विळ्या-भोपळ्याचे नाते असूनही राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजप-शिवसेनेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘पोस्टरवॉर’ भडकले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ‘डीड यू नो?’ला ‘ह्याला जबाबदार कोण?’, अशी पोस्टरबाजी करून उत्तर दिले आहे. यापूर्वी शिवसेनेच्या ‘डीड यू नो?’ला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘यू शूड नो?’ अशी पोस्टरबाजी केली होती.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप-शिवसेनेत युती करण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र, काल, गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युतीचा काडीमोड झाले, यावर शिक्कामोर्तब झाले. युती तुटल्यानंतर भाजपने सोशल मीडियावरून आक्रमक प्रचाराचे धोरण अवलंबले आहे. शिवसेनेने यापूर्वी मुंबईत झालेल्या विकासकामांबाबत ‘डीड यू नो?’ अशी पोस्टरबाजी करून मुंबईकरांकडे मते देण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेच्या या पोस्टरला ‘ह्याला जबाबदार कोण?’ अशी पोस्टरबाजी करून उत्तर दिले आहे.

‘२० वर्षांतील शिवसेनेच्या प्रगतीची वाटचाल’ अशा मथळ्याने मुंबईतील रस्ते, झोपडपट्टी, कचरा, प्रदूषण, पाणी, शिक्षण आदी समस्यांकडे पोस्टरद्वारे लक्ष वेधले आहे. तसेच ह्याला जबाबदार कोण, असा सवाल करून भाजपलाच संपूर्ण बहुमत द्या, असे आवाहन मतदारांना केले आहे. यापूर्वी शिवसेनेने मुंबईतील विकासकामांची माहिती देत ‘डीड यू नो?’, असे पोस्टर जागोजागी झळकावले होते. तसेच शिवसेनेला मते देण्याचे आवाहन मुंबईकरांना केले होते. शिवसेनेच्या या पोस्टरना राष्ट्रवादी काँग्रेसने ‘यू शूड नो?’, असा सवाल करत पोस्टर झळकावले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘पोस्टरवॉर’नंतर भाजपनेही युती तुटल्याची घोषणा होताच यात उडी घेतली आहे. जाहीर प्रचाराला काही दिवसांतच सुरुवात होईल. त्यापूर्वीच मुंबईत पोस्टरवॉर भडकल्याचे चित्र आहे.