जय पाटील
‘भाई, मन्नत बिकती नहीं. सर झुका कर मांगी जाती हैं. याद रखोगे तो लाइफ मे कुछ पा सकोगे…’ हे आहे किंग खानने एका चाहत्याच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर. एका ट्विटराइटने शाहरुखला ‘भाई, मन्नत बेचने वाले हो क्या’ असा प्रश्न केला. त्यावर शाहरुखने त्याला हा उत्तरवजा सल्ला दिला. मंगळवारी संध्याकाळी पाच पासून ट्विटरवर ‘आस्कएसआरके’ हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.

आयपीएलनिमित्त सध्या दुबईत असलेल्या शाहरुख खानने आपण अबराम बरोबर वाळूचा किल्ला बांधण्यापूर्वी थोडा वेळ चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार असल्याचं ट्विटरवर जाहीर केलं आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘जर तुला आयुष्यभर केवळ तीनच पदार्थ खाता येणार असतील, तर तू कोणते पदार्थ निवडशील?’ या प्रश्नावर शाहरुखने ‘डाळ, भात आणि कांदा’ असं उत्तर दिलं. कोणी कोलकाता नाइट रायडर्सच्या कामगिरीविषयी छेडले असता, त्याने ‘असे मेरी सोचो, मेरे दिल पे क्या बीत रही हैं,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

‘सध्या कामाव्यतिरिक्त काय करत आहेस. स्वयंपाक शिकायला सुरुवात केली होतीस, शिकलास का?’ या प्रश्नावर ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर मीठ किती घालू, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीच!’ अशी कबुली त्याने दिली. ‘तुमच्या आणि गौरीच्या जोडीला २९ वर्षं पूर्ण झाली. गौरी मॅमना काय गिफ्ट दिलत?’ यावर ‘माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या गिफ्टला मी आणखी काय गिफ्ट देणार?’ असा प्रतिप्रश्न शाहरुखने केला. एका चाहतीने त्याला लाल गुलाब देण्याची, त्याच्याबरोबर डान्स करण्याची आणि त्याला मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्याने ‘अंतराचे निर्बंध दूर झाल्यावर शक्य होईल,’ अशी प्रतिक्रिया दिली.

कोणी त्याला एस. राजमौलींबरोबर चित्रपट कधी करणार असं विचारलं कोणी थलैवाबरोबर एखादा चित्रपट करण्याची मागणी केली. चाहत्यांनी शाहरुखला वाढदिवसाबद्दलही विचारलं. पोलीस आम्हाला तुझ्या घरासमोर जमू देणार नाहीत, अशी चिंता व्यक्त केली, त्यावर या साथीच्या काळात माझ्या घरासमोरच नव्हे, तर कुठेही गर्दी करू नका. यावेळी थोडं दुरुनच प्रेम व्यक्त करा, असा सल्लाही त्याने दिला. काहीवेळाने उत्तरं देणं थांबवत असल्याचं ट्विट त्याने केलं. पण त्यानंतरही बराच वेळ चाहत्यांचे प्रश्न सुरूच राहिले. आस्कएसआरकेमुळे ट्विटरवर काय धमाल उडाली हे दाखवणारी मीम्स व्हायरल होत राहिली. ज्यांना उत्तरं मिळाली, ते तर हवेतच होते, पण ज्यांना मिळाली नाहीत, त्यांची आणि त्यांच्याविषयीची मीम्स व्हायरल झाली.