शेखर जोशी
दिवंगत साहित्यिक दि. बा. मोकाशी यांची ‘आता आमोद सुनासि आले’ ही हृदयस्पर्शी कथा ३५ वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवरील ‘कथास्तु’ या मालिकेतून प्रसारित झाली होती. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्र भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि सध्या समाज माध्यमातून चर्चेत असलेल्या ‘दिठी’ या आशयघन चित्रपटाच्या निमित्ताने ‘आता आमोद सुनासि आले’च्या इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे.

मुंबई दूरदर्शनवर तेव्हा तेरा भागांच्या मालिका प्रसारित होत असत. फार फार तर मालिकेला आणखी तेरा भागांची मुदतवाढ मिळत असे. मराठीतील उत्तमोत्तम साहित्य या मालिकांच्या माध्यमातून तेव्हा छोट्या पडद्यावर साकार झाले होते.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांची निर्मिती असलेली ‘कथास्तु’ ही मालिका १९८६-८७ मध्ये मुंबई दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. यात मोकाशी यांची ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा सादर झाली होती. याचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले होते. आणि यात ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांनी ‘रामजी’ची भूमिका साकारली होती. मालिकेत गौरी केंद्रे, सुहास भालेकर हे कलाकार होते. ही संपूर्ण कथा अवघ्या अर्ध्या तासाच्या भागात सादर झाली होती.

आता एका दिवसात एखाद्या मालिकेचे तीन तीन भाग चित्रीत केले जातात. पण ‘कथास्तु’ मालिकेतील ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचे चित्रिकरण नाशिक येथे सलग तीन दिवस चालले होते. दिग्दर्शक राजदत्त यांनी ही कथा म्हटले तर कमी वेळात तेवढ्याच समर्थपणे सादर केली होती. गाभण असलेली खरीखुरी गाय चित्रिकरणासाठी आणण्यात आली होती. चित्रिकरण करताना गायीला हात लावल्यावर गायीने लाथेचा दिलेला प्रसाद, वासराचा जन्म झाल्यावर तो नुकताच जन्मलेला जीव छातीशी घेऊन कवटाळलेला तो क्षण (गाभण गायीच्या प्रसुतीचे चित्रिकरण करता येणार नसल्याने नुकतेच जन्मलेले एक वासरू चित्रिकरणासाठी आणण्यात आले होते) आजही जपून ठेवला असल्याची आठवण सुखटणकर यांनी सांगितली.

त्या काळात आत्ता प्रमाणे दूरचित्रवाहिन्या, समाजमाध्यमे आणि मुद्रित माध्यमेही मोठ्या प्रमाणात नव्हती. त्यामुळे कदाचित याचा तेवढा बोलबाला तेव्हा झाला नाही. पण तेव्हा पत्रकार जयंत पवार यांनी एका साप्ताहिकात (नाव आठवत नाही) त्याविषयी लिहिले होते. दुर्दैवाने तो लेख आज माझ्याकडे नाही. पण लेखातील एक फोटो मात्र आहे, असेही सुखटणकर म्हणाले.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘दिठी’ चित्रपट पाहिला. किशोर कदम, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंड्ये सर्वांचेच काम छान झाले आहे. चित्रपटही उत्तम झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता वयाच्या ९२ व्या वर्षांत याच आठवणी मन ताजेतवाने ठेवतात, जगण्याची नवी उमेद देतात, असेही सुखटणकर यांनी सांगितले.