मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंबाटा एव्हिशनप्रकरणी शिवसेनेवर धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांना तसे वाटल असेल तर त्यांनी सरळ पोलिसांमार्फत चौकशी करावी. जर या चौकशीत त्यांचा आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी फडणवीस यांना दिले आहे.
फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ साकीनाका, चिंचपोकळी व घाटकोपर येथे आयोजित सभेत खंबाटा एव्हिएशनमधून २२ शाखाप्रमुखांना आणि काहींच्या घरातील व्यक्तींना वेतन मिळते, असा आरोप केला होता. त्याच्या या आरोपाला विनायक राऊत यांनी आज उत्तर दिले.
राऊत म्हणाले, गृहखाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. त्यांनी या विभागातर्फे खंबाटा एव्हिशनमधून शाखाप्रमुखांना पगार होतो का नाही याचा शोध घ्यावा. एकाही शाखाप्रमुखाला खंबाटा एव्हिशनमधून पगार झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यास शिवसेना तयार आहे. पण तसे सिद्ध न झाल्यास मुख्यमंत्र्यांनी माफी मागून २४ तासांत राजीनामा देतील का असा सवाल उपस्थित केला. खंबाटा एव्हिएशनमधील कामगारांचा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने मराठी कामगारांना फसवल्याचा आरोप केला होता. शिवसेनेने कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढा दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.