांनी तब्बल ६० दिवस रोज रात्रभर जागून काम केलं आणि यंदाची आगळीवेगळी दुर्गादेवता साकारली.

अर्थात सध्याच्या करोनाग्रस्त परिस्थितीचा संदर्भ देत दुर्गेची मूर्ती किंवा आरास घडवणारे ते एकमेव कलाकार नाहीत. या दोन्ही राज्यांमधल्या अनेक कलाकारांनी आपण उत्सव साजरा करत असताना सामाजिक भान जपत असल्याची ग्वाही आपल्या कलेच्या माध्यमातून दिली आहे.

बसाक गेली आठ वर्षे अनेक टाकाऊ गोष्टींमधून दुर्गेची हटके मूर्ती तयार करतात. एका वर्षी त्यांनी आगकाड्यांचा वापर करून १२ फुटी मूर्ती तयार केली होती. तर गेल्याच वर्षी १६६ किलो वायरींचा वापर करून त्यांनी तयार केलेल्या दुर्गा मूर्तीमुळे त्यांचं नाव आसाम बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्याच आलं होतं. त्यामुळे यंदाही ते करोना महासाथीची आणि उत्सवाची सांगड घालणार हे अपेक्षितच होतं.

मला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काहीतरी वेगळं करायचं होतं. मग माझ्या लक्षात आलं की एकीकडे लोक औषधांसाठी दुकानांसमोर रांगा लावून उभे असत आणि दुसरीकडे अनेक दुकानांमध्ये औषधांचा साठा नाही अशी परिस्थिती होती. मुदत संपलेली औषधं एरवी दुकानदार कंपन्यांकडे परत पाठवतात. पण सध्याच्या महासाथीच्या काळात ते शक्य नसल्यामुळे त्यांनी अशी औषधं फेकून दिलेली मी बघितली. ती अशी तरी वाया का जाऊन द्यायची हा विचार मला सतत अस्वस्थ करायला लागला. त्यातून मी बायो मेडिकल वेस्टमधून दुर्गा साकारायची ठरवलं, ते सांगतात.

३७ वर्षीय बसाक काही व्यावसायिक मूर्तीकार नाहीत. पण गेली आठ वर्षे ते प्रयोगशील मूर्ती घडवत आहेत आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या अवंतिका चोप्रा यांनी हे वृत्त दिले आहे.