मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा भाजपने सुरू केलेला प्रचार, सागरी मार्गाचा शिवसेनेकडून केला जाणारा उदोउदो, वास्तविक ही सारी कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागली असली तरी त्याचे श्रेय घेण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला होता. पण महानगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मेट्रो, मोनो, सागरी मार्ग ही सारी कामे काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याची आठवण काँग्रेसला अखेर झाली. या कामांचा दाखला देत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मेट्रो प्रकल्पाचे काम काँग्रेस सरकारच्या काळात झाले आणि प्रकल्पही त्याच सरकारच्या काळात कार्यान्वित झाला. सागरी मार्ग बांधण्याची कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती. मोनो प्रकल्पही काँग्रेस सरकारच्या काळातील. पण या साऱ्या कामांचे विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसला श्रेय घेता आले नव्हते आणि आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही. याउलट भाजप, शिवसेनेने याच कामांच्या आधारे मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसने मात्र ही सारी कामे आपल्याच काळात मार्गी लागल्याचा दावा केला. मुंबईच्या विकासात काँग्रेसचेच योगदान जास्त असल्याचे पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले. महानगरपालिकेत गेली २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप युतीच्या काळात विकासकामांपेक्षा भ्रष्टाचारच जास्त झाल्याचा आरोपही तिवारी यांनी केला. दिल्लीत काँग्रेसची सत्ता असताना दिल्लीचा पूर्ण कायापालट करण्यात आला होता. याउलट मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये फार काही सुधारणा झाल्या नाहीत, असेही त्यांचे म्हणणे होते.