क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे ही म्हण आपण आतापर्यंत अनेकदा ऐकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ खेळभावना जपण्यासाठी ओळखला जातो तर आयपीएलमध्ये हे काम सनराईजर्स हैदराबादचा संघ करतो असं माझं ठाम मत आहे. अपार मेहनत आणि कष्ट, अखेरच्या षटकापर्यंत झुंज देत रहाणं, खेळताना अवास्तव आक्रस्ताळेपणा न करता आपला आब राखून खेळणं यामुळे सनराईजर्स हैदराबाद संघाने सर्वांच्या मनात खरं तयार केलं आहे. आयपीएलचा तेरावा हंगामही डेव्हिड वॉर्नरचा संघ अशाच झुंजार वृत्तीने खेळला. दिल्लीविरुद्ध करो या मरो च्या सामन्यातही झुंज देत राहत त्यांनी पराभव स्विकारला. क्रिकेटच्या मैदानावर दोन संघांमधलं पारंपरिक युद्ध हे नेहमी गाजतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या लढती नेहमी गाजतात. तसंच आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई, चेन्नई विरुद्ध बंगळुरु, मुंबई विरुद्ध बंगळुरु, मुंबई विरुद्ध दिल्ली या संघातले सामनेही मैदानावर आणि मैदानाबाहेर गाजतात. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून पराभव स्विकारावा लागला की मुंबईच्या चाहत्यांना तो जिव्हारी लागतो. चेन्नईवर मात केली की मुंबईचे चाहते चेकाळतात. गेलाबाजार दिल्लीच्या संघाकडून झालेला पराभवही आपल्याला झोंबतो.पण हैदराबादच्या संघाची लढाऊ वृत्ती पाहिल्यानंतर पारंपरिक मुंबई आणि चेन्नईच्या चाहत्यांना त्यांच्या विजया दुःख न होता आनंद होतो. एका स्पर्धेत खेळभावना जपून ठेवण्याचं मोठं काम हैदराबादचा संघ करतो आहे, यात काही वादच नाही. युवा खेळाडूंना पाठींबा - तेराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात सनराईजर्स हैदराबादने फार मोठ्या नावांवर पैसे खर्च न करता तरुण भारतीय खेळाडूंना संधी दिली. प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा यासारख्या खेळाडूंना संधी दिली. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टी.नटराजन यासारख्या खेळाडूंना यंदा हैदराबादने संधी दिली. प्रियम, अभिषेक यासारख्या खेळाडूंना यंदा कामगिरीत सातत्य दाखवता आलं नसलं तरी टी.नटराजनच्या रुपाने त्यांना भेदक मारा करणारा एक चांगला गोलंदाज मिळाला. एकीकडे इतर संघ अनुभवी खेळाडूंवर पूर्णपणे अवलंबून असताना हैदराबादसारखा संघ तरुण खेळाडूंना संधी देऊन नवीन पर्याय तयार करत होता ही गोष्ट नक्कीच वाखणण्याजोगी आहे. दुखापतींचं ग्रहण, तरीही जिद्द नाही सोडली - पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर गेला, स्पर्धेच्या सुरुवातीलाच बसलेला हा फटका हैदराबादसाठी मोठा होता. संघाची घडी विस्कटल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांत त्यांना काही सामने गमवावे लागले. परंतू हार न मानता प्रयोग करत हैदराबादचा संघ झुंज देत राहिला. मार्शच्या जागी संधी मिळालेल्या जेसन होल्डरने गोलंदाजी आणि फलंदाजीतही आपली चमक दाखवत हैदराबादची मोठी चिंता सोडवली. RCB विरुद्ध सामन्यातही संघ संकटात सापडलेला असताना विल्यमसन आणि होल्डर या दोन्ही फलंदाजांनी आश्वासक भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात विजयानंतरही दोन्ही खेळाडूंच्या वर्तनात कोणताही अवास्तव आक्रमकपणा दिसला नाही. विजय मिळवला तरीही आणि पराभव झाला तरीही हसत खुल्या दिलाने तो स्विकारत समोरच्या संघाचं अभिनंदन करणारा हैदराबादचा संघ नेहमी मनात घर करुन जातो. विल्यमसनची मै हू ना स्टाईल - न्यूझीलंडचा कर्णधार असलेला केन विल्यमसन हा हैदराबादसाठी एक मोठा आधारवड बनला आहे. संघात ४ परदेशी खेळाडूंचा समन्वय साधण्यासाठी अनेकदा विल्यमसनला राखीव खेळाडूंच्या बाकावर बसावं लागतं. ज्यावेळी संघाला गरज असेल तिकडे विल्यमसनकडे हक्काने पाहिलं जातं. दिल्लीविरुद्ध सामन्यातही विल्यमसनने अखेरपर्यंत झुंज दिली. गरज पडेल तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर किंवा मग मधल्या फळीत विल्यमसन नेहमी हैदराबादची नाव सांभाळण्यास तयार असतो. संधी मिळाली नाही म्हणून कधीही विल्यमसन नाराज असल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलं नाही. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय गरजेचा असताना हैदराबादने साखळी सामन्यातील अखेरचे सामने सलग जिंकत आपलं तिकीट पक्क केलं. अखेरच्या सामन्यात मुंबईवर १० गडी राखून मात करत हैदराबादने कोलकात्याचा पत्ता कापला. परंतू या सामन्यात वॉर्नर-साहा जोडीने केलेली फलंदाजी ही खरंच डोळ्याचं पारणं फेडणारी होती. ती पाहिल्यानंतर कदाचीत KKR च्या संघालाही आपल्याला यंदा संधी मिळाली नाही याचं वाईट वाटणार नाही. मुंबईच्या चाहत्यांनाही त्या दिवशी झालेल्या पराभवाचं वाईट वाटलं असेल. परंतू सुरुवातीपासून संघर्ष करत लढणाऱ्या हैदराबादचा महत्वाच्या सामन्यात झालेला पराभव नक्कीच चटका लावून जाणारा आहे. पुढच्या हंगामातही हा संघ अशीच कामगिरी करेल ही अपेक्षा.