जय पाटील
बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी, पलट… पलट… २० ऑक्टोबर १९९५ ला डीडीएलजे प्रदर्शित झाला आणि हे डायलॉग्ज त्या काळातल्या तरुणांनी लगोलग उचलले. युरोपातील सुंदर-श्रीमंत शहरं, राहुल-सिमरनची नोकझोक, पंजाबमधले सरसों के खेत, लग्नविधी साऱ्याची भुरळ त्या पिढीवर इतकी पडली की सर्वाधिक काळ चित्रपटगृहात सुरू राहिलेला चित्रपट म्हणून डीडीएलजे इतिहासात नोंदवला गेला. उद्या या चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण होतायत, पण डीडीएलजेचं गारुड आजही त्या पिढीवर कायम असल्याचंच समाजमाध्यमांवरच्या प्रतिक्रियांतून दिसतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीडीएलजेनंतरच्या या २५ वर्षांत बॉलीवूड पूर्ण बदललं. हिंदी चित्रपट अधिक बिनधास्त आणि काही प्रमाणात प्रगल्भही झाला. चित्रपट निर्मितीचं तंत्रही अधिक प्रगत झालं. आता तो चित्रपट पाहिला तर मेकअप- कपड्यांपासून सेट्सपर्यंत सगळंच अतिशय जुनाट वाटतं. स्वतः काजोललाही त्यातली तिची भूमिका आता जरा जुन्या धाटणीचीच वाटते, पण त्यातले संवाद आजही सहज ओठांवर येतात. आजही त्या शेवटच्या दृश्यावर मीम्स तयार होतात, सिमरनच्या बंद दारावरची घंटा आजही सर्व भेटवस्तूंच्या दुकानांत हमखास दिसते. लग्नसोहळ्यांत मेहंदी लगा के रखना वाजतंच वाजतं. आयकॉनिक म्हणता येईल, असं बरंच काही हा चित्रपट त्या पिढीला देऊन गेला. तेव्हाचे तरुण आज पस्तीशी-चाळीशीत पोहोचले आहेत. आजही ओटीटीवर डीडीएलजे दिसला की थोडा का असेना तो पाहिला जातोच.

डीडीएलजेचे विरोधकही कमी नाहीत. एखादा चित्रपट चांगला की वाईट यावर फारतर एखाद- दोन आठवडे चर्चा रंगते. पण आज २५ वर्षांनंरही डीडीएलजेवरून ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगताना दिसतात. हा अगदीच टाकाऊ चित्रपट होता, यातला अभिनय फारच भडक होता, राहुल सारख्या बिघडलेल्या- नापास झाल्यानंतरही युरोप ट्रीपला जाणाऱ्या हिरोला त्याने मान्यता मिळवून दिली, अशी आगपाखड टीकाकार करतात. तर दुसरीकडे या चित्रपटाने त्या काळातल्या नवतरुणांच्या रोमान्सच्या व्याख्याच बदलल्या, हा एवढा महान चित्रपट आहे की थेट महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची प्रशंसा केली, अशी तरफदारी चाहत्यांकडून होताना दिसते.

समाजमाध्यम हा शब्दही जेव्हा वापरात नव्हता, त्या काळातला हा चित्रपट आज ट्विटर, फेसबुक गाजवतो तेव्हा तो दर्जेदार की निकृष्ट यावादात अडकण्याऐवजी त्याच्या लोकप्रियतेला मानलंच पाहिजे, असं निश्चितंच वाटतं. राज-सिमरानचा पुतळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. आता तो लंडनमध्येही उभारला जाणार आहे. चित्रपटाने अशा अनेक मानसन्मानांवर स्वतःचं नाव कोरलं, यापुढेही कोरत राहील. आज तो जुनाट वाटत असेलही. पण त्या काळातल्या तरुणांच्या मनात डीडीएलजेचं स्थान कायम अढळ राहील.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special blog on ddlj movie and 25 years scj
First published on: 19-10-2020 at 23:04 IST