११७ मराठी उमेदवार; मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी

शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून घेण्यासाठी स्वबळावर लढत असलेल्या भाजपने ‘मराठी व मराठा’ कार्ड खेळत व्यूहरचना केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहात असलेल्या राजन घाग यांना उमेदवारी दिली असून ११७ मराठी चेहरे आहेत. मुंबई महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी असल्याने भाजपची सत्ता आल्यास ते ‘मराठा’ समाजाच्या किंवा ‘मराठी’ चेहऱ्याला देण्याची घोषणाही करण्याचा विचार पक्षाकडून सुरू आहे. भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या गुजराती, उत्तर भारतीय समाजाला मात्र फारसे प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसून अन्य समाजघटकांसाठी फक्त ७५ जागा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे.

शिवसेनेशी कडवी लढत द्यावी लागणार असल्याने भाजपने ‘मराठा व मराठी’ कार्डाचा वापर करून निवडणुका लढण्याची रणनीती आखली आहे. मराठा समाजाचे मोर्चे निघू लागल्यावर त्यांचा असंतोष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सरकारने केल्या आणि मराठा समाज भाजपच्या विरोधात न जाता बरोबर येईल, यासाठी पावले टाकली. या मोर्चा आयोजनातील पदाधिकारी घाग यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग-परळ परिसरात उमेदवारी दिली असून यासह मराठी वस्ती अधिक असलेल्या परिसरात मराठी चेहरे भाजपने दिले आहेत. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे मराठा समाजाचे असून किमान १८-२० उमेदवार या समाजाचे आहेत. या समाजाने भाजपच्या पाठीशी उभे राहावे, यासाठी प्रयत्न असून महापौरपदही खुले असल्याने सत्ता मिळाल्यास ते मराठा उमेदवाराला देण्याची घोषणा केल्यास कितपत उपयुक्त ठरेल, यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. मात्र त्याचा परिणाम गुजराती, उत्तर भारतीय मतदारांवर आणि अन्य समाजघटकांच्या मतांवर होईल का, अशी भीतीही भाजप नेत्यांना वाटत आहे.

उत्तर भारतीयांना भाजपने काही प्रमाणात आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले. मात्र या समाजाचा भाजप नेहमी वापर करून घेते आणि प्रतिनिधित्व मात्र देत नाही, अशी या पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. पण शिवसेनेशी लढताना मराठी चेहरेच अधिक द्यावे लागणार, हे ओळखून भाजपने उत्तर व दक्षिण भारतीयांना फारसे प्रतिनिधित्व दिलेले नाही. त्यामुळे अन्य समाजघटकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.

एमआयएमचे ६२ उमेदवार

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुस्लीमीन तथा एमआयएने ६२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. एमआयएमच्या यादीत १२ मराठी भाषिक उमेदवारांचा समावेश असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, वांद्रे, जोगेश्वरी, अंधेरी या विधानसभा मतदारसंघांमधील विशिष्ट प्रभागांमध्ये एमआयएम लढणार आहे. या यादीत प्रसिद्ध सुलेमान मिठाईवाला यांचे चिरंजीव आरिफ यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे.