मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले असले तरी, निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असा सूर भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. भाजप-शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे मुंबईत युतीचाच महापौर होणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत ५ वर्षे पूर्ण करणार, असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोघांकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनीही सदस्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. तीन अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता ८७ वर पोहोचले आहे. तर ८२ वर स्थिरावलेल्या भाजपनेही छोटे पक्ष व अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अंकगणित आखायला सुरुवात केली आहे. त्यात नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांनी एकत्र यावे, असा सूर लावला आहे. आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युती व्हावी, असा सूर लावला आहे. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची युती नैसर्गिक आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली. पण वाद हे काही दिवसांचेच असतात. घरात भांडणे होत नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले.

मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यांनी टोला लगावला. इतर कोणत्याही पक्षांनी खूश होण्याची काहीही गरज नाही, असे ते म्हणाले. राज्यातील सरकार टिकेल का, या शक्यतेबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. कितीही संकटे आली तरी राज्य सरकार पाच वर्षे पूर्ण करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, भाजपशी युती करायची नाही, असे नवनिर्वाचित नगरसेवकांचे म्हणणे आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यातच प्रचारादरम्यान भाजपने शिवसेनेवर जहाल टीका केली होती. त्यामुळे भाजपशी युती करू नये, अशी आग्रहाची मागणी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर भाजपने युतीसाठी काँग्रेसकडे हात पसरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत येत्या ८ मार्च रोजी संपुष्टात येत असून ९ मार्च रोजी महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी ६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. पालिकेकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी कोकण भवनला सादर करावी लागणार आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी राजकीय पक्षांना गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.