• बहुतांश नवनिर्वाचित नगरसेवक मतपरीक्षेत ‘काठावरच पास’
  • ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविणारे अवघे २८ नगरसेवक

शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीही किमान ३५ टक्के गुणांची आवश्यकता असते. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभागातील एकूण मतदानाच्या उणीपुरी २० टक्के मतेही मिळवता न आलेले नगरसेवक आपल्या प्रभागातील साधारणपणे ५७ हजार लोकसंख्येवर पाच वर्षे वर्चस्व गाजवणार आहेत. या नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेल्या यशवंत जाधव यांचाही समावेश आहे. निवडून आलेले बहुतांश नगरसेवक हे असे ‘काठावर पास’ आहेत. तर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवलेल्या नगरसेवकांची संख्या २२७ पैकी केवळ २८ आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीतील नगरसेवकांना केवळ २२ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. त्यातच मतदान केलेल्या मतदारांपैकी ५० टक्क्यांचीही पसंती न लाभूनही ९० टक्के उमेदवार विजयी ठरले आहेत. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवणाऱ्या नगरसेवकांची संख्या अवघी २८ असून २० टक्के मतदात्यांचीही पसंती न मिळताही पाच उमेदवार महानगरपालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. या पाच नगरसेवकांमध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे नगरसेवक असून शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती झालेल्या यशवंत जाधव यांचाही त्यात समावेश आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात साधारण ५५ ते ६० हजार लोकसंख्या आहे. अशा २२७ प्रभागांपैकी १०५ ठिकाणी १० हून अधिक उमेदवार तर ९ ठिकाणी २० हून अधिक उमेदवार उभे राहिले होते. यातील काही प्रभागांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना व भाजप यासोबत सप, एमआयएम अशा प्रकारे चुरस लागल्याने अत्यंत कमी मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले. १५ उमेदवारांना तर ३० टक्क्यांहून कमी मते मिळवूनही विजयी होता आले.

‘शहरात मतदान न करण्याकडे नागरिकांचा कल असतो. कोणीही निवडून आले तरी परिस्थितीत सुधारणा होणार नाही, अशी असहाय्यता यामागे असते. त्यामुळे मग लोकांचा पाठिंबा नसलेला लोकप्रतिनिधी निवडला जातो. मात्र पन्नास टक्के मते मिळाल्याशिवाय उमेदवाराची निवड करण्याचा पर्याय भारतासारख्या देशात व्यवहार्य ठरणार नाही. आणि हे टक्के नेमके कोणत्या निकषावर ठरवले जाणार यावर तर्कनिष्ठ उत्तरही नाही,’ असे माजी मुख्य सचिव द. म. सुखटणकर यांनी सांगितले. निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून कामे करून घेण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायला हवी, असेही ते म्हणाले.

सर्वात कमी टक्के मते मिळवून विजयी झालेले नगरसेवक

  • प्रभाग १७४ ( लोकसंख्या ५०,४९१)- कृष्णावेण्णी रेड्डी, भाजप – मते १६ टक्के- शीव परिसरातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात १७ उमेदवार उभ्या राहिल्या होत्या. या भागात १४,१४२ जणांनी मतदान केले. त्यातील सर्वच पक्षांना अगदी शे-दोनशेच्या फरकांनी मते मिळाली.
  • प्रभाग १३५ (लोकसंख्या ५७,८७४)- समीक्षा साकरे, शिवसेना – मते १८ टक्के – मानखुर्द येथील या महिला आरक्षित विभागात झालेल्या १५,७३४ मतदानात भाजप, सप, बसप, आरपीआय आणि एमआयएम असे सर्वच पक्ष स्पर्धेत होते. याशिवाय अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या कैलाशी वर्मा यांनी २१०३ मते घेतली. तर समीक्षा साकरे यांना २८०४ मते मिळाली.
  • प्रभाग २०९ (लोकसंख्या ५५,६२२)- यशवंत जाधव, शिवसेना -मते १९ टक्के – डॉकयार्डमधील वाडी बंदर, दारूखाना या प्रभागात १४ उमेदवार होते. १८५५६ मतदारांनी मत दिले. त्यात काँग्रेस व सेनेत चुरस असली तरी इतर पक्ष तसेच अपक्षांनी ओढलेल्या मतांमुळे १९ टक्के मतदारांची पसंती असलेले जाधव निवडून आले.
  • प्रभाग ७८ (लोकसंख्या ५१,४९९)- नाजिया सोफी, राष्ट्रवादी -मते २०.५ टक्के – वांद्रे येथील शिवाजी नगर प्रभागात अवघे ८ उमेदवार असूनही सेना, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष यांच्यात चुरस असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १९,५६४ पैकी ४०१२ मते मिळूनही नगरसेवक होता आले.