मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही पक्षांच्या युतीचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असताना, शिवसेना स्वबळावर लढल्यास मुंबईत शिवसेनाच क्रमांक एकचा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेच्या ३० ते ४० जागा वाढतील, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्याचा लाभ शिवसेनेलाच अधिक होईल, असेही त्यात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. तर भाजपनेही मुंबईत सत्ता स्थापन करायचीच, असा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांची कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे युती करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तूर्तास ही चर्चा लांबणीवर पडली आहे. असे असतानाच पारदर्शक कारभाराच्या अटीवर शिवसेनेशी युती करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यावर शिवसेनेनेही टीका करत भाजपवर ‘लक्ष्यभेद’ केला आहे. शिवसेना-भाजप युतीचा फैसला जाहीर होण्याआधीच दोन्ही पक्षांकडून आपापल्या पातळीवर सर्व्हे करून अंदाज घेतला जात आहे. शिवसेनेनेही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत सर्व्हे करून मतदारांचा कौल कसा असेल, याबाबत अंदाज घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढल्यास त्याचा अधिक लाभ शिवसेनेलाच होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. सध्या शिवसेनेचे ७६ नगरसेवक आहेत. त्यात ३० ते ४० जागा वाढून शिवसेनेला १०५ ते ११७ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. भाजपसोबत युती केल्यास मात्र, शिवसेनेला अधिक लाभ होणार नाही. केवळ ८० ते ९० जागांवरच विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, युती झाल्यास १०६ जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपनेही काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत सर्व्हे केला होता. त्यात भाजप स्वबळावर लढल्यास सर्वाधिक फायदा होईल. भाजपच्या शंभरहून अधिक जागा जिंकून येतील आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे सर्व्हेक्षणात आढळून आले होते. तर युती केल्यास शिवसेनेला लाभ होऊन महापौर त्यांचा होईल, असे त्यात म्हटले होते. तर स्वबळावर लढलो तर, किमान ८५ जागा तरी निश्चित मिळविता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे युती केल्यास जागावाटपात नमते न घेता स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजपच्या बहुतांश नेत्यांचा असल्याचे बोलले जात आहे.