चंदन हायगुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतेच दिल्ली सरकारने “सिविल डिफेन्स कोरे मे स्वयंसेवक के तौर पे भर्ती हों” अशी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात ‘पात्रता’अंतर्गत पहिलाच मुद्दा “भारत का नागरिक हो या भूटान, नेपाल या सिक्कीम कि प्रजा हो तथा दिल्ली का निवासी हो” वादग्रत ठरला आहे. सिक्कीम जणू काही भूटान, नेपाळ प्रमाणे वेगळा देश आहे असे या जाहिरातीतून प्रतीत झाल्याने सिक्कीम राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदविला. मग दिल्ली सरकारने त्वरित जाहिरात मागे घेत संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन ही केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सदर कारवाईबाबत ट्विट करून माहिती दिली, त्यात ‘Sikkim is an integral part of India (सिक्कीम भारताचा अविभाज्य भाग आहे)’ असे म्हटले.

आजच्या काळात भारताच्याच एका राज्याच्या मुख्यमंत्र्यावर “सिक्कीम भारताचा अविभाज्य भाग आहे” असे म्हणायची वेळ यावी ही शोकांतिका आहे. या प्रकरणातून ईशान्य भारताविषयी आजही उर्वरित भारतातील शासकीय अधिकारी/ कमर्चारी यांच्यात किती मोठ्या प्रमाणात अज्ञान आणि बेजबाबदारपणा आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.

यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. २०१९च्या जानेवारी महिन्यातपुणे शहर पोलिसांनी वैश्या व्यवसाय विरोधात कारवाई दरम्यान विमाननगर परिसरात एका ‘स्पा’ वर छापा टाकून चार थायलंड देशाच्या महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईत एका नागालँड राज्यातील महिलेसह दोघांना पोलिसांनी बेकायदेशीर वैश्या व्यवसाय चालविण्याच्या आरोपीखाली अटक केली. नागालँड ईशान्य भारतातील राज्य. मात्र पोलिसांनी FIR मध्ये संबंधित महिला आरोपीचे मूळ गाव “नागालँड देश” असे नमूद केले. इतकेच नव्हे तर अटक केल्यावर दुसऱ्यादिवशी नागालँडच्या आरोपी महिलेस न्यायालयासमोर उभे करून पुढील तपासासाठी तिची पोलीस कोठडी मागताना रिमांड रिपोर्ट मध्ये “अटक आरोपी महिला ही परदेशातील रहिवाशी असून…” असे स्पष्ट पणे टाइप करून न्यायालयात सादर केले. न्यायालयालाही एवढी गंभीर चूक समजली नाही. पुढे पत्रकाराने याबाबत जाब विचारल्यावर पोलीस अधिकाऱ्याने चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

 

 

पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक स्थळी विदेशी पर्यटकांकडून अधिक तिकीट रक्कम आकारली जाते. काही वर्षांपूर्वी शनिवार वाड्यात मेघालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अभ्यास दौऱ्यावर आला तेंव्हा तिकीट खिडकीतील कर्मचाऱ्याने विदेशी नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या रक्कमेची मागणी केली. तेंव्हा त्याला मेघालय भारतात आहे हे समजून सांगावे लागले.

सिक्कीम तसेच ईशान्य भारतातील अन्य सात राज्यांनी, तेथील जनतेनी देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी विविध प्रकारे भरगोस योगदान दिले आहे. तरीही केवळ चेहरेपट्टीच्या फरकामुळे उर्वरित भारतात त्यांना परदेशी नागरीक समजून भेदभावाने वागविल्याच्या अनेक घटना घडतात. चिनी, नेपाळी, मोमो वगैरे म्हणून त्यांना चिडविले जाते आणि आता तर काही ठिकाणी त्यांना “कोरोना” म्हणून अपमानित केल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. मागील आठवड्यात पुण्यातील जनवाडी भागात नागालँडच्या महिलांवर काही स्थानिक समाज कंटकांनी जेवणाची पिशवी फेकून मारली. याप्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. मात्र काही लोक आम्हाला “तुम लोग कोरोना लेकर आए हो…..जहाँ असे आए हो वापस चले जाओ” असे म्हणून अपमान करत असल्याचे या नागालँडच्या महिलांनी सांगितले. “आम्हीही भारतीय आहोत…. आम्हाला आमचेच काही भारतीय बांधव असे वागवतात याचा त्रास होतो,” असेही त्यांनी बोलून दाखविले.

अशाप्रकारच्या घटना घडल्यावर किंवा काही अन्य कामानिमित्त जेंव्हा ईशान्य भारतीय उर्वरित भारतातील पोलीस स्टेशन किंवा शासकीय कार्यालयात जातात तेंव्हा प्रत्येकवेळी सकारत्मक प्रतिसाद मिळतोच असे नाही. काही वेळा त्यांच्यासोबत बोलणारा पोलीस किंवा शासकीय कर्मचारीच त्यांना विदेशी नागरिक समजतो. कारण आजही अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारींना ईशान्य भारत व तेथील जनतेबद्दल ज्ञान नाही, जागरूकता नाही. दिल्ली राज्याच्या जाहिरातीत सिक्कीमचा वेगळा देश म्हणून उल्लेख करण्याची घटना यातूनच घडली. अशा चुका परवडणाऱ्या नाहीत.

ईशान्य भारतात अनेक सशस्त्र फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. सीमाभागावर चीनसारखे शेजारीदेश उठाठेवी करत असतात. ऑक्टोबर २०१९ मध्ये दोन मणिपुरी फुटीरतावादींनी लंडन येथे मणिपूर भारतापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. भारतात मणिपूर सरकारने या दोघांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे केंद्र तसेच पूर्वोत्तर भारतातातील राज्यांचे सरकार, आपल्या संरक्षण व्यवस्था, समाजातील संवेदनशील व्यक्ती, संघटना विविध प्रकारे फुटीरतावादी व परकीय शक्तींविरोधात सतत संघर्ष करीत आहेत. तेंव्हा उर्वरित भारतातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच समाजाने ईशान्य भारताबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे.

 

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special blog on north east india and the ignorance and irresponsibility of the government officers scj
First published on: 26-05-2020 at 14:23 IST